॥ श्रीगणेशाय नमः ॥
नामधारक शिष्य देखा । उभा राहोनि
संमुखा ।
कर जोडुनी
कौतुका । नमन करी साष्टांगीं ॥१ ॥
जय जयाजी सिद्धमुनि । तूं तारक
भवार्णी ।
नाना धर्म
विस्तारोनि । गुरुचरित्र निरोपिलें ॥२॥
तेणें धन्य झालों आपण । प्रकाश
केलें महाज्ञान ।
सुधारस
गुरुस्मरण । प्राशविला दातारा ॥३॥
एक असे माझी विनंती । निरोपावें
मजप्रती ।
आमुच्या
पूर्वजें कवणें रीतीं । सेवा केली श्रीगुरुची ॥४॥
तुम्ही सिद्ध महाज्ञानी । होतां
श्रीगुरुसन्निधानीं ।
शिष्य
झाले कवणे गुणीं । निरोपावें दातारा ॥५॥
ऐकोनि शिष्याचें वचन । सिद्ध
सांगे विस्तारोन ।
एकचित्तें
करोनि मन । ऐक शिष्या नामधारका ॥६॥
पूर्वीं कथानक सांगितलें । जे
कां श्रीगुरुशीं भेटले ।
वोसरग्रामीं
एक होते भले । पूर्वज तुमचे परियेसा ॥७॥
तयाचें नाम सायंदेव । केली पूजा
भक्तिभाव ।
त्यावरी
प्रीति अतिस्नेह । आमुचे श्रीगुरुमूर्तीचा ॥८॥
तेथून आले दक्षिणदिशीं ।
गाणगापुरीं परियेसीं ।
ख्याति
झाली दश दिशीं । कीर्ति वाढली बहुवस ॥९॥
ऐकोनि येती सकळ जन । करिती
श्रीगुरुदर्शन ।
जें मनीं
करिती चिंतन । पूर्ण होय तयांचें ॥१०॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । होते
गाणगापुरा वस्ती ।
नाम
श्रीनृसिंहसरस्वती । भक्तवत्सल निर्धारीं ॥११॥
तुमचा पूर्वज जो का होता ।
सायंदेव भक्त विख्याता ।
त्याणें
ऐकिलें वृत्तान्ता । महिमा श्रीगुरु यतीचा ॥१२॥
भक्तिपूर्वक वेगेंसी । आला
गाणगापुरासी ।
आनंद बहु
मानसीं । हर्षे निर्भर होउनी ॥१३॥
दुरुनि देखिलें गाणगाभुवन । आपण
घाली लोटांगण ।
करी दंडप्राय
नमन । ऐशापरी चालिला ॥१४॥
ऐसा दंडप्रणाम करीत । गेला विप्र
मठांत ।
देखिले
तेथें मूर्तिमंत । परात्पर श्रीगुरु ॥१५॥
साष्टांग नमस्कार करीत । असे
चरणावरी लोळत ।
केशेंकरुन
पाय झाडीत । भक्तिभावें करोनिया ॥१६॥
करसंपुट जोडोनि । स्तुति करी
एकाग्र मनीं ।
त्रैमूर्ति
तूंचि ज्ञानीं । गुरुमूर्ति स्वामिया ॥१७॥
धन्य धन्य जन्म आपुलें । कृतार्थ
पितर माझे झाले ।
कोटि
जन्मांचें पाप गेलें । म्हणोनि चरणीं लागला ॥१८॥
जय जयाजी श्रीगुरुमूर्ति ।
त्राहि त्राहि विश्वपती ।
परमात्मा
परंज्योती । नृसिंहसरस्वती स्वामिया ॥१९॥
तुझे चरण वर्णावयासी । शक्ति
कैंची आम्हांसी ।
परमात्मा
तूंचि होसी । भक्तवत्सला स्वामिया ॥२०॥
तुमचे चरणाचिये प्रौढी । वसती
तेथें तीर्थें कोडी ।
वर्णिती
श्रुति घडोघडी । चरणं पवित्रं विततं पुराणं ॥२१॥
त्रैमुर्तींचा अवतार । मज दिससी
साक्षात्कार ।
भासतसे
निरंतर । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥२२॥
परब्रह्म तुम्ही केवळू । हातीं
दंड कमंडलू ।
अमृत
भरलें सोज्ज्वळू । प्रोक्षितां प्रेत उठतसे ॥२३॥
दंड धरिला या कारणें ।
शरणांगतातें रक्षणें ।
दुरितदैन्य
निवारणें । निज भक्त रक्षावया ॥२४॥
रुद्राक्षमाळा भस्मधारण ।
व्याघ्रचर्माचें आसन ।
अमृतदृष्टि
इंदुनयन । क्रूरदृष्टीं अग्निसूर्य ॥२५॥
चतुर्विध पुरुषार्थासी । भक्तजना
तूंचि होसी ।
तूंचि
रुद्र सत्य होसी । तूं नृसिंह जगद्गुरु ॥२६॥
विष्णुरुपें करिसी रक्षण ।
पीतांबर पांघरुण ।
तीर्थ
समस्त तुझे चरण । भक्ताभिमानी विष्णु तूंचि ॥२७॥
वांझे कन्या पुत्र देसी । शुष्क
काष्ठ आणिलें पल्लवासी ।
दुभविली
वांझ महिषीसी । अन्न पुरविलें ब्राह्मणा ॥२८॥
विष्णुमूर्ति तूंचि जाण ।
त्रिविक्रमभारती ऐसी खूण ।
साक्ष
दिधली अंतःकरण । विश्वरुप दाखविलें ॥२९॥
म्हणविले वेद पतिताकरवीं । अपार
महिमा झाला पूर्वीं ।
नरहरिअवतार
मूर्ति बरवी । आलेति भक्त तारावया ॥३०॥
ऐसी नानापरी स्तुति करीत । पुनः
पुनः नमन करीत ।
सद्गदित
कंठ होत । रोमांच अंगीं उठले ॥३१॥
आनंदाश्रुलोचनीं । निघती संतोषें
बहु मनीं ।
नव विधा
भक्ति करोनि । स्तुति केली श्रीगुरुची ॥३२॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया
विप्रा आश्वासिती ।
माथां
हस्त ठेवोनि म्हणती । परम भक्त तूंचि आम्हां ॥३३॥
तुवा जें कां स्तोत्र केलें ।
तेणें माझें मन धालें ।
तुज वरदान
दिधलें । वंशोवंशीं माझा दास ॥३४॥
ऐसा वर देउनी । गुरुमूर्ति
संतोषोनि ।
मस्तकीं
हस्त ठेवोनि । म्हणती जाय संगमासी ॥३५॥
स्नान करुन संगमासी । पूजा करीं
अश्वत्थासी ।
त्वरित
यावें मठासी । पंक्तीस भोजन करीं गा ॥३६॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । तया
विप्रा निरोप देती ।
गुरुनिरोप
जेणें रीतीं । आला स्नान करोनिया ॥३७॥
षोडशोपचारें श्रीगुरुसी । पूजा
करी भक्तींसी ।
अनेक परी
पक्वान्नेंसी । भिक्षा करवी परियेसा ॥३८॥
भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । तया
विप्रा आपुले पंक्ति ।
समस्त
शिष्यांहुनी प्रीती । ठाव देती आपलेजवळी ॥३९॥
भोजन झालें श्रीगुरुसी ।
शिष्यांसहित विप्रांसी ।
संतोषोनि
आनंदेंसी । बैसले होते मठांत ॥४०॥
तया सायंदेवविप्रासी । श्रीगुरु
पुसती प्रीतींसी ।
तुझें
स्थान कोणे देशीं । कलत्र पुत्र कोठें असती ॥४१॥
पुसती क्षेमसमाधान । कैसें
तुमचें वर्तन ।
कृपा असे
परिपूर्ण । म्हणोनि पुसती संतोषें ॥४२॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सांगे
सायंदेव विस्तारोन ।
कन्या
पुत्र बंधुजन । समस्त क्षेम असती स्वामिया ॥४३॥
उत्तरकांची म्हणोनि ग्रामीं ।
तेथें वसोनि आम्ही ।
तुझ्या
कृपें समस्त क्षेमी । असों देवा कृपासिंधु ॥४४॥
पुत्रवर्ग बंधु जाणा । करिती
संसारयातना ।
आपुले
मनींची वासना । करीन सेवा श्रीगुरुची ॥४५॥
करुनि सेवा श्रीगुरुची । असेन
स्वामी परियेसीं ।
ऐसा माझे
मानसीं । निर्धार असे देवराया ॥४६॥
ऐकोन तयाचें वचन । श्रीगुरु
म्हणती हासोन ।
आमुची
सेवा असे कठिण । आम्हां वास बहुतां ठायीं ॥४७॥
एके समयीं अरण्यांत । अथवा राहूं
गांवांत ।
आम्हांसवें
कष्ट बहुत । तुम्ही केवी साहूं शका ॥४८॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । तया
विप्रा निरोपिती ।
ऐकोन
विनवी मागुती । म्हणे स्वामी अंगिकारा ॥४९॥
गुरुची सेवा करी नरू । तोचि उतरे
पैल पारु ।
तयासी
कैसें दुःख अघोरु । सदा सुखी तोचि होय ॥५०॥
चतुर्विध पुरुषार्थ । देऊं शके
श्रीगुरुनाथ ।
त्यासी
नाहीं यमपंथ । गुरुभक्ति मुख्य कारण ॥५१॥
येणेंपरी श्रीगुरुसी । सायंदेव
भक्तींसी ।
विनवीतसे
परियेसीं । संतोषी झाले श्रीगुरुमूर्ति ॥५२॥
श्रीगुरु तया विप्रा म्हणती ।
जैसें असे तुझे चित्तीं ।
दृढ असेल
मनीं भक्ति । तरीच करीं अंगीकार ॥५३॥
स्थिर करोनि अंतःकरण । करितां
सेवा-गुरुचरण ।
झाले मास
तीन जाण । ऐक शिष्या नामकरणी ॥५४॥
वर्ततां ऐसें एके दिवशीं ।
श्रीगुरु निघाले संगमासी ।
सवें
घेतलें सायंदेवासी । समस्तांतें वारुनी ॥५५॥
भक्ताचें अंतःकरण । पहावया गेले
श्रीगुरु आपण ।
पूर्वज
तुमचा भोळा जाण । जात असे संगमासी ॥५६॥
भक्तासहित संगमासी । गेले
श्रीगुरु समयीं निशी ।
बैसते
झाले अश्वत्थासी । सुखें गोष्टी करिताती ॥५७॥
दिवस गेला अस्तमानीं । श्रीगुरु
विचार करिती मनीं ।
दृढ याचे
अंतःकरणीं । कैसी करणी पाहूं म्हणती ॥५८॥
उठविती वारा अवचित । तेणें वृक्ष
पडों पाहत ।
पर्जन्य
झाला बहुत । मुसळधारा वर्षतसे ॥५९॥
सायंदेव होता जवळी । सेवा केली
तये वेळीं ।
केला
आश्रय वृक्षातळीं । वस्त्रेंकरुनि श्रीगुरुसी ॥६०॥
पर्जन्य वारा समस्त देखा ।
साहिले आपण भावें ऐका ।
उभा
राहोनि संमुखा । सेवा करी एकभावें ॥६१॥
येणेंपरी याम दोन । पर्जन्य आला
महा क्षोभोन ।
आणिक वारा
उठोन । वाजे शीत अत्यंत ॥६२॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ।
शीत झालें बहुवसी ।
तुवां
जाउनी मठासी । अग्नि आणावा शेकावया ॥६३॥
गुरुनिरोंपें तत्क्षणीं ।
ऐक्यभाव धरोनि मनीं ।
निघाला
विप्र महाज्ञानी । आणावया वैश्वानर ॥६४॥
निघाला शिष्य देखोनि । श्रीगुरु
म्हणती हासोनि ।
नको पाहूं
आपुले नयनीं । उभयपार्श्वभागातें ॥६५॥
गुरुनिरोपें येणेंपरी । निघता
झाला झडकरी ।
न दिसे
वाट अंधकारीं । खुणें खुणें जात असे ॥६६॥
अंधकार महाघोर । पाऊस पडे धुरंधर
।
न दिसे
वाटेचा प्रकार । जात असें भक्तिपूर्वक ॥६७॥
मनीं ध्याय श्रीगुरुसी । जातसे
तैसा मार्गेसी ।
लवतां वीज
संधीसी । तेणें तेजें जातसे ॥६८॥
येणेंपरी द्विजवर । पावला त्वरित
गाणगापुर ।
वेशीपाशीं
जाऊनि सत्वर । हाक मारिली द्वारपाळा ॥६९॥
तयासी सांगे वृत्तान्त । आणोनि
दिधला अग्नि त्वरित ।
घालूनिया
भांडयांत । घेवोनि गेला परियेसा ॥७०॥
नसे मार्ग अंधकार । विजेचे तेजें
जातसे नर ।
मनीं
करितसे विचार । श्रीगुरुंनीं मातें निरोपिलें ॥७१॥
दोहींकडे न पाहें निगुती ।
श्रीगुरु मातें निरोपिती ।
याची कैसी
आहे स्थिति । म्हणोनि पाहे तये वेळीं ॥७२॥
आपुले दक्षिणदिशेसी । पाहतां
देखे सर्पासी ।
भिऊनि
पळतां उत्तरेसी । अद्भुत दिसे महानाग ॥७३॥
पांच फणी दिसती दोनी । सवेंचि
येताती धावोनि ।
विप्र भ्याला
आपुले मनीं । धावत जातसे भिऊनिया ॥७४॥
वाट सोडुनी जाय रानीं । सवेंचि
येताति सर्प दोनी ।
जातां
भयभीत होउनी । अति शीघ्र धावतसे ॥७५॥
स्मरतां झाला श्रीगुरुसी ।
एकभावें धैर्येंसी ।
जातां
विप्र परियेसीं । पातला संगमाजवळीक ॥७६॥
दुरुनि देखे श्रीगुरुसी । सहस्त्रदीपज्योतीसरसी
।
दिसती
विप्र बहुवसी । वेदध्वनि ऐकतसे ॥७७॥
जवळी जातां द्विजवरु । एकला दिसे
श्रीगुरु ।
गेला
समस्त अंधकारु । दिसे चंद्र पौर्णिमेचा ॥७८॥
प्रज्वलित केलें अग्नीसी । उजेड
झाला बहुवसी ।
झाला
विप्र सावधेसी । पाहतसे श्रीगुरुतें ॥७९॥
दोनी सर्प येवोनि । श्रीगुरुतें
वंदोनि ।
सवेंचि
गेले निघोनि । तंव हा पूर्वींच भ्यालासे ॥८०॥
श्रीगुरु पुसती तयासी । कां गा
भयभीत झालासी ।
आम्हीं
तूंतें रक्षावयासी । सर्प दोन पाठविले ॥८१॥
न धरीं आतां भय कांहीं । आमुची
सेवा कठीण पाहीं ।
विचार
करुनि आपुल्या देहीं । अंगिकारीं मुनिसेवा ॥८२॥
गुरुभक्ति असे कठिण ।
दृढभक्तीनें सेवा करणें ।
कळिकाळाचें
नाहीं भेणें । तया शिष्या परियेसा ॥८३॥
सायंदेव तये वेळीं । लागतसे
श्रीगुरुचरणकमळीं ।
विनवीतसे
करुणाबहाळी । कृपा करीं म्हणोनिया ॥८४॥
गुरुभक्तीचा प्रकारु । निरोपावा
मातें श्रीगुरु ।
जेणें माझें
मन स्थिरु । होवोनि राहे तुम्हांजवळी ॥८५॥
श्रीगुरु म्हणती विप्रासी ।
सांगे कथा सुरसी ।
न गमे वेळ
रात्रीसी । ब्राह्म मुहूर्त होय तंव ॥८६॥
पूर्वीं कैलासशिखरासी । बैसला
होता व्योमकेशी ।
अर्धांगी
पार्वतीसी । कथा एकान्तीं सांगतसे ॥८७॥
गिरिजा पुसे ईश्वरासी ।
गुरुभक्ति म्हणिजे आहे कैसी ।
विस्तारोनि
आम्हांसी । सांगा म्हणे तये वेळीं ॥८८॥
शिव सांगे गिरिजेसी । सर्व साध्य
गुरुभक्तीसी ।
करावें
एकभावेंसी । शिव जो तोचि गुरु होय ॥८९॥
याचें एक आख्यान । सांगेन तुज
विस्तारोन ।
एकचित्तें
करोनि मन । ऐक गिरिजे म्हणतसे ॥९०॥
गुरुभक्ति म्हणिजे सुलभपण ।
तात्काळ साध्य होय जाण ।
अनेक तप
अनुष्ठान । करितां विलंब परियेसीं ॥९१॥
नाना तपें अनुष्ठानें । करिती
यज्ञ महाज्ञानें ।
त्यांतें
होती महाविघ्नें । साध्य होतां दुर्लभ ॥९२॥
जो गुरुभक्ति करी निर्मळ । साध्य
होईल तात्काळ ।
यज्ञदान
तपफळ । सर्व सिद्धि त्यासी होती ॥९३॥
सुलभ असे अप्रयास । जो जाणे
गुरुकुलवास ।
एकभावें
धरोनि कांस । आराधावें श्रीगुरुसी ॥९४॥
याचा एक दृष्टान्त । सांगेन ऐका
एकचित्त ।
ब्रह्मयाचा
अवतार व्यक्त । त्वष्टाब्रह्मा परियेसा ॥९५॥
तयासी झाला एक कुमर । अतिलावण्य
सुंदर ।
सर्वधर्मकुशल
धीर । योग्य झाला उपनयना ॥९६॥
त्वष्टाब्रह्मा पुत्रासी ।
व्रतबंध करी परियेसीं ।
करावया
विद्याभ्यासासी । गुरुचे घरीं निरविला ॥९७॥
गुरुची सेवा नानापरी । करीतसे
ब्रह्मचारी ।
वर्ततां
ऐशियापरी । अपूर्व एक वर्तलें ॥९८॥
वर्ततां ऐसें एके दिवशीं । आला पर्जन्य
बहुवशी ।
पर्णशाळा
परियेसीं । गळतसे गुरुची ॥९९॥
तये वेळीं शिष्यासी । निरोपिती
गुरु त्यासी ।
त्वरित
करावें आम्हांसी । एक गृह दृढ ऐसें ॥१००॥
पर्णशाळा पतिवर्षीं । जीर्ण
होतसे परियेसीं ।
गृह
करावें दृढतेंसी । कधीं जीर्ण नोहे ऐसें ॥१॥
न तुटे कधीं राहे स्थिर ।
दिसावें रम्य मनोहर ।
असावें
सर्व परिकर । करीं शीघ्र ऐसें गृह ॥२॥
ऐसें गुरु निरोपिती । तेच समयीं
गुरुची सती ।
सांगतसे
अतिप्रीतीं । मातें कुंचकी आणावी ॥३॥
नसावी विणली अथवा शिवली ।
विचित्र रंगीत पाहिजे केली ।
माझ्या
अंगप्रमाण वहिली । त्वरित आणीं म्हणतसे ॥४॥
गुरुपुत्र म्हणे शिष्यासी ।
मागेन तें आणीं वेगेंसी ।
पादुका
पाहिजेत आम्हांसी । उदकावरुनि चालती ऐशा ॥५॥
अथवा चिखल न लागे त्यांसी । न
व्हाव्या अधिक पायांसी ।
जेथें
चिंतू मानसीं । तेथें घेऊनि जाती ऐशा ॥६॥
इतुकिया अवसरीं । गुरुकन्या काय
करी ।
जातां
तयाचा पल्लव धरी । आपणा कांहीं आणावें ॥७॥
उंच तानवडें आपणासी । घेऊनि
यावें परियेसीं ।
आणिक आणा
खेळावयासी । घरकुल एक आपणा ॥८॥
कुंजराचें दांतें बरवें । घरकुल
तुवां आणावें ।
एकस्तंभी
असावें । कधीं न तुटे न होय जीर्ण ॥९॥
जेथें नेईन तेथें यावें ।
सोपस्कारासहित आणावें ।
पाट
ठाणवीं असावें । तया घराभीतरीं ॥११०॥
सदा दिसावें नूतन । वावरत असावें
आपें आपण ।
करावया
पाक निष्पन्न । मडकीं करुनि आणीं पां ॥११॥
आणिक एक सांगेन तुज । रांधप
करावया शिकवी मज ।
पाक
केलिया उष्ण सहज । असों नयें अन्न आणा ॥१२॥
पाक करिता मडकियेसी । न लागे
काजळ परियेसीं ।
आणोनि दे
गा भांडीं ऐसीं । आणिक सर्व सोपस्कार ॥१३॥
गुरुकन्या ऐसें म्हणे ।
अंगिकारिलें शिष्यराणें ।
निघता
झाला तत्क्षणें । महा अरण्यांत प्रवेशला ॥१४॥
मनीं चिंता बहु करी । आपण बाळ
ब्रह्मचारी ।
काय जाणें
त्यांचे परी । केवी करुं म्हणतसे ॥१५॥
पत्रावळी करुं नेणें । इतुकें
मातें कधीं होणें ।
स्मरतसे
एकाग्र मनें । श्रीगुरुचरण देखा ॥१६॥
म्हणे आतां काय करुं । मातें कोण
आधारु ।
बोल ठेवील
माझा गुरु । शीघ्र इतुकें न करितां ॥१७॥
कवणापासीं जाऊं शरण । कवण राखील
माझा प्राण ।
कृपानिधि
गुरुविण । ऐसा कवण असे दुजा ॥१८॥
जरी नायकें गुरुचा बोल । शाप
देईल तात्काळ ।
ब्रह्मचारी
आपण बाळ । म्हणोनि अंगिकार कां केला ॥१९॥
काय गति आपणासी । आतां जाऊं
कवणापासीं ।
अशक्त
बाळ मी अज्ञानेसी । अंगिकार कां केला ॥१२०॥
गुरुवाक्य मज कारण । मातें न करी
निर्वाण ।
वेंचीन
आतां आपुला प्राण । गुरुनिरोप करीन मी ॥२१॥
ऐसें महा अरण्यांत । जातसे बाळ
चिंता करीत ।
श्रमोनिया
अत्यंत । निर्वाणमनें जातसे ॥२२॥
पुढें जातां मार्ग क्रमित ।
भेटला एक अवधूत ।
तेणें बाळ
देखिला तेथ । पुसता झाला तये वेळीं ॥२३॥
कवण बाळा कोठें जासी ।
चिंताव्याकुळ मानसीं ।
विस्तारोनि
आम्हांसी । सांग म्हणे तये वेळीं ॥२४॥
ऐसें म्हणतां ब्रह्मचारी ।
जाऊनिया नमस्कारी ।
म्हणे
स्वामी तारीं तारीं । चिंतासागरीं बुडतसें ॥२५॥
भेटलासि तूं निधानु । जैसी
वत्सालागीं धेनु ।
दुःखी
झालों होतों आपणु । देखतां मन निवालें ॥२६॥
जैसे चकोरपक्षियातें । चांदणें
देखतां मन हर्षतें ।
तैसें
तुझ्या दर्शनमात्रें । आनंद झाला स्वामिया ॥२७॥
माझें पूर्वार्जित पुण्य ।
कांहीं होतें म्हणोन ।
तुम्ही
भेटलेंती निधान । कृपासिंधु परमपुरुषा ॥२८॥
सांगा आपुलें नाम कवण । आगमन
झालें कोठून ।
पहा हें
निर्मनुष्य अरण्य । येथें तुम्ही भेटलेती ॥२९॥
व्हाल तुम्ही ईश्वरु । मातें कृपा
केली गुरु ।
तुम्हां
देखता मनोहरु । अंतःकरण स्थिर झालें ॥१३०॥
कीं होसील कृपाळू । सत्त्वप्रिय
भक्तवत्सलू ।
मी दास
तुझा करीं सांभाळू । म्हणोनि चरणीं लागला ॥३१॥
नमितां तया बाळकासी । उठवीतसे
तापसी ।
आलिंगोनि
महाहर्षी । आश्वासीतसे तये वेळीं ॥३२॥
मग पुशिला वृत्तान्त । बाळ सांगे
समस्त ।
गुरुंनीं
जी जी मागितली वस्त । कवणेंपरी साध्य होय ॥३३॥
आपण बाळ ब्रह्मचारी । न होय
कार्य तें अंगिकारीं ।
आतां
पडिलों चिंतासागरीं । तारीं स्वामी म्हणतसे ॥३४॥
मग अभय देऊनि अवधूत । तया
बाळातें म्हणत ।
सांगेन
तुज एक हित । जेणें तुझें कार्य साधे ॥३५॥
विश्वेश्वर आराधन । असे एक निधान
।
काशीपूर
महास्थान । सकळाभीष्टें साधती ॥३६॥
पंचक्रोश असे क्षिति । तया आगळी
विख्याति ।
विष्णुमुख्य
ऋषि प्रजापति । तेथें वर लाधले ॥३७॥
ब्रह्मा सृष्टि रचावयासी । वर
लाधला त्या स्थळासी ।
वर दिधला
विष्णूसी । समस्त सृष्टि पाळावया ॥३८॥
काशीपूर महास्थान । तुवां तेथें
जातांचि जाण ।
होईल तुझी
कामना पूर्ण । संदेह न धरीं मनांत ॥३९॥
तुवां जावें त्वरितेंसी । जें
जें वसे तव मानसीं ।
समस्त
विद्या लाधसी । विश्वकर्मा तूंचि जाण ॥१४०॥
चतुर्विध पुरुषार्थ । साध्य
होतील त्वरित ।
यापरीस
आणिक स्वार्थ । काय असे सांग मज ॥४१॥
तोचि देव असे दयाळ । विचित्र असे
त्याचा खेळ ।
उपमन्यु
म्हणोनि होता बाळ । तयातें दिधला क्षीरसिंधु ॥४२॥
नामें आनंदकानन । विख्यात असे
महास्थान ।
समस्तांची
कामना पूर्ण । तये ठायीं होतसे ॥४३॥
नाम असे पुरी काशी । समस्त
धर्मांची हे राशी ।
सकळ
जीवजंतूंसी । मोक्षस्थान परियेसा ॥४४॥
जे वास करिती तये स्थानीं ।
त्यांतें देखताचि नयनीं ।
जाती दोष
पळोनि । स्थानमहिमा काय सांगूं ॥४५॥
ऐसें काशीस्थान असतां । कां बा
करिसी तूं चिंता ।
तेथील
महिमा वर्णितां । अशक्य माझे जिव्हेसी ॥४६॥
तया काशीनगरांत । जे जन तीर्थे
हिंडत ।
एकेक
पाउलीं पुण्य बहुत । अश्वमेधफळ असे ॥४७॥
धर्म अर्थ काम मोक्ष । जी जी
मनीं असे कांक्ष ।
जातांचि
होईल प्रत्यक्ष । संदेह न धरीं मनांत ॥४८॥
ऐकोनिया ब्रह्मचारी । साष्टांगीं
नमस्कारी ।
कोठें असे
काशीपुरी । आपण असे अरण्यात ॥४९॥
आनंदकानन म्हणसी । स्वर्गीं असे
कीं भूमीसी ।
अथवा जाऊं
पाताळासी । कोठें असे सांगा मज ॥१५०॥
या संसारसागरासी । तूंचि तारक
जगा होसी ।
ज्ञान
मातें उपदेशीं । तारीं मातें स्वामिया ॥५१॥
ऐशिया काशीपुरासी । मातें कोण
नेईल हर्षीं ।
विनवूं
जरी तुम्हांसी । घेवोनि जावें म्हणोनिया ॥५२॥
कार्य असलिया तुम्हांसी । आम्हां
कैसी बुद्धि देशी ।
मी बाळक
तुम्हांसी । म्हणोनि चरणीं लागला ॥५३॥
ऐसें म्हणता तापसी । आपण नेईन
म्हणे हर्षी ।
तुजकरितां
आपणासी । यात्रालाभ घडे थोर ॥५४॥
यापरतें आम्हांसी । काय लाभ
विशेषीं ।
वृथा जन्म
मानवासी । काशीवास न करितां ॥५५॥
तुजकरितां आपणासी । दर्शन घडे
पुरी काशी ।
चला जाऊं
त्वरितेंसी । म्हणोनि दोघे निघाले ॥५६॥
मनोवेगें तात्काळीं । पातले
विश्वेश्वराजवळीं ।
तापसी
म्हणे तये वेळीं । बाळका यात्रा करीं आतां ॥५७॥
बाळ म्हणें तयासी । स्वामी मातें
निरोप देसी ।
नेणें
यात्रा आहे कैसी । कवणेंपरी रहाटावें ॥५८॥
आपण बाळ ब्रह्मचारी । नेणें
तीर्थ कवणेंपरी ।
कवणें
विधिपुरःसरीं । विस्तारोनि सांगा मज ॥५९॥
तापसी म्हणे तयासी । सांगेन
यात्राविधीसी ।
तुंवा करावें
भावेंसी । नेमें भक्तिपूर्वक ॥१६०॥
पहिलें मणिकर्णिकेसी । स्नान
करणें नेमेंसी ।
जाऊनिया
विनायकासी । पांचाळेश्वरा नमावें ॥६१॥
मग जावें महाद्वारा ।
विश्वेश्वरदर्शन करा ।
पुनरपि
यावें गंगातीरा । मणिकर्णिकास्नान करावें ॥६२॥
मणिकर्णिकेचा ईश्वर । पूजूनिया
निर्धार ।
जाऊनिया
कंबळेश्वर । पूजा करीं गा भावेंसी ॥६३॥
पुढें ईश्वरवासुकीसी । पूजा करी
भक्तींसी ।
पर्वतेश्वर
पूजोनि हर्षी । गंगाकेशव पूजीं मग ॥६४॥
ललिता देवी पूजोनि । मग जावें
तेथूनि ।
जरासंधेश्वर
ध्यानीं । पूजा करीं गा भक्तींसी ॥६५॥
सोमनाथ असे थोर पूजावा शूळटंकेश्वर
।
तयापुढें
वाराहेश्वर । पूजा करीं गा ब्रह्मेश्वरी ॥६६॥
अगस्त्येश्वर कश्यपासी । पूजा
करीं हरिहरेश्वरासी ।
वैजनाथ
महाहर्षी । ध्रुवेश्वर पूजीं मग ॥६७॥
गोकर्णेश्वर असे थोर । पूजा करीं
गा हाटकेश्वर ।
अस्थिक्षेप
तटाकेश्वर । किंकरेश्वर पूजावा ॥६८॥
भारतभूतेश्वरासी । पूजा करीं गा
भावेंसी ।
चित्रगुप्तेश्वरासी
। चित्रघंट पूजावा ॥६९॥
पाशुपतेश्वर निका । पूजा करोनि
तेथें बाळका ।
पितामह
असे जो का । ईश्वरातें पूजावें ॥१७०॥
कल्लेश्वरातें वंदूनी । पुढें
जावें एक मनीं ।
चंद्रेश्वरातें
पूजोनि । पूजा करीं गा विश्वेश्वरा ॥७१॥
पुढें पूजीं विघ्नेश्वर ।
त्यानंतर अग्नीश्वर ।
मग पूजा
नागेश्वर । हरिश्चंद्रेश्वर पूजीं जाण ॥७२॥
चिंतामणि विनायका । सोमनाथ
विनायक देखा ।
पूजा
करोनि ऐका । वसिष्ठ वामदेव पूजावा ॥७३॥
पुढें त्रिसंध्येश्वर । पूजीं
लिंग असे थोर ।
विशालाक्ष
मनोहर । धर्मेश्वर पूजावा ॥७४॥
विश्वबाहु पूजा निका । पुढें
आशा-विनायका ।
वृद्धादित्य
असे जो का । पूजा करीं वो मनोभावें ॥७५॥
चतुर्वक्रेश्वर असे थोर । लिंग
असे मनोहर ।
पूजा करीं
गा ब्रह्मेश्वर । अनुक्रमें करुनिया ॥७६॥
पुनः प्रकामेश्वर असे खूण ।
पुढें ईश्वरईशान ।
चंडी
चंडेश्वरा जाण । पूजा करीं भक्तींसी ॥७७॥
पूजीं भवानीशंकर । धुंडिराज
मनोहर ।
अर्ची
राजराजेश्वर । लंगूलेश्वर पूजीं मग ॥७८॥
नकुलेश्वर पूजेसी । तुवां जावें
भक्तींसी ।
परान्नपरद्रव्येश्वरासी
। पाणिग्रहणेश्वर पूजीं मग ॥७९॥
गंगेश्वर मोरेश्वर पूजोन ।
ज्ञानवापीं करीं स्नान ।
ज्ञानेश्वर
अर्चून । नंदिकेश्वर पूजीं मग ॥१८०॥
निष्कलंकेश्वर थोर । लिंग असे
मनोहर ।
पूजीं
मार्कंडेयेश्वर । असुरेश्वर पूजीं मग ॥८१॥
तारकेश्वर असे थोर । लिंग बहु
मनोहर ।
पूजा
महाकाळेश्वर । दंडपाणि पूजीं मग ॥८२॥
महेश्वरातें पूजोनि । अर्ची
मोक्षेश्वर ध्यानीं ।
वीरभद्रेश्वरसुमनीं
। पूजा करीं गा बाळका ॥८३॥
अविमुक्तेश्वरापासीं । तुवां
जाऊनियां हर्षी ।
पूजा करीं
गा भावेंसी । मोदादि पंच विनायका ॥८४॥
आनंदभैरवपूजा करीं । पुनरपि जाय
महाद्वारीं ।
जेथें असे
मन्मथारि। विश्वनाथ पूजावा ॥८५॥
बाळा तूंचि येणेंपरी ।
अंतरगृहयात्रा करीं ।
मुक्तिमंडपाभीतरीं
जाऊनिया मंत्र म्हणावा ॥८६॥
श्लोक ॥ अंतर्गृहस्य यात्रेयं
यथावद्या मया कृता ।
न्यूनातिरिक्तया
शंभुः प्रीयतामनया विभुः ॥१॥
इति मंत्रं समुच्चार्य क्षणं वै
मुक्तिमान्भवेत् ।
विश्रम्य
यायाद्भवने निष्पापः पुण्यभाग्भवेत् ॥२॥
ऐसा मंत्र जपून । विश्वनाथातें
नमून ।
मग निघावें
तेथून । दक्षिणमानसयात्रेसी ॥८७॥
मणिकर्णिकेसी जाउनी । स्नान
उत्तरवाहिनी ।
विश्वनाथातें
पूजोनि । संकल्पावें यात्रेसी ॥८८॥
तेथोनि निघावें हर्षीं । मोदादि
पंच विनायकांसी ।
पूजा करीं
गा भक्तींसी । धुंडिराज पूजीं मग ॥८९॥
पूजीं भवानीशंकर । दंडपाणि नमन
कर ।
विशालाक्षा
अवधार । पूजा तुम्ही भक्तींसी ॥१९०॥
स्नान धर्मकूपेसी । श्राद्धविधि
करा हर्षीं ।
पूजा
धर्मेश्वरासी । गंगाकेशव पूजीं मग ॥९१॥
पूजावी देवी ललिता । जरासंघेश्वर
नमितां ।
पूजीं मग
सोमनाथा । वराहेश्वरा भक्तींसी ॥९२॥
दशाश्वमेधतीर्थेसी । स्नान करीं
श्राद्धेंसी ।
प्रयागतीर्थें
परियेसीं । स्नान श्राद्ध करावें ॥९३॥
पूजोनिया प्रयागेश्वरासी । दशाश्वमेध
ईश्वरासी ।
पूजा करीं
गा भक्तींसी । शीतलेश्वर अर्चीं मग ॥९४॥
अर्ची मग वंदि देवी । सर्वेश्वर
मनोभावीं ।
धुंडिराज
भक्ति पूर्वीं । पूजा करीं गा ब्रह्मचारी ॥९५॥
तिळभांडेश्वर देखा । पूजा करोनि
पुढें ऐका ।
रेवाकुंडीं
स्नान निका । मानससरोवरीं मग स्नान ॥९६॥
श्राद्धादि पितृतर्पण ।
मानसेश्वर मग पूजोन ।
मनकामना
पावे जाण । ऐक बाळा ब्रह्मचारी ॥९७॥
केदारकुंडीं स्नान । करावें
तेथें तर्पण ।
केदारेश्वर
पूजोन । गौरीकुंडीं स्नान करा ॥९८॥
पूजीं वृद्धकेदारेश्वर । पूजीं
मग हनुमंतेश्वर ।
पूजोनिया
रामेश्वर । स्नान श्राध्द कृमिकुंडीं ॥९९॥
सिद्धेश्वरा करीं नमन । करुनि
स्वप्नकुंडीं स्नान ।
स्वप्नेश्वर
पूजोन । स्नान करीं गा संगमांत ॥२००॥
संगमेश्वर पूजोन । लोलार्ककूपीं
करीं स्नान ।
श्राद्धकर्म
आचरोन । गतिप्रदीप ईश्वरासी ॥१॥
पूजीं अर्कविनायका ।
पाराशरेश्वरा अधिका ।
पूजा
करोनि बाळका । सन्निहत्य कुंडीं स्नान करीं ॥२॥
कुरुक्षेत्र कुंड देखा । स्नान
करावें विशेखा ।
सुवर्णादि
दानादिका । तेथें तुम्हीं करावें ॥३॥
अमृतकुंडीं स्नान निका । पूजीं
दुर्गा विनायका ।
दुर्गादेवीसी
बाळका । पूजा करीं मनोभावें ॥४॥
पुढें चौसष्ट योगिनी । पूजा
करीं गा मनकामनीं ।
कुक्कुट
द्विजातें वंदुनी । मंत्र तेथें जपावा ॥५॥
श्लोक ॥ वाराणस्यां दक्षिणे भागे
कुक्कुटो नाम वै द्विजः ।
तस्य
स्मरणमात्रेण दुःस्वप्नः सुस्वप्नो भवेत् ॥६॥
पुढें मासोपवासासी । पूजिजे
गोबाईसी ।
सात कवडया
घालूनिया तिसी । नमन भावें करावें ॥७॥
पूजा करीं रेणुकेसी । पुढें
स्नान करीं हर्षी ।
शंखोद्धारकुंडेसी
। शंखविष्णु पूजिजे ॥८॥
कामाक्षिकुंडीं करीं स्नान ।
कामाक्षिदेवी पूजोन ।
अयोध्याकुंडीं
करीं स्नान । सीताराम पूजावा ॥९॥
लवांकुशकुंडीं करीं स्नान ।
लवांकुशातें पूजोन ।
लक्ष्मीकुंडीं
करीं स्नान । लक्ष्मीनारायण पूजावा ॥२१०॥
सूर्यकुंडीं करीं स्नान ।
श्राद्धकर्म आचरोन ।
सांबादित्य
पूजोन । जावें पुढें बाळका ॥११॥
वैजनाथकुंड बरवें । तेथें स्नान
तुवां करावें ।
वैजनाथातें
पूजावें । एकभावेंकरुनिया ॥१२॥
गोदावरीकुंडेसी । स्नान करा
भक्तींसी ।
गौतमेश्वर
लिंगासी । पूजीं बाळ ब्रह्मचारी ॥१३॥
अगस्तिकुंडीं जावोनि ।
अगस्तेश्वरा नमूनि ।
स्नान
करीं मनापासोनि । पूजा करीं भक्तिभावें ॥१४॥
शुक्रकूपीं करीं स्नान । करी
शुक्रेश्वर अर्चन ।
मग पुढें
अन्नपूर्णा नमून । पूजा करीं भावेंसी ॥१५॥
धुंडिराजातें पूजोन । ज्ञानवापीं
करीं स्नान ।
ज्ञानेश्वर
अर्चोन । दंडपाणि पूजावा ॥१६॥
आनंदभैरव वंदोनि । महाद्वारा
जाऊनि ।
साष्टांगेसी
नमोनि । विश्वनाथा अर्चिजे ॥१७॥
ऐसें दक्षिणमानस । यात्रा असे
विशेष ।
ब्रह्मचारी
करी हर्ष । योगिराज सांगतसे ॥१८॥
आतां उत्तरमानसासी । सांगेन विधि
आहे कैशी ।
संकल्प
करोनिया हर्षी । निघावें तुवां बाळका ॥१९॥
जावें पंचगंगेसी । स्नान करीं
महाहर्षी ।
कोटिजन्मपाप
नाशी । प्रख्यात असे पुराणीं ॥२२०॥
पंचगंगा प्रख्यात नामें । सांगेन
असतीं उत्तमें ।
किरणा
धूतपापा नामें । तिसरी पुण्यसरस्वती ॥२१॥
गंगा यमुना मिळोनी । पांचही
ख्याति जाणोनि ।
नामें
असती सगुणी । ऐक बाळा एकचित्तें ॥२२॥
कृतयुगीं त्या नदीसी । धर्मनदी
म्हणती हर्षी ।
धूतपापा
नाम तिसी । त्रेतायुगीं अवधारा ॥२३॥
बिंदुतीर्थ द्वारापासी । नाम जाण
विस्तारेंसी ।
कलियुगाभीतरीं
तिसी । नाम झालें पंचगंगा ॥२४॥
प्रयागासी माघमासीं । स्नान
करितां फळें जैसीं ।
कोटिगुण
पंचगंगेसी । त्याहूनि पुण्य अधिक असे ॥२५॥
ऐशापरी पंचगंगेसी । स्नान करीं
गा भावेंसी ।
बिंदुमाधवपूजेसी
। पूजा करीं गा केशवा ॥२६॥
गोपालकृष्ण पूजोनि । जावें नृसिंहभुवनीं
।
मंगळागौरी
वंदोनि । गभस्तेश्वर पूजावा ॥२७॥
मयूखादित्यपूजेसी । तुवां जावें
भक्तींसी ।
पुनरपि
जावें हर्षी । विश्वेश्वरदर्शना ॥२८॥
मागुती मुक्तिमंडपासी । तुवां
जावें भक्तींसी ।
संकल्पावें
विधींसी । निघावें उत्तरमानसा ॥२९॥
मग निघा तेथून । आदित्यातें
पूजोन ।
अमर्दकेश्वर
अर्चोन । पापभक्षेश्वरा पूजिजे ॥२३०॥
नवग्रहातें पूजोनि । काळभैरवातें
वंदूनि ।
क्षेत्रपाळातें
अर्चोनि । काळकूपीं स्नान करीं ॥३१॥
पूजा करोनि काळेश्वरा ।
हंसतीर्थी स्नान करा ।
श्राद्धपितृकर्म
सारा । ऐक बाळा एकचित्तें ॥३२॥
कृत्तिवासेश्वरा देखा । पूजा
करोनि बाळका ।
पुढें
जाऊनि ऐका । शंखवापीं स्नान करीं ॥३३॥
तेथें आचमन करोनि । रत्नेश्वरातें
पूजोनि ।
सीतेश्वरा
अर्चोनि । दक्षेश्वर पूजीं मग ॥३४॥
चतुर्वक्रेश्वरीं पूजा । करीं वो
बाळा तूं वोजा ।
पुढें
स्नान करणें काजा । वृद्धकाळकूपा जावें ॥३५॥
काळेश्वराचे पूजेसी । तुवां
जावें भक्तींसी ।
अपमृत्येश्वरा
हर्षी । पूजा करीं गा बाळका ॥३६॥
मंदाकिनी स्नान करणें ।
मध्यमेश्वरातें पूजणें ।
तेथोनि मग
पुढें जाणें । जंबुकेश्वर पूजावया ॥३७॥
वक्रतुंडपूजेसी । तुवां जावें
भक्तींसी ।
दंडखात
कूपेसी । स्नान श्राद्ध तूं करीं ॥३८॥
पुढें भूतभैरवासी । पूजिजे
ईशानेश्वरासी ।
जैगीषव्यगुहेसी
। नमन करुनि पुढें जावें ॥३९॥
घंटाकुंडीं स्नान करीं । व्यासेश्वरातें
अर्चन करीं ।
कंदुकेश्वरातें
अवधारीं । पूजा करीं गा भक्तींसी ॥२४०॥
ज्येष्ठवापीं स्नान करणें ।
ज्येष्ठेश्वरातें पूजणें ।
सवेंचि
तुवां पुढें जाणें । स्नान सप्तसागरांत ॥४१॥
तेथोनि वाल्मीकेश्वरासी । पूजा
करीं गा भक्तींसी ।
भीमलोटा
जाऊनि हर्षी । भीमेश्वर पूजावा ॥४२॥
मातृ-पितृकुंडेसी । करणें
श्राद्धविधीसी ।
पिशाचमोचन
तीर्थेसी । पुढें जावें अवधारा ॥४३॥
पुढें कपर्दिकेश्वरासी । पूजा करीं
गा भक्तींसी ।
कर्कोटकवापीसी
। स्नान करीं गा बाळका ॥४४॥
कर्कोटकेश्वरासी । पूजा करीं गा
भक्तींसी ।
पुढें
ईश्वरगंगेसी । स्नान दान करावें ॥४५॥
अग्नीश्वराचे पूजेसी ।
चक्रकुंडीं स्नानासी ।
तुंवा
जावें भक्तींसी । श्राद्धकर्म करावें ॥४६॥
उत्तरार्क पूजोन । मत्स्योदरीं
करीं स्नान ।
ओंकारेश्वर
अर्चोन । कपिलेश्वर पूजीं मग ॥४७॥
ऋणमोचन तीर्थेसी । श्राद्धादि
करावीं भक्तींसी ।
पापविमोचनतीर्थेसी
। स्नानादि श्राद्धें करावीं ॥४८॥
तीर्थ कपालमोचन । स्नान श्राद्ध
तर्पण ।
कुलस्तंभाप्रती
जाऊन । पूजा करीं गा भक्तींसी ॥४९॥
असे तीर्थ वैतरणी । श्राद्ध
करावें तेथें स्नानीं ।
विधिपूर्वक
गोदानीं । देतां पुण्य बहुत असे ॥२५०॥
मग जावें कपिलधारा । स्नान
श्राद्ध तुम्ही करा ।
सवत्सेसी
द्विजवरा । गोदान द्यावें परियेसा ॥५१॥
वृषभध्वजातें पूजोन । मग निघावें
तेथून ।
ज्वालानृसिंह
वंदोन । वरुणासंगमीं तुम्हीं जावें ॥५२॥
स्नान श्राद्ध करोनि ।
केशवादित्य पूजोनि ।
आदिकेशव
अर्चोनि । पुढें जावें परियेसा ॥५३॥
प्रल्हादतीर्थ असे बरवें । स्नान
श्राद्ध तुवां करावें ।
प्रल्हादेश्वरातें
पूजावें । एकभावें परियेसा ॥५४॥
कपिलधारा तीर्थ थोर । स्नान
करावें मनोहर ।
पूजोनि
त्रिलोचनेश्वर । असंख्यातेश्वरा पूजिजे ॥५५॥
पुढें जावें महादेवासी । पूजा
करीं गा भक्तींसी ।
द्रुपदेश्वर
सादरेंसी । एकभावें अर्चावा ॥५६॥
गंगायमुनासरस्वतींशीं । तिन्ही
लिंगें विशेषीं ।
पूजा करीं
गा भक्तींसी । काम्यतीर्थ पाहें मग ॥५७॥
कामेश्वरातें पूजोनि ।
गोप्रतारतीर्थ स्नानीं ।
पंचगंगेसी
जाऊनि । स्नान मागुतीं करावें ॥५८॥
मणिकर्णिकास्नान करणें ।
जलशायीतें पूजणें ।
हनुमंतातें
नमन करणें । मोदादि पंच विनायकांसी ॥५९॥
पूजा अन्नपूर्णेसी । धुंडिराज
परियेसीं ।
ज्ञानवापीं
स्नानेंसी । ज्ञानेश्वर पूजावा ॥२६०॥
पूजीं दंडपाणीसी ।
मोक्षलक्ष्मीविलासासी ।
पूजा
पंचपांडवासी । द्रौपदीदुपदविनायका ॥६१॥
पूजा आनंदभैरवासी ।
अविमुक्तेश्वर हर्षीं ।
पूजोनिया
संभ्रमेंसी । विश्वनाथ संमुख सांगें ॥६२॥
श्लोक ॥ उत्तरमानसयात्रेयं
यथावद्या मया कृता ।
न्यूनातिरिक्तया
शंभुः प्रीयतामनया विभुः ॥६३॥
ऐसा मंत्र जपोनि । साष्टांगें
नमस्कारुनि ।
मग
निघावें तेथोनि । पंचक्रोशयात्रेसी ॥६४॥
सिद्ध म्हणे नामधारकासी ।
गुरुचरित्र ऐकतां संतोषीं ।
येणेंचि
तूं पावशी । चारी पुरुषार्थ इह सौख्य ॥६५॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे
गुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां होय
मनोहर । सकळाभीष्टे साधिजे ॥६६॥
इति श्रीगुरुचरित्रामृत ।
काशीखंडीं यात्रा निरोपित ।
कथा असती
पुराणविख्यात । एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥२६७॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे काशीमहायात्रानिरुपणं नाम
एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४१॥
॥ ओवीसंख्या ॥२६७॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु
॥
No comments:
Post a Comment