॥ श्रीगणेशाय नमः ॥
पतिव्रतेचिया रिति । सांगे देवा
बृहस्पति ।
सहगमनी फलश्रुति । येणेपरी
निरोपिली ॥१॥
विधवापणाचा आचारू । सांगता झाला
देववरू ।
पुसताती ऋषेश्वरू । ऐका श्रोते
एकचित्ते ॥२॥
जवळी नसता आपुला पति । त्याते
मरण झालिया प्राप्ति ।
काय करावे त्याचे सती । सहगमन
केवी करावे ॥३॥
अथवा असेल गरोदरी । असे तीते
कन्याकुमरी ।
काय करावे तिये नारी । म्हणून
विनविती गुरूसी ॥४॥
ऐकोनि देवांचे वचन । सांगता जाला
विस्तारोन ।
एकचित्ते करून । ऐका श्रोते सकळ
॥५॥
पति जवळी असे जरी । सहगमनी जावे
तिये नारी ।
असता आपण गरोदरी । करू नये सहगमन
॥६॥
स्तनपानी असता कुमारू । तिणे
करिता पाप थोरू ।
पुरुष मेला असेल दुरू । सहगमन
करू नये ॥७॥
तिणे असावे विधवापणे ।
विधिपूर्वक आचरणे ।
सहगमासमाने । असे पुण्य परियेसा
॥८॥
विधवापणाचा आचारू । करिता असे
पुण्य थोरू ।
निवर्तता आपुला भ्रतारू । केशवपन
करावे ॥९॥
ज्या का विधवा केश राखिती ।
त्यांची ऐका फलश्रुति ।
केश पुरुषासी बाधिती । नरकापरी
परियेसा ॥१०॥
यास्तव करणे केशवपण । करावे तिणे
नित्य स्नान ।
एक वेळा भोजन । करावे तिणे
परियेसा ॥११॥
एक धान्याचे अन्न । करावे तिणे
भोजन ।
तीन दिवस उपोषण । करावे तिणे
भक्तीने ॥१२॥
पाच दिवस पक्षमासास । करावा तिणे
उपवास ।
अथवा चांद्रायणग्रास । भोजन करणे
परियेसा ॥१३॥
चंद्रोदय बीजेसी । एक ग्रास तया
दिवसी ।
चढते घ्यावे पंधरा दिवसी ।
पौर्णिमेसी भोजन ॥१४॥
कृष्णपक्षी येणेपरी । ग्रास
घ्यावे उतरत नारी ।
अमावास्या येता जरी । एक ग्रास
जेवावा ॥१५॥
शक्ति नाही जियेसी । एकान्न
जेवावे परियेसी ।
अथवा फल-आहारेसी । अथवा
शाका-आहार देखा ॥१६॥
अथवा घ्यावे क्षीर मात्र । कधी न
घ्यावे अपवित्र ।
जेणे राहे प्राण मात्र ।
श्वासोच्छ्वास चाले ऐसे ॥१७॥
शयन करिता मंचकावरी । पुरुष घाली
रौरव घोरी ।
भोगी नरक निरंतरी । पतीसहित
परियेसा ॥१८॥
करू नये मंगलस्नान । अथवा
देहमर्दन ।
गंध परिमल तांबूल जाण । पुष्पादि
तिणे वर्जावे ॥१९॥
पुत्रावीण असे नारी । करणे तर्पण
पुत्रापरी ।
तीळ दर्भ कुशधारी । गोत्रनाम
उच्चारावे ॥२०॥
विष्णुपूजा करावी नित्य । आपुला
पुरुष हा निश्चित ।
पुरुष आठवोनि चित्त ।
विष्णुस्थानी मानिजे ॥२१॥
पुरुष असता जेणेपरी । पतिनिरोपे
आचार करी ।
तेणेचि रीती विष्णु अवधारी ।
त्याचे निरोपे आचरावे ॥२२॥
तीर्थयात्रा उपासव्रत ।
विष्णुनिरोपे करावे निश्चित ।
अथवा गुरु द्विज विख्यात ।
त्यांचे निरोपे आचरावे ॥२३॥
आपण असता सुवासिनी । ज्या
वस्तूची प्रीति अंतःकरणी ।
तैशी वस्तु द्यावी धणी ।
विद्वज्जनविप्रांसी ॥२४॥
वैशाख माघ कार्तिकमास । अनेक
स्नानी आचारविशेष ।
माघस्नान तीर्थास । विष्णुस्मरणे
करावे ॥२५॥
वैशाखी जळकुंभदान । कार्तिकी
दीपआराधन ।
ब्राह्मणा द्यावे घृतदान ।
यथाशक्त्या दक्षिणेसी ॥२६॥
माघमासी तिळघृतेसी । द्यावे दान
विप्रांसी ।
अरण्यात वैशाखमासी । पोई घालिजे
निर्मळोदके ॥२७॥
शिवालयी ईश्वरावरी । गळती ठेविजे
निर्मळ वारी ।
गंध परिमळ पूजा करी । तेणे पुण्य
अगाध ॥२८॥
विप्राचिया घरोघरी । उदक घालिजे
शक्त्यानुसारी ।
अन्न द्यावे निर्धारी ।
अतिथिकाळी परियेसा ॥२९॥
तीर्थयात्रे जात्या लोका ।
त्याते द्याव्या छत्रपादुका ।
येता आपल्या गृहांतिका ।
पादप्रक्षालन करावे ॥३०॥
वारा घालावा विझणेसी । वस्त्र
द्यावे परिधानासी ।
गंध तांबूल परिमळासी । कर्पूरवेलादि
परियेसा ॥३१॥
जलपात्र द्यावे शक्तीसी । गुडपान
आम्रपानेसी ।
द्राक्षे कर्दळीफळेसी ।
ब्राह्मणा द्यावे मनोहर ॥३२॥
जे जे दान द्यावे द्विजा ।
पतीच्या नावे अर्पिजे वोजा ।
संकल्पून पुरुषकाजा । धर्म करणे
येणेपरी ॥३३॥
कार्तिकमासी जवान्न । अथवा
जेविजे एकान्न ।
वृताक माष मसूर लवण । तैलादि मधु
वर्जावे ॥३४॥
वर्जावे कास्यपात्र । आणिक
वर्जावे द्विदलमात्र ।
मनी असावे पवित्र । एकाग्रेसी
परियेसा ॥३५॥
पलाशपात्री भोजन करावे । शुचि
उद्यापन करावे ।
जे जे व्रत धराते । त्याते
उजवावे तत्त्वता ॥३६॥
घृतभरित कास्यपात्र । विप्रा
द्यावे पवित्र ।
भूमिशयन केले व्रत । मंचक द्यावा
विप्रासी ॥३७॥
जे जे वस्तु त्यजिली आपण । ते ते
द्यावी ब्राह्मणालागून ।
रसद्रव्ये एक मास जाण । त्याग
करावी परियेसा ॥३८॥
त्यजूनिया दधि क्षीर । उद्यापन
आचार मनोहर ।
असलिया शक्त्यनुसार । धेनु
द्यावी सालंकृत ॥३९॥
विशेषे असे आणिक व्रत । दीपदान
असे ख्यात ।
वर्णिता महिमा अनंत । देवांसी
म्हणे बृहस्पति ॥४०॥
दीपदान भाग सोळा । वरकड नसती
धर्म सकळा ।
या कारणे अनंतफळा । दीपदान करावे
॥४१॥
माघस्नान माघमासी । करणे
सूर्योदयासी ।
येणेपरी एक मासी । आचरावे
भक्तीने ॥४२॥
लाडू तिळ खर्जुरेसी । करूनि
पक्वान्ने ब्राह्मणांसी ।
द्यावी तिणे भक्तीसी ।
दक्षिणेसहित जाणा ॥४३॥
शर्करा मिरे एळेसी । तळून अपूप
घृतेसी ।
दान द्यावे यतीसी । भोजन द्यावे
अतीता ॥४४॥
हेमंतऋतु होता जाण । व्हावया
शीतनिवारण ।
काष्ठे द्यावी विप्राकारणे ।
वस्त्रे द्यावी द्विजांसी ॥४५॥
पर्यंक द्यावा सुषुप्तीसी ।
एखाद्या भल्या ब्राह्मणासी ।
चित्र रक्त वस्त्रेसी । कंबळ
द्यावे विप्रवर्गा ॥४६॥
व्हावया शीतनिवारण । औषध द्यावे
उष्ण उष्ण ।
तांबूलदान परिपूर्ण । द्यावे
एळाकर्पूरेसी ॥४७॥
गृहदान द्यावे विप्रासी ।
सांवत्सरिक ग्रामेसी ।
जाता तीर्थयात्रेसी । पादरक्षा
देईजे ॥४८॥
गंध परिमळ पुष्पेसी । पूजा करावी
केशवासी ।
रुद्राभिषेक विधींसी । अभिषेकावा
गौरीहर ॥४९॥
धूप दीप नैवेद्यसी । पूजा करावी
षोडशी ।
प्रीति बहु शंकरासी । दीपमाळा
उजळिता ॥५०॥
आणिक सुगंध गंधेसी । तांबूलदान
विधींसी ।
कर्पूरलवंगादि विविधेसी ।
भक्तिभावे अर्पिजे ॥५१॥
आपला पुरुष ध्यावोनि मनी ।
नारायण तो म्हणोनि ।
पूजा करावी एके मनी । भक्तिभावे
परियेसा ॥५२॥
नेमे असावे तिये नारी । न बैसावे
बैलावरी ।
लेवू नये चोळी करी । श्वेतवस्त्र
नेसावे ॥५३॥
रक्त कृष्ण चित्र वस्त्र । लेता
जाण दोष बहुत ।
आणिक असे व्रत । पुत्राचे बोल
वर्तावे ॥५४॥
’आत्मा वै पुत्र नाम’ । म्हणून बोलती वेदागम ।
पतीपासून पुत्रजन्म ।
पुत्रआज्ञेत असावे ॥५५॥
ऐसा आचार विधवेसी । असे शास्त्रपुराणेसी
।
जरी आचरती भक्तीसी । सहगमनाचे फळ
असे ॥५६॥
पापी जरी पति असला । असेल पूर्वी
निवर्तला ।
नरकामध्ये वास्ल केला । पापरूपे
भुंजत ॥५७॥
विधवापणे येणेपरी । आचरण करी जे
नारी ।
मरण होता अवसरी । घेवोनि पति
स्वर्गी जाय ॥५८॥
जितुक्या परी बृहस्पति । सांगे
समस्त देवांप्रती ।
लोपामुद्रेची केली स्तुति ।
पतिव्रताशिरोमणि ॥५९॥
जितुक्या पतिव्रता नारी । समस्त
भागीरथी सरी ।
त्यांचे पुरुष शंकरापरी । पूजा
करावी दोघांची ॥६०॥
ऐसे बृहस्पतीचे वचन । सांगितले
मनी विस्तारोन ।
ऐक बाळे तव मन । ज्यावरी प्रीति
तेचि करी ॥६१॥
दुःख सकळ त्यजोनि । मम बोल ठेवी
मनी ।
सांगितले तुजलागोनि । परलोकसाधन
॥६२॥
धैर्य जरी असेल तुजसी । सहगमन
करी पतीसरसी ।
विधवापणे आचार करिसी । तेही
पुण्य तितुकेची ॥६३॥
जे आवड तुझे मनी । सांग माये
विस्तारोनि ।
हस्त मस्तकी ठेवूनि । पुसतसे
प्रेमभावे ॥६४॥
ऐकोनि तया अवसरी । केले नमन तिये
नारी ।
विनवीतसे करुणोत्तरी । भक्तिभावे
करूनिया ॥६५॥
जय जयाजी योगीश्वरा । तूचि पिता
सहोदरा ।
माझा प्राण मनोहरा । जनक जननी
तूचि होसी ॥६६॥
आल्ये आपण परदेशात । जवळी नाही
बंधुभ्रात ।
भेटलेती तुम्ही परमार्थ ।
अंतकाळी सोयरा ॥६७॥
सांगितले तुम्ही आचार दोनी ।
कष्ट बहु विधवापणी ।
अशक्य आम्हा न-टाके स्वामी ।
असाधारण असे दातारा ॥६८॥
तारुण्यपण मजसी । लावण्य असे
देहासी ।
निंदापवाद शरीरासी । घडेल केवी
वर्तमान ॥६९॥
संतोष होतो माझे मनी । पुण्य
अपार सहगमनी ।
पतीसवे संतोषोनि । जाईन स्वामी
निर्धारे ॥७०॥
म्हणूनि मागुती नमस्कारी । माथा
ठेवी चरणांवरी ।
स्वामी माते तारी तारी । भवसागरी
बुडतसे ॥७१॥
करुणाकृपेचा सागर । उठवीतसे
योगेश्वर ।
देता झाला अभयकर । म्हणे पतीसवे
जावे ॥७२॥
तोचि ठाव पुरुषासी । जाय माते
सांगतेसी ।
सांगेन तुज विशेषी । ऐक माते
एकचित्ते ॥७३॥
आलात तुम्ही दर्शनी ।
श्रीगुरुभेटीलागोनि ।
आरोग्य होईल म्हणोनि ।
भक्तिभावेकरूनिया ॥७४॥
होणार झाली ब्रह्मकरणी । काळासी
जिंकिले नाही कोणी ।
जैशी ईश्वरनिर्वाणी । तैसेपरी
होतसे ॥७५॥
ब्रह्मलिखित न चुके जाण । जे जे
भोगणे असेल आपण ।
घडे तैसे श्रुतिवचन । दुःख कोणी
करू नये ॥७६॥
हरिश्चंद्र राजा देख । डोंबाघरी
वाहे उदका ।
बळी अजिंक्य ऐका । तोही गेला
पाताळा ॥७७॥
सहस्त्रकोटि वर्षे ज्यासी ।
आयुष्य असे रावणासी ।
काळ तयाप्रति ग्रासी ।
दुर्योदह्ना काय झाले ॥७८॥
भीष्मदेव इच्छारमनी । तेही पडले
रणांगणी ।
परीक्षिती सर्पाभेणी । लपता काय
झाले तया ॥७९॥
अनंत अवतार येणेपरी । होऊनि गेले
संसारी ।
देव दानव येणेपरी । सकळ काळाआधीन
॥८०॥
या कारणे काळासी । कोणी जिंकिले
नाही क्षितीसी ।
सकळ देवदानवांसी । काळ जिंकी
निर्धारे ॥८१॥
काळा जिंकिता नाही कोणी । एका
श्रीगुरुवाचोनि ।
भाव असे ज्याचे मनी । त्यासी
प्रत्यक्ष असे जाणा ॥८२॥
आता तुम्ही ऐसे करणे । जावे
त्वरित सहगमने ।
अंतकाळ होता क्षणे ।
श्रीगुरुदर्शना जाय म्हणे ॥८३॥
म्हणोनि भस्म तये वेळी । लाविता
झाला कपाळी ।
रुद्राक्ष चारी तत्काळी । देता
जहाला तये वेळी ॥८४॥
योगी बोले तियेसी । रुद्राक्ष
बांधी कंठासी ।
दोनी प्रेतकर्णासी । बांधोनि दहन
करावे ॥८५॥
आणिक एक सांगेन तुज । गुरुदर्शना
जाई सहज ।
रुद्रसूक्त म्हणती द्विज ।
गुरुचरण प्रक्षाळिता ॥८६॥
तेचि तीर्थ घेवोनि । आपुला देह
प्रोक्षोनि ।
प्रेतावरी आणोनि । प्रोक्षण
करावे भक्तीने ॥८७॥
मग जावे सहगमनेसी । वाणे द्यावी
सुवासिनींसी ।
अनेक द्रव्ये वेचूनि हर्षी ।
विप्रा तोषवावे बहुत ॥८८॥
ऐशा परी तियेसी । सांगोनि गेला
तापसी ।
पतिव्रता भावेसी । करी आयती त्या
वेळी ॥८९॥
भले ब्राह्मण बोलावूनि । षोडश
कर्मे आचरोनि ।
प्रेतासी प्रायश्चित्त देवोनि ।
औपासन करविताती ॥९०॥
सुस्नात होवोनि आपण । पीतांबर
नेसोन ।
सर्वाभरणे लेवोन । हळदी कुंकू
लावितसे ॥९१॥
औपासन प्रेतासी । करविताती
विधींसी ।
प्रेत बांधोनि काष्ठेसी । घेवोनि
गेले गंगेत ॥९२॥
अग्नि घेऊनि तळहातेसी । निघाली
पतिव्रता कैसी ।
आनंद बहु मानसी । प्रेतापुढे जातसे
॥९३॥
सोळा वरुषांचे तारुण्यपण । सुंदर
रुप लावण्य ।
ल्याइलीसे आभरणे । लक्ष्मीसरसी
दिसतसे ॥९४॥
मिळोनिया नगरनारी । पाहो आल्या
सहस्त्र चारी ।
माथा तुकविती सकळी । पतिव्रता
म्हणोनिया ॥९५॥
एक म्हणती काय नवल । पूर्ववयेसी
असे बाळ ।
काय दैव पूर्वफळ । पतीसवे जातसे
॥९६॥
देखिले नाही पतीचे मुख । नाही
जहाले की बाळक ।
कैसा जीव झाला एक । आनंदरूपे
जातसे ॥९७॥
म्हणती शिकवा इसी । वाया का हो
जीव देसी ।
परतूनि जाई माहेरासी । आपुल्या
मातापित्याजवळी ॥९८॥
एक म्हणती ज्ञानवंता । सत्य नारी
पतिव्रता ।
बुद्धि दे गा जगन्नाथा । सकळ
स्त्रिया ऐसीच ॥९९॥
धन्य इची मातापिता । बेचाळीस
उद्धरले आता ।
प्रेतापुढे चालता । एकैक पाउला
अश्वमेधफळ ॥१००॥
येणेपरी नदीतीरासी । गेली नारी
पतीसरसी ।
कुंड केले अग्नीसी । काष्ठे शेणी
अपरिमित ॥१॥
अग्निकुंडसन्निधेसी । ठेविले तया
प्रेतासी ।
बोलावोनि सुवासिनींसी । देई झाली
वाण देखा ॥२॥
सुपे चोळी कुंकुमेसी । हळदी काजळ
परियेसी ।
तोडर कंठसूत्रेसी । सुवासिनींसी
देतसे ॥३॥
गंधपुष्पादि परिमळेसी । पूजा
केली सुवासिनींसी ।
द्रव्य दिधले अपारेसी । समस्त
ब्राह्मणा तये वेळी ॥४॥
नमन करोनि समस्तांसी । निरोप
मागतसे हर्षी आपण जाते माहेरासी ।
लोभ असो द्यावा म्हणतसे ॥५॥
माझा पिता शूलपाणी । उमा गौरी
अंतःकरणी ।
आम्हा बोलाविले सगुणी ।
प्रेमभावे करूनिया ॥६॥
आली श्रावणी दिपवाळी । आम्ही
जातो मातेजवळी ।
पतीसहित मने निर्मळी । जाते लोभ
असो द्यावा ॥७॥
समागमे लोक आपुले । होते जे का
सवे आले ।
त्यांसी सांगतसे बाळे । परतोनि
जावे ग्रामासी ॥८॥
पुसता श्वशुरमामेसी । त्याते न
सांगावे परियेसी ।
प्राण देतील आम्हांसी । हत्या
तुम्हा घडेल ॥९॥
त्यासी तुम्ही सांगावे ऐसे ।
क्षेम आहे तीर्थवासे ।
भीमातीरस्थान ऐसे । श्रीगुरूचे
सन्निधानी ॥११०॥
आलो श्रीगुरुदर्शनासी । आरोग्य
झाले पतीसी ।
राहिलो आपण संतोषी । म्हणोनि
सांगा घरी आमुचे ॥११॥
ऐसे सांगा श्वशुरमामींसी । आमुचे
मातापितयादिकांसी ।
इष्टजन सोयरियांसी । सांगा
येणेपरी तुम्ही ॥१२॥
ऐसे वचन ऐकोन । दुःख पावले सकळ
जन ।
आपण असे हास्यवदन । प्रेताजवळी
उभी देखा ॥१३॥
अग्निकुंडी तये क्षणी । घालिताती
काष्ठ शेणी ।
तो आठवण झाली झणी । योगेश्वराचा
उपदेश ॥१४॥
मग रुद्राक्ष काढोनिया दोनी ।
बांधिले प्रेताचिया श्रवणी ।
कंठसूत्री दोन ठेवोनि । पुसतसे
ब्राह्मणांसी ॥१५॥
विनवीतसे द्विजांसी । संकल्प
केला म्या मानसी ।
श्रीगुरुमूर्ति आहे कैसी ।
आपल्या दृष्टी पाहीन ॥१६॥
दृष्टी देखोनिया स्वामीसी ।
त्वरित येईन अग्निकुंडापासी ।
आज्ञा झालिया वेगेसी । त्वरित
येईन म्हणतसे ॥१७॥
ऐकोनि तियेचे वचन । बोलताती
विद्वज्जन ।
दहन होता अस्तमान । त्वरित जाउनी
तुम्ही यावे ॥१८॥
पुसोनिया विप्रांसी । निघाली
नारी संगमासी ।
जेथे होता ह्रषीकेशी ।
श्रीनरसिंहसरस्वती ॥१९॥
सर्व येती नरनारी । विप्रमेळा
नानापरी ।
कौतुक पाहती मनोहरी । पतिव्रता
स्त्रियेची ॥१२०॥
जाता मार्गी स्तोत्र करी । म्हणे
स्वामी नरकेसरी ।
अभाग्य आपुले पूर्वापरी । म्हणोनि
आम्हा अव्हेरिले ॥२१॥
तूचि दाता सर्वेश्वर ।
शरणागतांचा आधार ।
ऐसे तुझे ब्रीद थोर । कामी आपण न
लाधेची ॥२२॥
हेळामात्रे त्रिभुवनासी । रची
स्वामी रजोगुणे सृष्टीसी ।
सत्त्वगुणे सृष्टीसी ।
प्रतिपाळिसी तूचि स्वामी ॥२३॥
तमोगुणे निश्चयेसी । प्रलय समस्त
जीवांसी ।
त्रिगुण तूचि होसी । त्रिमूर्ति
तूचि देवा ॥२४॥
तुजपाशी सर्व सिद्धि । ओळंघिती तव विधी ।
देखिली आमुची कुडी बुद्धि ।
जाणोनि माते अव्हेरिली ॥२५॥
एखादा नर बाधा करी । जाणोनि
सांगती राजद्वारी ।
क्षण न लागता अवसरी । राजा साह्य
करी तयांचे ॥२६॥
रोग होता मनुष्यासी । जाऊनिया
वैद्यापासी ।
औषध करी तात्काळेसी । आरोग्य तया
होतसे ॥२७॥
तू त्रिमूर्तीचा अवतार । ख्याति
झाली अपरंपार ।
सर्व भक्तजना आधार । म्हणोनि
सेविती सकळ जन ॥२८॥
अपराध आपण काय केले । भेटीसी वीस
गावे आले ।
मातापिता विसरले । तुझ्या ध्याने
स्वामिया ॥२९॥
होसी तूचि मातापिता । म्हणोनि
आल्ये धावता ।
भेटी होता आरोग्यता । पतीस
व्हावी म्हणोनिया ॥१३०॥
आपुले समान असती नारी । त्या
नांदता पुत्रपौत्री ।
आपण झाल्ये दगडापरी । पुत्र नाही
आपणासी ॥३१॥
पति आपुला सदा रोगी । कैचा पुत्र
आपणालागी ।
तरी याचि काम्यालागी । निघोनि
आल्ये स्वामिया ॥३२॥
आरोग्य होईल पतीसी । पुत्र होतील
आपणासी ।
आशा धरून मानसी । आल्ये स्वामी
कृपासिंधु ॥३३॥
पुरले माझे मनोरथ । आरोग्य झाला
प्राणनाथ ।
पुत्र झाले बहुत । नवल झाले
स्वामिया ॥३४॥
मनोरथ पावला सिद्धीसी । म्हणोनि
आल्ये पुसावयासी ।
जाते आता परलोकासी । कीर्ति तुझी
घेवोनि ॥३५॥
ऐशा परी ध्यान करीत । आली
अमरजासंगमी त्वरित ।
वृक्ष असे अश्वत्थ । देखती झाली
स्वामिया ॥३६॥
उभी ठाकोनिया दुरी । तया
साष्टांग नमन करी ।
श्रीगुरु म्हणे त्या अवसरी ।
सुवासिनी होय ध्रुव ॥३७॥
ऐसे म्हणता मागुती । नमन करी
एकभक्ती ।
पुनरपि स्वामी तेणेच रीती ।
अष्टपुत्रा होय म्हणतसे ॥३८॥
ऐसे ऐकोनिया वचन । हास्य करिती
सकळ जन ।
सांगताती विस्तारोन । गुरूलागी
सत्वर ॥३९॥
विप्र म्हणती स्वामीसी । इचा पति
पंचत्वासी ।
पावला परंधामासी । सुवासिनी केवी
होय ॥४०॥
प्रेत नेले स्मशानासी । ही आली
सहगमनासी ।
निरोप घ्यावया तुम्हापासी । आली
असे स्वामिया ॥४१॥
तुमचा निरोप घेवोनि । अग्निकुंडा
जावोनि ।
समागमे पतिशयनी । दहन करणे
तियेसी ॥४२॥
ऐकोनि त्याचे वचन । श्रीगुरु
म्हणती हासोन ।
इचे स्थिर अहेवपण । मरण केवी घडे
इसी ॥४३॥
गुरु म्हणती जा वेळी । आणा प्रेत
आम्हाजवळी ।
प्राण गेला कवणे वेळी । पाहू
म्हणती अवधारा ॥४४॥
श्रीगुरु म्हणती द्विजांसी ।
आमुचे बोल जहाले इसी ।
अहेवपण स्थिर इसी । संदेह न
धरावा मनात ॥४५॥
या बोलाचा निर्धारू । करील आता
कर्पूरगौरू ।
नका प्रेत संस्कारू । आणा प्रेत
आम्हांजवळी ॥४६॥
श्रीगुरूचा निरोप होता । आणो
गेले धावत प्रेता ।
पहाती लोक कौतुका । अभिनव
म्हणताती ॥४७॥
इतुके होता ते अवसरी । आले विप्र
तेथवरी ।
पूजा करिती मनोहरी । श्रीगुरुची
भक्तीने ॥४८॥
रुद्रसूक्त म्हणोनि । अभिषेक
करिती श्रीगुरुचरणी ।
षोडशोपचारी विस्तारोनि । पूजा
करिती भक्तीने ॥४९॥
तीर्थपूजा नानापरी । पूजा करिती
उपचारी ।
इतुकीया अवसरी । घेउनी आले
प्रेतासी ॥१५०॥
प्रेत आणोनिया देखा । ठेविले
श्रीगुरुसंमुखा ।
श्रीगुरु म्हणती विप्रलोका ।
सोडा वस्त्र दोर त्याचे ॥५१॥
चरणतीर्थ त्यावेळी । देती तया
विप्रांजवळी ।
प्रोक्षा म्हणती तात्काळी ।
प्रेत सर्वांगी स्नपन करा ॥५२॥
श्रीगुरुनिरोपे ब्राह्मण ।
प्रेतासी करिती तीर्थस्नपन ।
अमृतदृष्टीसी आपण । पाहती प्रेत
अवधारा ॥५३॥
पाहता सुधादृष्टीकरून । प्रेत
झाले संजीवन ।
उठोनि बैसे तत्क्षण । अंग मुरडीत
परियेसा ॥५४॥
नग्न म्हणुनी लाजत । प्रेत झाले
सावचित्त ।
नवे वस्त्र नेसत । येवोनि बैसे
एकीकडे ॥५५॥
बोलावोनि स्त्रियेसी । पुसतसे
विस्तारेसी ।
कोठे आणिले मजसी । यतीश्वर कोण
सांगे ॥५६॥
इतुके लोक असता का । का वो तू न
करसी चेता ।
निद्रा आली मदोन्मत्ता । म्हणोनि
सांगे स्त्रियेसी ॥५७॥
ऐकून पतीचे वचन । सांगती झाली
विस्तारून ।
उभी राहून दोघेजण । नमन करिती
श्रीगुरूसी ॥५८॥
चरणी माथा ठेवून । स्तोत्र करिती
दोघेजण ।
पहाती लोक सर्व जन । महा आनंद
प्रवर्तला ॥५९॥
म्हणती पापरूपी आपण । पाप केले
दारुण ।
पापापासाव अनुसंधान । जन्म जहालो
परियेसी ॥१६०॥
दुर्बुद्धीने वर्तलो । पापसागरी
बुडालो ।
तुझे चरण विसरलो । त्रयमूर्ती
जगद्गुरु ॥६१॥
सकळ जीवमात्रांसी । रक्षिता शंकर
तू होसी ।
ख्याति तव त्रिभुवनासी । शरणागता
रक्षिसी ॥६२॥
त्राहि त्राहि जगद्गुरु ।
विश्वमूर्ति परात्परु ।
ब्रह्मा विष्णु शंकरु ।
सच्चिदानंदस्वरूप तू ॥६३॥
त्राहि त्राहि विश्वकर्ता ।
त्राहि त्राहि जगद्भर्ता ।
कृपासागरा जगन्नाथा ।
भक्तजनविश्रामा ॥६४॥
जय जयाजी गुरुमूर्ति । जटाजूट
पशुपति ।
अवतरलासी तू क्षिती । मनुष्यदेह
धरूनिया ॥६५॥
त्राहि त्राहि पिनाकपाणि ।
त्राहि देवा तू शिरोमणि ।
भक्तजन पाळोनि । रक्षितोसी
निरंतर ॥६६॥
सर्वा भूती तूचि वससी । नमन तुझे
चरणांसी ।
मज ऐसे गमलासी । मातारूप वर्तत
तू ॥६७॥
त्रिभुवनी तव करणी । माथा ठेविला
तुझे चरणी ।
निश्चय केला माझे मनी ।
पुनर्जन्म नव्हे आता ॥६८॥
विश्वकारण करिसी । हेळामात्रे
सृष्टि रचिसी ।
मज ऐसे गमलासी । अज्ञानरूपे
वर्तत ॥६९॥
तुझे न ऐके एखादा जरी । कोपसी
त्वरित त्यावरी ।
माझे मनी येणेपरी । निष्कलंक तू
दिसतोसी ॥१७०॥
क्रोध नाही तुझे मनी ।
आनंदमूर्ति तूचि सहस्त्रगुणी ।
भक्तजना संरक्षणी । कृपासागर
स्वामिया ॥७१॥
जीवमात्रा कृपा करिसी ।
शरणागताते रक्षिसी ।
इहपर सौख्याते देसी । चतुर्विध
पुरुषार्थ ॥७२॥
तूचि करुणेचा सागरू । चिन्मात्रा
अगोचरू ।
श्रीनरसिंहसरस्वती गुरु । क्षमा
करणे स्वामिया ॥७३॥
ऐसी नानापरीसी । स्तोत्रे केली
श्रीगुरूसी ।
श्रीगुरुमूर्ति संतोषी ।
आश्वासिती तये वेळी ॥७४॥
अष्ट पुत्र पूर्णायुषी । होतील
सत्य तुजसी ।
हो का श्रीमंत अतिहर्षी । गेले
तुमचे पूर्वदोष ॥७५॥
चतुर्विध पुरुषार्थ । लभ्य झाले
तुम्हांसी यथार्थ ।
सांडोनि संदेह त्वरित । सुखे असा
म्हणती गुरु ॥७६॥
इतुके होता ते अवसरी । मिळाल्या
होत्या नरनारी ।
जयजयकार अपरंपारी । प्रवर्तला
तये वेळी ॥७७॥
नमन करिती सकळ जन । स्तोत्र
करिताती गायन ।
करिताती नीरांजन । जयजयकार
प्रवर्तला ॥७८॥
तयामध्ये विप्र एक । होता धूर्त
कुबुद्धिक ।
आपुले मनी आणोनि तर्क ।
श्रीगुरूसी पुसतसे ॥७९॥
विप्र म्हणे श्रीगुरूसी । विनंती
स्वामी परियेसी ।
संशय आमुचे मानसी । होत आहे
स्वामिया ॥१८०॥
वेदशास्त्रे पुराणे । बोलताती
सनातने ।
ब्रह्मलिखित सत्य जाणे । म्हणोनि
वाक्य निर्धारी पा ॥८१॥
घडला नाही अपमृत्यु यासी ।
दिवामरण परियेसी ।
आला कैसा जीव यासी । ब्रह्मलिखित
सत्य मिथ्या ॥८२॥
न कळे याच्या अभिप्राया ।
निरोपावे गुरुराया ।
गुरु म्हणती हासोनिया । तया
मूर्ख ब्राह्मणासी ॥८३॥
गुरु म्हणती तयासी । सांगेन तुज
विस्तारेसी ।
पुढील जन्माच्या आयुष्यासी ।
उसने घेतले परियेसा ॥८४॥
आम्ही तया बह्मदेवासी । मागून
घेतले करुणेसी ।
पुढले जन्मी परियेसी । वर्षे तीस
संख्या पै ॥८५॥
भक्तजन रक्षावयासी । मागून घेतले
ब्रह्मदेवासी ।
म्हणून सांगती विस्तारेसी । तया
विप्रवर्गाते ॥८६॥
तटस्थ झाले सकळ जन । साष्टांग
करिती नमन ।
गेले आपुलिया भुवना । ख्याति
झाली चहू राष्ट्रा ॥८७॥
पतिव्रतेने पतीसहित । स्नान केले
संगमात ।
अंतःकरणी संतोष बहुत । पूजा
करिती भक्तीसी ॥८८॥
अपार द्रव्य वेचोनि । विप्र
तोषवोनि आराधनी ।
सूर्य जाता अस्तमानी । येती
गुरूच्या मठासी ॥८९॥
स्त्रीपुरुष नमस्कार । करिताती
वारंवार ।
पूजासामग्री उपचार । आरती करिती
श्रीगुरूसी ॥१९०॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढे
अपूर्व वर्तले ते ऐका ।
कथा असे अपूर्व देखा । सांगेन
ऐका एकचित्ते ॥९१॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे
गुरुचरित्र विस्तार ।
ऐकता पावन मनोहर । सकळाभीष्टे
पावती ॥९२॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । उठविले
विप्राचे प्रेत ।
सौभाग्य देवोनि अद्भुत । परम
तयासी तोषविले ॥१९३॥
इति श्रीगुरुचरित्रामृते
परमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रेतसंजीवनं नाम
द्वात्रिंशोऽध्यायः ॥३२॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु
॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ओवीसंख्या १९३ ॥
No comments:
Post a Comment