॥
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व वर्तलें ऐका ।
साठी वर्षे वांझेसी एका । पुत्र झाला परियेसा ॥१॥
आपस्तंब-शाखेसी । ब्राह्मण एक परियेसीं ।
शौनकगोत्र -प्रवरेसी । नाम तया 'सोमनाथ'
॥२॥
'गंगा' नामें त्याची पत्नी ।
पतिव्रताशिरोमणि ।
वेदशास्त्रें आचरणी । आपण करी परियेसा ॥३॥
वर्षें साठी झालीं तिसी । पुत्र नाहीं तिचे कुशीं ।
वांझ म्हणोनि ख्यातेसी । होती तया गाणगापुरीं ॥४॥
पतिसेवा निरंतर । करी भक्तिपुरस्सर ।
नित्य नेम असे थोर । गुरुदर्शना येत असे ॥५॥
नीरांजन प्रतिदिवसीं । आणोनि करी श्रीगुरुसी ।
येणेंपरी बहुत दिवसीं । वर्तत होती परियेसा ॥६॥
ऐसें असतां वर्तमानीं । संतुष्ट झाले श्रीगुरुमुनि ।
पृच्छा करिती हांसोनि । तया द्विजस्त्रियेसी ॥७॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । काय अभीष्ट असे मानसीं ।
आणित्येसी प्रतिदिवसीं । नीरांजन परोपरी ॥८॥
तुझ्या मनींची वासना । सांगे त्वरित विस्तारुन ।
सिद्धि पाववील नारायण । गौरीरमण गुरुप्रसादें ॥९॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । करी साष्टांगीं नमन ।
विनवीतसे कर जोडून । ' अपुत्रस्य लोको नास्ति'
॥१०॥
पुत्राविणें स्त्रियांसी । पाहों नये मुखासी ।
पापरुपी महादोषी । म्हणती मातें स्वामिया ॥११॥
जिचे पोटीं नाहीं बाळ । तिचा जन्म निर्फळ ।
वाट पाहती उभयकुळ । बेचाळीस पितृलोकीं ॥१२॥
पितृ चिंतिती मनांत । म्हणती एखादी सती वंशांत ।
पुत्र व्यालिया आम्हां हित । तो उद्धरील सकळांतें ॥१३॥
पुत्राविणें जें घर । तें सदा असे अघोर ।
अरण्य नाहीं त्यासी दूर । 'यथारण्य तथा गृह'
॥१४॥
नित्य गंगास्नानासी । आपण जात्यें परियेसीं ।
घेऊनि येती बाळकांसी । समस्त स्त्रिया कवतुकें ॥१५॥
कडे घेऊनियां बाळा । खेळविताति स्त्रिया सकळा ।
तैसें नाहीं माझे कपाळा । मंदभाग्य असें देखा ॥१६॥
जळो माझें वक्षस्थळ । कडे घ्यावया नाहीं बाळ ।
जन्मोनियां संसारीं निष्फळ । नव्हें पुरुष अथवा सती ॥१७॥
पुत्रपौत्र असती जयांसी । परलोक साधे तयांसी ।
अधोगति निपुत्रिकासी । लुप्तपिंड होय स्वामिया ॥१८॥
आतां पुरे जन्म मज । साठी वर्षें जाहलीं सहज ।
आम्हां आतां वर दीजे । पुढें उत्तम जन्म होय ॥१९॥
पुत्रवंती व्हावें आपण । अंतःकरण होय पूर्ण ।
ऐसा वर देणें म्हणोन । विनवीतसे तये वेळीं ॥२०॥
ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन ।
पुढील जन्म जाणेल कवण । तूतें स्मरण कैंचें सांग ॥२१॥
नित्य आरति आम्हांसी । भक्तिपूर्वक भावेंसीं ।
करितां जाहलों संतोषी । कन्या-पुत्र होतील तुज ॥२२॥
इहजन्मीं तूतें जाण । कन्या पुत्र सुलक्षण ।
होतील निगुतीं म्हणोन । श्रीगुरु म्हणती तियेसी ॥२३॥
श्रीगुरुवचन ऐकोनि । पालवीं गांठी बांधी ज्ञानी ।
विनवीतसे कर जोडूनि । ऐका स्वामी कृपासिंधु ॥२४॥
साठी वर्षें जन्मासी । जाहलीं स्वामी परियेसीं ।
होत नाहीं विटाळसी । मातें कैंचे पुत्र होती ॥२५॥
नाना व्रत नाना तीर्थ । हिंडिन्नल्यें पुत्रार्थ ।
अनेक ठायीं अश्वत्थ- । पूजा केली स्वामिया ॥२६॥
मज म्हणती सकळै जन । करीं वो अश्वत्थप्रदक्षिणा ।
तेणें पुरतील मनकामना । होतील पुत्र म्हणोनि ॥२७॥
अश्वत्थसेवा बहुकाळ । करितां माझा जन्म गेला ।
विश्वास म्यां बहु केला । होतील पुत्र म्हणोनि ॥२८॥
साठी वर्षें येणेंपरी । कष्ट केले अपरांपरी ।
सेवा करित्यें अद्यापिवरी । अश्वत्थाची प्रदक्षिणा ॥२९॥
पुत्र न होती इह जन्मीं । पुढें होतील ऐसे कामीं ।
सेवा करितसें स्वामी । अश्वत्थाची परियेसा ॥३०॥
आतां स्वामी प्रसन्न होसी । इहजन्मीं पुत्र देसी ।
अन्यथा नोहे बोलासी । तुमच्या स्वामी नरहरी ॥३१॥
स्वामींनीं दिधला मातें वर । माझे मनीं हा निर्धार ।
हास्य न करी स्वामी गुरु । शकुनगांठी बांधिली म्यां ॥३२॥
पुढील जन्म-काम्यासी । करित्यें सेवा अश्वत्थासी ।
स्वामी आतांचि वर देसी । इहजन्मीं कन्या-पुत्र ॥३३॥
अश्वत्थसेवा बहु दिवस । करितां झाले मज प्रयास ।
काय देईल आम्हांस । अश्वत्थ सेवित्यें मूर्खपणें ॥३४॥
ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन ।
अश्वत्थसेवा महापुण्य । वृथा नोहे परियेसा ॥३५॥
निंदा न करीं अश्वत्थासी । अनंत पुण्य परियेसीं ।
सेवा करीं वो आम्हांसरसी । तूतें पुत्र होतील ॥३६॥
आतां आमचे वाक्येंकरी । नित्य जावें संगमातीरीं ।
अमरजा वाहे निरंतरीं । भीमरथीसमागमांत ॥३७॥
तेथें अश्वत्थ असे गहन । जातों आम्ही अनुष्ठाना ।
सेवा करीं वो एकमनें । आम्हांसहित अश्वत्थाची ॥३८॥
अश्वत्थाचें महिमान । सांगतसें परिपूर्ण ।
अश्वत्थनाम-नारायण । आमुचा वास तेथें असे ॥३९॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विनवीतसे ते अंगना ।
अश्वत्थवृक्षाचें महिमान । स्वामी मातें निरोपावें ॥४०॥
कैसी महिमा असे त्यासी । स्वामी सांगावें मजसी ।
स्थिर होईल माझें मानसी । सेवा करीन भक्तीनें ॥४१॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । अश्वत्थवृक्षासी निंदा करिसी ।
महिमा असे अपार त्यासी । समस्त देव तेथें वसती ॥४२॥
अश्वत्थाचें महिमान । असे ब्रह्मांडपुराणीं निरुपण ।
नारदमुनीस विस्तारोन । ब्रह्मदेवानें सांगितलें ॥४३॥
ब्रह्मकुमर नारदमुनि । नित्य गमन त्रिभुवनीं ।
ब्रह्मयासी पुसोनि । आला ऋषि-आश्रमासी ॥४४॥
नारदातें देखोनि । अर्घ्यपाद्य देवोनि ।
पूजा केली उपचारोनि । पुसते झाले तयेवेळीं ॥४५॥
ऋषि म्हणती नारदासी । विनंति एक परियेसीं ।
अश्वत्थमहिमा असे कैसी । विस्तारावें स्वामिया ॥४६॥
ऋषिवचन ऐकोनि । सांगता जाहला नारदमुनि ।
गेलों होतों आजिचे दिनीं । ब्रह्मलोकीं हिंडत ॥४७॥
आपण पुसे स्वभावेंसीं । अश्वत्थमहिमा असे कैसी ।
समस्त मानिती तयासी । विष्णुस्वरुप म्हणोनियां ॥४८॥
ऐसा वृक्ष असे जरी । सेवा करणें कवणेपरी ।
कैसा महिमा सविस्तारीं । निरोपावें स्वामिया ॥४९॥
ब्रह्मा सांगे आम्हांसी । अश्वत्थमुळीं आपण वासी ।
मध्यें वास ह्रुषीकेशी । अग्रीं रुद्र वसे जाणा ॥५०॥
शाखापल्लवीं अधिष्ठानीं । दक्षिण शाखे शूलपाणि ।
पश्चिम शाखे विष्णु निर्गुणी । आपण उत्तरे वसतसें ॥५१॥
इंद्रादि देव परियेसीं । वसती पूर्वशाखेसी ।
इत्यादि देव अहर्निशीं । समस्त शाखेसी वसती जाणा ॥५२॥
गोब्राह्मण समस्त ऋषि । वेदादि यज्ञ परियेसीं ।
समस्त मूळांकुरेसी । असती देखा निरंतर ॥५३॥
समस्त नदीतीर्थें देखा । सप्त-सागर लवणादिका ।
वसती जाणा पूर्व शाखा । ऐसा अश्वत्थ वृक्ष जाणा ॥५४॥
अ-कारशब्द मूळस्थान । स्कंध शाखा उ-कार जाण ।
फळ पुष्प म-कारवर्ण । अश्वत्थमुख अग्निकोणीं असे ॥५५॥
एकादश रुद्रादिक । अष्ट वसु आहेत जे का ।
जे स्थानीं त्रैमूर्तिका । समस्त देव तेथें वसती ॥५६॥
ऐसा अश्वत्थनारायण । महिमा वर्णावया शक्त कवण ।
कल्पवृक्ष याचि कारण । ब्रह्मा म्हणे नारदासी ॥५७॥
नारद सांगे ऋषेश्वरांसी । त्रयमूर्ति वास ज्या वृक्षाशीं ।
काय महिमा सांगों त्यासी । भजतां काय सिद्धि नोहे ? ॥५८॥
ऐसें ऐकोनि समस्त ऋषि । विनविताति नारदासी ।
आचारावया विधि कैसी । कवणें रीतीनें भजावें ॥५९॥
पूर्वीं आम्हीं एके दिवसीं । पुसिलें होतें आथर्वणासी ।
त्याणें सांगितलें आम्हांसी । अश्वत्थसेवा एक रीतीं ॥६०॥
तूं नारद ब्रह्मऋषि । समस्त धर्म ओळखसी ।
विस्तार करोनि आम्हांसी । विधिपूर्वक निरोपावें ॥६१॥
नारद म्हणे मुनिवरा । त्या व्रताचिया विस्तारा ।
सांगेन ऐका तत्परा । विधान असे ब्रह्मवचनीं ॥६२॥
आषाढ-पौष-चैत्रमासीं । अस्तंगत गुरुशुक्रेसीं ।
चंद्रबळ नसते दिवसीं । करुं नये प्रारंभ ॥६३॥
याव्यतिरिक्त आणिक मासीं । बरवे पाहोनियां दिवसीं ।
प्रारंभ करावा उपवासीं । शुचिर्भूत होऊनि ॥६४॥
भानुभौमवारेसीं । आतळूं नये अश्वत्थासी ।
भृगुवारीं संक्रांतिदिवसीं । स्पर्शूं नये परियेसा ॥६५॥
संधिरात्रीं रिक्तातिथीं । पर्वणीसी व्यतीपातीं ।
दुर्दिनादि वैधृतीं । अपराण्हसमयीं स्पर्शूं नये ॥६६॥
अनृत-द्यूतकर्मभेषीं । निंदा-पाखांड-वर्जेसीं ।
प्रातर्मौनी होवोनि हर्षीं । आरंभावें परियेसा ॥६७॥
सचैल स्नान करुनि । निर्मळ वस्त्र नेसोनि ।
वृक्षाखालीं जाऊनि । गोमयलिप्त करावें ॥६८॥
स्वस्तिकादि शंखपद्मेसीं । घालावी रंगमाळा परियेसीं ।
पंचवर्ण चूर्णेसीं । भरावें तेथें पद्मांत ॥६९॥
मागुती स्नान करुनि । श्वेत वस्त्र नेसोनि ।
गंगा यमुना कलश दोनी । आणोनि ठेवणें पद्मांवरी ॥७०॥
पूजा करावी कलशांसी । पुण्याहवाचनकर्मेंसीं ।
संकल्पावें विधींसीं । काम्यार्थ आपुलें उच्चारावें ॥७१॥
मग कलश घेवोनि । सात वेळां उदक आणोनि ।
स्नपन करावें जाणोनि । अश्वत्थ वृक्षासी अवधारा ॥७२॥
पुनरपि करुनियां स्नान । मग करावें वृक्षपूजन ।
पुरुषसूक्त म्हणोन । पूजा करावी षोडशोपचारें ॥७३॥
मनीं ध्यावी विष्णुमूर्ति । अष्टभुजा आहेति ख्याती ।
शंख-चक्र-वरद-हस्तीं । अभय-हस्त असे जाणा ॥७४॥
खड्ग-खेटक एके करीं । धनुष्य-बाण सविस्तारीं ।
अष्टभुजी येणेंपरी । ध्यावा विष्णु नारायण ॥७५॥
पीतांबर पांघरुण । सदा लक्ष्मी-सन्निधान ।
ऐसी मूर्ति ध्याऊन । पूजा करणें वृक्षासी ॥७६॥
त्रैमूर्तीचें असें स्थान । शिवशक्तीविणें नाहीं जाण ।
समस्तांतें आवाहनोन । षोडशोपचारें पूजावें ॥७७॥
वस्त्रें अथवा सुतेसीं । वेष्टावें तया वृक्षासी ।
पुनरपि संकल्पेसीं । प्रदक्षिणा कराव्या ॥७८॥
मनसा-वाचा-कर्मणेसीं । भक्तिपूर्वक भावेंसीं ।
प्रदक्षिणा कराव्या हर्षीं । पुरुषसूक्त म्हणत देखा ॥७९॥
अथवा सहस्त्रनामेंसीं । कराव्या प्रदक्षिणा हर्षीं ।
अथवा कराव्या मौन्येंसीं । त्याचें फळ अमित असे ॥८०॥
चाले जैसी स्त्री गर्भिणी । उदककुंभ घेउनी ।
तैसे मंद गतींनीं । प्रदक्षिणा कराव्या शुद्धभावें ॥८१॥
पदोपदीं अश्वमेध । पुण्य जोडे फळप्रद ।
प्रदक्षिणासमाप्तमध्य । नमस्कार करावा ॥८२॥
ब्रह्महत्यादि पापांसी । प्रायश्चित्त नाहीं परियेसीं ।
प्रदक्षिणा द्विलक्षांसीं । ब्रह्महत्या पाप जाय ॥८३॥
त्रिमूर्ति वसती जया स्थानीं । फल काय सांगूं प्रदक्षिणीं ।
समस्त पापा होय धुणी । गुरुतल्पादि पाप जाय ॥८४॥
नाना व्याधि हरती दोष । प्रदक्षिणा करितां होय सुरस ।
कोटि ऋण असे ज्यास । परिहरत परियेसा ॥८५॥
जन्म मृत्यु जरा जाती । संसारभय नाश होती ।
ग्रहदोष बाधों न शकती । सहस्त्र प्रदक्षिणा केलिया ॥८६॥
पुत्रकाम्य असे ज्यासी । त्यातें फल होय भरंवसीं ।
मनोवाक्कायकर्मेंसीं । एकोभावें करावें ॥८७॥
चतुर्विध पुरुषार्थ । देता होय तो अश्वत्थ ।
पुत्रकाम्य होय त्वरित । न करा अनुमान ऋषी हो ॥८८॥
शनिवारीं वृक्ष धरोनि । जपावें मृत्युंजय-मंत्रानीं ।
काळमृत्यु जिंकोनि । राहती नर अवधारा ॥८९॥
त्यासी अपमृत्यु न बाधती । पूर्णायुषी होती निश्चितीं ।
शनिग्रह न पीडिती । प्रार्थावें अश्वत्थासी ॥९०॥
शनिनाम घेवोनि । उच्चारावें आपुले जिव्हेनीं ।
बभ्रु-पिंगळ म्हणोनि । कोणस्थ-कृष्ण म्हणावें ॥९१॥
अंतक-यम-महारौद्री । मंद-शनैश्वर-सौरि ।
जप करावा येणेंपरी । शनिपीडा न होय ॥९२॥
ऐसें दृढ करोनि मना । अश्वत्थ सेवितां होय कामना ।
पुत्रकाम्य तत्क्षणा । होय निरुतें अवधारा ॥९३॥
अमावस्या-गुरुवारेंसी । अश्वत्थछाया-जळेंसीं ।
स्नान करितां नरासी । ब्रह्महत्या पाप जाय ॥९४॥
अश्वत्थतळीं ब्राह्मणासी । अन्न देतां एकासी ।
कोटि ब्राह्मणां परियेसीं । भोजन दिल्हें फळ असे ॥९५॥
अश्वत्थतळीं बैसोन । एकदां मंत्र जपतां क्षण ।
फळें होतील अनेकगुण । वेदपठण केलियाचें ॥९६॥
नर एखादा अश्वत्थासीं । स्थापना करी भक्तींसीं ।
आपुले पितृ-बेचाळिसी । स्वर्गीं स्थापी परियेसा ॥९७॥
छेदितां अश्वत्थवृक्षासी । महापाप परियेसीं ।
पितृसहित नरकासी । जाय देखा तो नर ॥९८॥
अश्वत्थातळीं बैसोन । होम करितां महायज्ञ ।
अक्षय सुकृत असे जाण । पुत्रकाम्य त्वरित होय ॥९९॥
ऐसा अश्वत्थमहिमा । नारदाप्रति सांगे ब्रह्मा ।
म्हणोनि ऐकती ऋषिस्तोम । तया नारदापासोनि ॥१००॥
नारद म्हणे ऋषेश्वरासी । प्रदक्षिणेच्या दहावे अंशीं ।
हवन करावें विशेषीं । आगमोक्त विधानपूर्वक ॥१॥
हवनाचे दहावे अंशीं । ब्राह्मणभोजन करावें हर्षीं ।
ब्रह्मचर्य हविष्यान्नेंसीं । व्रत आपण करावें ॥२॥
येणेंपरी आचरोन । मग करावें उद्यापन ।
शक्त्यनुसार सौवर्ण । अश्वत्थवृक्ष करावा ॥३॥
तो द्यावा ब्राह्मणासी । विधिपूर्वक परियेसीं ।
श्वेतधेनु सवत्सेंसीं । ब्राह्मणातें दान द्यावी ॥४॥
वृक्षातळीं तिळराशी । करावी यथानुशक्तीसीं ।
श्वेतवस्त्र झांकोनि हर्षीं । सुक्षीण ब्राह्मणासी दान द्यावें ॥५॥
ऐसें अश्वत्थविधान । सांगे नारद ऋषिजना ।
येणेंपरी आचरोन । सकळाभीष्ट लाधले ॥६॥
श्रीगुरु म्हणती वांझ सतीसी । अश्वत्थमहिमा आहे ऐसी ।
भावभक्ति असे ज्यासी । त्यातें होय फलश्रुति ॥७॥
आचार करीं वो येणेंपरी । संशय अंतःकरणीं न धरीं ।
वृक्ष असे भीमातीरीं । जेथें अमरजासंगम ॥८॥
तेंचि आमुचें असे स्थान । सेवा करीं वो एकोमनें ।
होईल तुझी मनकामना । कन्या पुत्र तुज होतील ॥९॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । नमन करी ते अंगना ।
विनवीतसे कर जोडूनि । भावभक्तीकरोनियां ॥११०॥
आपण वांझ वर्षें साठी । कैंचे पुत्र आपुले पोटीं ।
वाक्य असे तुमचें शेवटीं । म्हणोनि आपण अंगीकारीन ॥११॥
गुरुवाक्य म्हणजे कामधेनु । ऐसें बोलती वेदपुराण ।
आतां नाहीं अनुमान । करीन सेवा स्वामिया ॥१२॥
चाड नाहीं अश्वत्थासी । निर्धार तुमचे बोलासी ।
सेवा करीन तुमची ऐसी । म्हणोनि चरणीं लागली ॥१३॥
ऐसा निरोप घेवोनि । जावोनि वनिता संगमस्थानीं ।
षट्कूलांत न्हाऊनि । सेवा करी अश्वत्थाची ॥१४॥
श्रीगुरुनिरोप जेणेंपरी । तैसी सेवा करी ते नारी ।
येणेंपरी तीन रात्रीं । आराधिलें परियेसा ॥१५॥
श्रीगुरुसहित अश्वत्थासी । पूजा करितां तिसरे दिवसीं ।
स्वप्न जाहलें तियेसी । सांगेन ऐका एकचित्तें ॥१६॥
स्वप्नामध्यें विप्र एक । येवोनि देतो तिसी भाक ।
काम्य झालें तुझें ऐक । सांगेन एक करीं म्हणे ॥१७॥
जाऊनि गाणगापुरांत । तेथें असे श्रीगुरुनाथ ।
प्रदक्षिणा करीं हो सात । नमन करीं तूं भक्तींसीं ॥१८॥
जें काय देतील तुजसी । भक्षण करीं वो वेगेंसीं ।
निर्धार धरुनि मानसीं । त्वरित जावें म्हणे विप्र ॥१९॥
ऐसें देखोनि सुषुप्तींत । सवेंचि झाली ते जागृत ।
कल्पवृक्ष असे अश्वत्थ । कल्पिलें फळ त्वरित होय ॥१२०॥
सेवा करुनि चवथे दिवशीं । आली आपण मठासी ।
प्रदक्षिणा करुनि हर्षीं । नमन केलें तये वेळीं ॥२१॥
हांसोनियां श्रीगुरुमुनि । फळें देती तिसी दोनी ।
भक्षण करीं वो संतोषोनि । काम्य झालें आतां तुझें ॥२२॥
भोजन करीं वो तूं आतां त्वरित । काम्य होईल तुझें सत्य ।
कन्या-पुत्र दोघे तूतें । दिल्हे आजि परियेसा ॥२३॥
पारणें करोनि विधीसीं । मग भक्षावें या फलांसी ।
दान द्यावें ब्राह्मणांसी । जें काय पूर्वीं निरोपिलें ॥२४॥
व्रत संपूर्ण करोनि । केलें दान ते भामिनीं ।
तेचि दिवशीं अस्तमानी । झाली आपण विटाळशी ॥२५॥
मौन दिवस तीनवरी । भोजन करी हिरवे खापरीं ।
श्वेत वस्त्र नेसोनि नारी । कवणाकडे न पाहेचि ॥२६॥
येणेंपरी तिन्ही निशी । क्रमिल्या नारीनें परियेसीं ।
सुस्नात होवोनि चवथे दिवशीं । आली श्रीगुरुचे दर्शना ॥३७॥
पतीसमवेत येऊनि । पूजा करी ती एकाग्रमनीं ।
श्रीगुरु म्हणती संतोषोनि । पुत्रवंती व्हावें तुम्हीं ॥२८॥
ऐसें नमूनि श्रीगुरुसी । आली आपुल्या मंदिरासी ।
ऋतु दिधला पांचवे दिवसीं । म्हणोनि कन्या परियेसा ॥२९॥
येणेंपरी ते नारी । जाहली ऐका गरोदरी ।
ग्राम सकळ विस्मय करी । काय नवल म्हणतसे ॥१३०॥
म्हणती पहा नवल वर्तलें । वांझेसी गर्भधारण केवीं झालें ।
सोमनाथ विप्र भले । करीतसे आनंद ॥३१॥
सातवे मासीं ओटी भरिती । अक्षय वाणें ओंवाळिती ।
श्रीगुरुसी विनोदावरी प्रीति । वाणें देवविती कौतुकें ॥३२॥
आठवे मासीं तो ब्राह्मण । करी सीमंतविधान ।
गुरुनिरोपें संतोषोन । देती वाणें ग्रामांत ॥३३॥
अभिनव करिती सकळही जन । म्हणती वांझेसी गर्भधारण ।
पांढरे केश म्हातारपण वाणें देती कौतुकें ॥३४॥
एक म्हणती श्रीगुरुप्रसाद । श्रीनृसिंहमूर्ति भक्तवरद ।
त्याची सेवा करितां आनंद । लाधे चारी पुरुषार्थ ॥३५॥
त्रैमूर्तींचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर ।
भक्तजनां मनोहर प्रगटला भूमंडळीं ॥३६॥
ऐसें नानापरी देखा । स्तोत्र करिती गुरुनायका ।
वाणें देत ते बालिका । अत्योल्हास तिच्या मनीं ॥३७॥
वाणें देऊनि समस्तांसी । येऊनि नमी ती श्रीगुरुसी ।
भक्तवत्सल परियेसीं । अशीर्वचन देतसे ॥३८॥
संतोषोनि विप्रवनिता । करी साष्टांग दंडवता ।
नानापरी स्तोत्र करितां । विनवीतसे परियेसा ॥३९॥
जय जया परमपुरुषा । तूंचि ब्रह्मा विष्णुमहेशा ।
तुझें वाक्य जाहलें परीस । सुवर्ण केला माझा देह ॥१४०॥
तूं तारावया विश्वासी । म्हणोनि भूमीं अवतरलासी ।
त्रैमूर्ति तूंचि होसी । अन्यथा नव्हे स्वामिया ॥४१॥
तुझी स्तुति करावयासी । अशक्य आपुले जिव्हेसी ।
अपार तुझ्या महिमेसी । नाहीं साम्य कृपासिंधु ॥४२॥
येणेंपरी स्तोत्र करुनि । श्रीगुरुचरण वंदूनि ।
गेली निरोप घेऊनि । आपुले गृहा परियेसा ॥४३॥
ऐसे नवमास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनीं ।
समस्त ज्योतिषी येवोनि । वर्तविती जातकातें ॥४४॥
ज्योतिषी म्हणती तये वेळीं । होईल कन्या मन निर्मळी ।
अष्टपुत्रा वाढेल कुळी । पुत्रपौत्रीं नांदेल ॥४५॥
येणेंपरी ज्योतिषीं । जातक वर्तविलें परियेसीं ।
सोमनाथ आनंदेंसीं । दानधर्म करिता जाहला ॥४६॥
दहा दिवस क्रमोनि । सुस्नात झाली ते भामिनी ।
कडिये बाळक घेवोनि । आली श्रीगुरुदर्शनासी ॥४७॥
बाळक आणोनि भक्तींसीं । ठेविलें श्रीगुरुचरणापाशीं ।
नमन करी साष्टांगेंसीं । एकभावेंकरोनियां ॥४८॥
आश्वासोनि श्रीगुरुमूर्ति । उठीं बाळे पुत्रवंती ।
बहुतपरी संतोषविती । प्रेमभावेंकरोनियां ॥४९॥
उठोनि विनवी ती श्रीगुरुसी । पुत्र नाहीं आमुचे कुशीं ।
सरस्वती आली घरासी । बोल आपुला सांभाळावा ॥१५०॥
ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन ।
न करीं मनीं अनमान । तूतें पुत्र होईल ॥५१॥
म्हणोनि तिये कुमारीसी । कडिये घेती प्रीतींसीं ।
सांगताति समस्तांसी । तये कन्येचें लक्षण ॥५२॥
पुत्र होतील बहु इसी । होईल आपण शतायुषी ।
पुत्राचे पौत्र नयनेंसीं । पाहील आपण अहेवपणें ॥५३॥
होईल इसी ज्ञानी पति । त्यातें चारी वेद येती ।
अष्टैश्चर्यें नांदती । प्रख्यात होवोनि भूमंडळीं ॥५४॥
आपण होईल पतिव्रता । पुण्यशील धर्मरता ।
इची ख्याति होईल बहुता । समस्ता इसी वंदिती ॥५५॥
दक्षिणदेशीं महाराजा । येईल इचे दर्शनकाजा ।
आणिक पुत्र होईल तुज । म्हणोनि श्रीगुरु बोलती ॥५६॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । कन्यालक्षण सांगती ।
विप्रवनिता विनयवृत्तीं । म्हणे पुत्र व्हावा मज ॥५७॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । पुत्र व्हावा तुज कैसी ।
योग्य पाहिजे वर्षें तीसी । अथवा शतायुषी मूर्ख पैं ॥५८॥
ऐकोनि श्रीगुरुच्या वचना । विनवीतसे ते अंगना ।
योग्य पाहिजे पुत्र आपणा । तयासी पांच पुत्र व्हावे ॥५९॥
भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । वर देती तेणें रीतीं ।
संतोषोनि घरा जाती । महानंद दंपतीसी ॥१६०॥
पुढें तिसी पुत्र झाला । वेदशास्त्रीं विख्यात भला ।
पांच पुत्र तो लाधला । नामकरणी श्रीगुरुचा ॥६१॥
कन्यालक्षण श्रीगुरुमूर्ती । निरोपिलें होतें जेणें रीतीं ।
प्रख्यात झाली सरस्वती । महानंद प्रवर्तला ॥६२॥
यज्ञ करी तिचा पति । प्रख्यात नाम 'दीक्षिती' ।
चहूं राष्ट्रीं त्याची ख्याती । म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥६३॥
साठी वर्षें वांझेसी । पुत्र जाहला परियेसीं ।
सिद्ध म्हणे नामधारकासी । ऐसी कृपा श्रीगुरुची ॥६४॥
निर्धार असे ज्याचे मनीं । त्यासी वर देती तत्क्षणीं ।
एकोभावें याकारणीं । भक्ति करावी श्रीगुरुची ॥६५॥
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
भजा भजा हो श्रीगुरु । सकळाभीष्ट लाधे तुम्हां ॥६६॥
जो भजेल श्रीगुरुसी । एकोभावें भक्तींसीं ।
त्यासी दैन्य कायसी । जें जें मागेल तें देईल सत्य ॥६७॥
गुरुभक्ति म्हणजे कामधेनु । अंतःकरणीं नको अनुमानु ।
जें जें इच्छीत भक्तजनु । समस्त देईल परियेसा ॥१६८॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्धनामधारकसंवादे वृद्धवंध्यासंतानप्राप्ति नाम एकोनचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥३९॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ( ओंवीसंख्या
१६८ )
No comments:
Post a Comment