Saturday 16 April 2022

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेमा लागला होता.तिथे बरीच गर्दी जमलेली होती.
तेवढ्यात तिथे एक बी.एम.डब्ल्यु आली.त्या गाडीमधून धोतर घातलेले गृहस्थ उतरले.ते उतरल्यावर ती गाडी पार्किंग मध्ये जाते. तिथे असलेली गर्दी त्या गाडीमधून बाहेर पडलेल्या माणसाकडे पाहते.बी.एम.डब्ल्यु मधून धोतर नेसलेला माणूस बाहेर आल्यावर तिथे जमलेली गर्दी अचंबित होते.
त्या धोतर नेसलेल्या माणसाचे वय ५७ च्या जवळपास असावे.त्याचा अवतार विक्षिप्त होता.त्याने मोठा चश्मा घातलेला होता.त्याच्या डाव्या हातात काहीतरी गोंदवलेले दिसत होते.त्याचे फोरआर्म्स फुगलेले दिसत होते.त्याची ऊंची ५ फुट दहा इंच होती.तो माणूस तिथे असलेल्या तिकीट काउंटरवर गेला.त्याच्याकडे बघून तिथे असलेली गर्दी पांगली.
“तीन बाल्कनी...द्या...”
तेवढ्यात त्या माणसाला तिकीट मिळते.
तेवढ्यात तिथे असलेल्या गर्दीमध्ये कुजबुज सुरू होते.
“कोण आहे हा माणूस?चक्क धोतर घालून आला आहे?’’
“एवढ्या महागड्या गाडीमधून चक्क धोतर?’’
“कोणीतरी सावकार अथवा गावचा पाटील असेल...”
“त्याच्या हाताकडे बघ.अंगठ्या...कोण नगरसेवक आहे का?’’
“मला वाटत आहे असेल कोणतर गावगुंड...?’’
“हा एकटा माणूस आहे पण हा तीन तिकीटं का काढत आहे?’’
धोतर नेसलेला माणूस जाणार तेवढ्यात त्याच्या मागून आवाज येतो.तो आवाज त्याच्या चालकाचा असतो.
“साहेब.तुमचा फोन.गाडीमध्ये होता.”
“ठेव गाडीतच.तुझ्याजवळ.कुणाचा फोन आला की संग साहेब मीटिंग मध्ये आहेत.”
साहेबांचा आवाज आणि मूड बघून त्यांचा ड्राइव्हर दचकतो.
साहेब तिकीट घेऊन थेटरमध्ये जातात.
हे साहेब म्हणजे इचलकरंजी शहराचे सुप्रसिद्ध उद्योगपती “डी.के साहेब.’’
साहेब मोठ्या ऑटोमोबाइल कारखान्याचे मालक होते. ते कलाकार होते, अभिनेते होते, लेखक होते.त्यांना एकट्याने सिनेमे पहायला खूप आवडट असत.
सकाळचा ९.१० चा शो होता.साहेब बाल्कनीमध्ये जाऊन बसले.त्यांनी एकूण तीन तिकीटं काढली होती.त्यांच्या शेजारी कुणी बसलेले त्यांना आवडत नसे.शो हाऊसफुल्ल होता.९.१०ला शो सुरू झाला.डी.के साहेब सिनेमा पाहू लागले.त्यांना सिनेमा आवडू लागला.
इंटरवल:- दीड तासाने इंटरवल झाली.साहेब बाहेर आले.बाहेर आल्यावर ते तिथे असलेले खाद्यपदार्थ घेऊ लागले.३ वडे, पेप्सी… आणि खूप काही त्यांनी विकत घेतले आणि ते त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले.तेवढ्यात परत सिनेमा सुरू झाला.साहेब खाद्यपदार्थ खाऊ लागले.स्क्रीन वर सिनेमा सुरू झाला.
सकाळी ११.११:- साहेब घोरू लागले.सिनेमा बघता बघता त्यांना झोप लागली.ते एवढ्या जोरात घोरू लागले की आजूबाजूला असलेल्या लोकांना त्याचा आवाज येऊ लागला.
सकाळी ११.३०:- साहेब जागे झाले.सिनेमा सुरू होता.साहेब परत सिनेमा बघू लागले.
सकाळी ११.४५ला- सिनेमा सुरू होता.तेवढ्यात साहेब जागचे उठले आणि बाहेर पडले.सिनेमा अजून संपायला १० मिनिटे होती.
साहेब खाली आले.तिथे त्यांचा चालक तिथे त्यांची वाट बघत होता.लगेच तो साहेबांच्या जवळ आला.
साहेब,’’चल’’
तेवढ्यात साहेब गाडीत आले. त्यांनी गाडी सुरू केली आणि ते गाडीत चक्क चिलीम ओढू लागले.त्या वासाने ड्राइव्हरला त्रास होऊ लागला.
ड्राइव्हर,’’(मनात) काय वेडपट माणूस आहे? आज माझी काळ्यापाण्याची शिक्षा आहे.’’
काही वेळाने साहेब गाडीतून उतरले आणि त्यांनी परत त्याच सिनेमाच्या दुपारी बारा वाजताची अजून तीन तिकीटं काढली.
ड्राइव्हर,’’(मनात) तोच सिनेमा परत?’’
डी.के साहेब परत सिनेमाहॉलमध्ये गेले आणि १२चा शो सुरू झाला.
दुपारी २.००:- सिनेमाचा शो संपतो.सर्व पब्लिक उठून बाहेर पडते.तेवढ्यात तिथे साहेब गाढ झोपले असतात.तिथे त्यांना थेटरमध्ये असलेला माणूस उठवायला येतो.
“सर.शो संपला.’’
साहेब जागे होतात आणि वेळ पाहतात.
“हो की रे.ए.सी मध्ये कधी झोप लागली कळलेच नाही.एक काम करशील.पुढच्या शोचे तिकीट घेऊ ये मला.’’
साहेब त्याला ५०० रुपये देतात.
“सर.एवढे नाही लागतील.”
“असू दे रे.उरलेले ठेव तुझ्याजवळ.’’
तो थेटरच माणूस पळत जातो आणि साहेबांना ३ तिकीट घेऊन येतो दुपारच्या२.३०च्या त्याच सिनेमाच्या तिसर्‍या शो ची.
खाली ड्राईव्हर साहेबांची वाट बघून कंटाळून जातो.
संध्याकाळचे ५.१५;-
सिनेमाचा तिसरा शो संपतो. साहेब खाली येतात.खाली त्यांचा चालक त्यांची वाट बघत असतो.साहेब खाली येतात. तिथे थेटरचे मालक असतात.ते साहेबांना भेटायला येतात.
थेटरचे मालक,’’सर.तुमच्यासारखे चित्रपट वेडे खूप कमी असतात.’’
साहेब स्मितहास्य करतात.
“हे थेटर घ्यावं म्हणतोय.किती किम्मत?’’
मालक आश्चर्यचकित होतात.
“सर.आम्हाला शक्य नाही.सॉरी.आम्ही तुमच्या सिट्स लाईफटाइम बुक करून ठेवतो.”
साहेब त्या थेटरच्या मालकांना शेकहँड करतात आणि संध्याकाली ५.२०ला गाडीमध्ये येतात.
साहेब,’’फोन दे.’’
ड्राइव्हर फोन देतो.
साहेब मिस कॉल्स बघतात.
“५९८ मिस कॉल्स...ऑफिसला जायलाच पाहिजे...’’
आणि....दिवसभर गाडीमध्ये वैतागलेल्या चालकाला साहेब ऑफिसमध्ये गाडी घ्यायला सांगतात आणि त्यांच्या फोन मध्ये “ मे जिंदगी का साथ...हे गाणे ऐकत शांतपणे चिलीम ओढायला सुरवात करतात.

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...