दुपारचे दोन
वाजले होते.भर दुपारी रस्त्यावर वर्दळ कमी जाणवत होती.लांबून सिग्नल दिसत
होते.काही वेळाने सिग्नल पडला आणि एक महागडी गाडी दृष्टीस पडली.ती गाडी हळूहळू पुढे
येऊ लागली आणि काही अंतरावर असलेल्या एका बंगल्याजवळ ती थांबली.त्या बंगल्याजवळ ५५
वर्षाची व्यक्ती दिसत होती.त्या गाडीतून ३२ वर्षाचा माणूस बाहेर पडला आणि त्या ५५
वर्षाचा माणसाजवळ तो गेला.हा ५५ वर्षाचा माणूस म्हणजे इचलकरंजी शहरातील सुप्रसिद्ध
उद्योगपती आणि मुरलेले शास्त्रज्ञ ‘डी.के साहेब’ आणि ३२ वर्षाचा माणसाचे नाव ‘महेश’.त्यांचा
चालक.
डी.के,“महेश,किल्ली माझ्याजवळच होती.मला सापडलीच नाही.’’
महेश काहीच
बोलला नाही.
डी.के
साहेबांचा कोथरूड जवळ टुमदार बंगला होता.साहेब आणि त्यांचा चालक सकाळी इचलकरंजीहून
निघाले होते आणि दुपारी १२.१० ला पुण्यात आले होते.पण आल्यावर साहेबांच्या लक्षात
आले की त्यांनी त्यांच्या बंगल्याची किल्ली इचलकरंजीलाच विसरली आहे.म्हणून त्यांनी
त्यांच्या चालकाला परत इचलकरंजीला त्यांच्या बंगल्याची किल्ली आणायला पाठवले होते.त्यांचा
चालक महेश खेड-शिवापूरजवळ गेल्यावर साहेबांच्या लक्षात आले की किल्ली त्यांच्या
पाकिटात आहे.मग त्यांनी महेशला परत फोन करून पुण्यात बोलवून घेतले.
महेशने किल्ली साहेबांकडे
दिली.साहेब आणि महेश दोघे बंगल्यात गेले.बंगल्यात आल्यावर साहेबांचे काही सामान
त्यांच्या महागड्या गाडीमध्ये होते.ते महेश बंगल्यात घेऊन आला आणि ते सामान त्याने
साहेबांना दिले.साहेबांचा बंगला म्हणजे ६ खोल्यांचा होता.तीन खोल्या ग्राउंड फ्लोअरला
होत्या आणि उरलेल्या तीन पहिल्या मजल्यावर होत्या.महेश सर्व घर पाहत होता.ग्राउंड
फ्लोअरला असलेल्या तीन खोल्यांच्या बाहेर ‘शंभर वर्ष’ ‘दीडशे वर्ष’ ‘दोनशे वर्ष’
अशी नावं लिहिलेली त्याला दिसली.त्याला त्या नावाचा अर्थ कळेना.बंगल्यात आल्यावर महेशला
भूक लागली होती.
महेश,“साहेब.मी
जेवण...’’
डीके,“थांब.एक
काम कर..जवळून चार लिटर दुध आणि ब्रेड घेऊन ये.”
आधीच सकाळच्या
साहेबांच्या धांदरटपणामुळे महेशला प्रचंड मनस्ताप झाला होता.तो साहेबांना भरपूर
पुणेरी आणि कोल्हापुरी शिव्या घालत होता(मनातल्या मनात).महेश विचार करू लागला.
“भर दुपारी चार
लिटर दुध...’’
“हा माणूस....कधी
काय करेल कोण जाने?’’
मनातल्या मनात
विचार करत महेश बाहेर पडला आणि काही वेळात तो चार लिटर दुध आणि ब्रेड घेऊन
साहेबांच्या बंगल्यात आला.साहेबांनी त्याच्याकडून दुध आणि ब्रेड घेतले.बंगल्यात
साहेब आणि महेश दोघेच होते.दोघे स्वयंपाघरात होते.
डी.के साहेब,“महेश.हे
सर्व दुध तापव.’’
महेश,“साहेब..एका
वेळी चार लिटर.’’
साहेब,“तू...तापव
रे....प्रश्न विचारू नको.’’
महेशने लगेच एका
मोठ्या पातेल्यात दुध तापवले.काही वेळानी दुध तापवल्यावर त्याने gas बंद केला.तेवढ्यात साहेबांनी ब्रेडचे सँडविच केले होते.
डी.के साहेब,“महेश.हे
घे सँडविच.’’
महेश साहेबांकडे
पाहतच राहिला.
“दुपारी कुणी सँडविच
खातात का?’’
मनातल्या मनात
तो नाक मुरडत होता.पण त्याने किरकिर न करता ते सँडविच घेतले आणि खाल्यावर त्याला
आश्चर्य वाटू लागले.साहेबांनी सँडविच अप्रतिम बनवले होते.
महेश,“साहेब.तुम्ही
खाणार नाही.’’
साहेब,“तू
संपव.’’
साहेबांनी चार
लिटर उकळलेल्या दुधाची साय चमच्याने काढली;ती साय त्यांनी पूर्णपणे खाली आणि
उरलेलं दुध त्यांनी बंगल्यात असलेल्या झाडांमध्ये ओतून दिले.
महेश साहेबांकडे
डोळे फाडून पाहतच राहिला.साहेबांनी महेशला गाडीमध्ये जायला सांगितले.महेश लगेच
घराबाहेर निघाला आणि गाडीमध्ये येऊन बसला.
सायंकाळी ७.४५
वाजता:-
महेश गाडीमध्ये
बसलेला होता.तेवढ्यात डी.के साहेब आले आणि ते गाडीमध्ये बसले आणि दोघे जेवायला ‘जे.एम’
रोड जवळ गेले.तिथे दोघे हॉटेलमध्ये गेले.हॉटेल मध्ये गेल्यावर महेश आणि साहेब
समोरासमोर बसले.
डी.के साहेब,“अरे
महेश.ऑर्डर देतोस ना...’’
महेश,“अ...मला वाटले
तुम्ही देताय...’’
महेशने तेवढ्यात
वेटरला हाक मारली.वेटर पळतपळत त्याच्या जवळ आला.
महेश,“एक थाळी
आणि...साहेब तुम्हाला...’’
डी.के,“मेनू
कार्ड दे.मी वाचून ऑर्डर देणार.’’
महेशकडून
साहेबांनी मेनू कार्ड घेतले.लगेचच त्यांनी दाळ खिचडीची ऑर्डर दिली.ऑर्डर घेऊन वेटर
गेला.थोड्या वेळाने तो ऑर्डर घेऊन आला.दोघांनी जेवायला सुरवात केली.नंतर डी.के
साहेबांनी बिसलरीच्या दोन बाटल्या मागवल्या.त्यातली एक बाटली त्यांनी महेशला दिली.एक
बाटली स्वतःकडे ठेवली.स्वतःकडे असलेल्या बाटलीमधून त्यांनी पाणी काढले आणि
त्यांच्या जवळ असलेल्या कॉपरच्या पाण्याच्या बाटलीमध्ये ते पाणी ओतले.नंतर त्यांनी वेटरला
बोलावले आणि त्याला त्यांनी ती बाटली दिली आणि ते उकळून आणायला सांगितले.महेश पाणी
पीतपीत साहेबांकडे पाहत राहिला.वेटरने पाणी उकळून ते कॉपरच्या बाटलीत भरले आणि ती
बाटली त्यांनी साहेबांना दिली.थोड्या वेळात साहेबांनी ते पाणी संपवले आणि वेटरकडे
आणखीन एक बिसलरी मागवली आणि त्यातले पाणी परत त्याला गरम करून आणायला सांगितले.अशा
एका पाठोपाठ एक सात पाण्याच्या बाटल्या साहेबांनी वेटरला दिल्या आणि ते पाणी त्याला
उकळून आणायला लावले.एका पाठोपाठ एक पाण्याच्या बाटल्या देऊन वेटर वैतागून गेला पण
साहेब निर्विकार होते.जेवण झाल्यावर दोघे उठले आणि बंगल्याकडे निघाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी
१०.३०ला:-
साहेब
बंगल्यातून बाहेर पडले आणि महेशबरोबर गाडीमधून निघाले.थोड्यावेळाने दोघे
कोर्टासमोर आले.साहेबांनी महेशला गाडीमध्ये बसायला सांगितले आणि ते गंभीर चेहरा
करून कोर्टात गेले.
दोन तासांनी
साहेब आले.तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटत होते.ते हास्य महेशने
टिपले.साहेबांचा हसरा चेहरा पाहून तो खुश झाला.नंतर दोघे बाहेर पडले आणि कोथरूडजवळ
आले.तिथे आल्यावर महेशला साहेबांनी गाडी चेक-अप करून घ्यायला सांगितले आणि गाडी महेशने
शोरूम मध्ये आणली.शो-रूममध्ये आल्यावर दोघे गाडीमधून उतरले आणि तिथे असलेल्या
कामगार गाडीजवळ आला आणि गाडी चेक करू लागला.गाडी चेक करून झाल्यावर त्याने गाडीमध्ये
बरेच काम करायचे असल्याचे सांगितले.त्याचबरोबर गाडीचे बरेच रनिंग झाले असल्यामुळे
मेंटेनन्स करायचा असल्याचे सांगितले.साहेबांनी त्याला फक्त साधारण चेक-अप करायला
सांगितले.साहेबांचे ऐकून तो कामगार गेला आणि गाडीचा चेक-अप करायला त्याने सुरवात
केली.पूर्ण चेक-अप केल्यावर त्याने साहेबांना गाडी दाखवली.साहेबांनी आणि महेशने गाडीवर
नजर टाकली.साहेबांना गाडीचे केलेले काम आवडले नसल्याचे महेशला जाणवले.साहेबांच्या
चेहऱ्यावर आठ्या पडू लागल्या.साहेबांनी त्या कामगाराला जवळ बोलावले आणि स्वतःला
हवे तसे त्यांनी त्याच्याकडून काम करून घेतले.काही वेळानी गाडीचा चेक-अप पूर्ण
केल्यावर साहेब आणि महेश गाडीत बसले.तेवढ्यात तिथे असलेला शो-रूमचा माणूस पळत पळत
साहेबांच्या जवळ आला आणि त्याने त्यांना चेक-अपचे बिल दिले.बाराशे रुपये झालेले बिल
पाहून साहेबांनी शांतपणे शोरूमच्या माणसावर नजर फिरवली.महेशला ही वादळापूर्वीची
शांतता वाटू लागली.
साहेब,“तुमचे
शोरूम बिनकामाचे आहे आणि तुम्ही सर्व लोकं गाढव आहात.हे बाराशे रुपये तुम्हीच मला
द्या.तुमच्या कामगाराला गाडीची साधी माहिती नाही.त्यांना पंक्चर कसे काढायचे ते
माहित नाही.त्याला गाडीमध्ये कुठे कायकाय आहे ते माहित नाही.मी आणि माझ्या चालकाने
त्याच्या समोर उभा राहून पूर्ण काम करून घेतले आहे.तो नवखा आहे.ह्यात त्याचा काहीच
दोष नाही.तुम्हीच त्याला शिकवले नाही.त्यामुळे हे बाराशे रूपये भरायचा मला प्रश्नच
येत नाही.तुम्हाला चांगली सर्विस देता येत नाही तर पैसे कसे काय तुम्ही मागू
शकता?मलाच द्या तुम्ही बाराशे रुपये.’’
साहेबांचे शब्द
ऐकून तो शोरूमचा माणूस साहेबांची माफी मागू लागला.अखेर वादानंतर साहेबांनी त्याच्या
हातात चारशे रुपये टेकवले आणि ते आणि महेश बाहेर पडले आणि कोथरूडजवळ आले.तिथे परत
दोघे बंगल्यात गेले आणि जेवण करून परत इचलकरंजीला निघाले.दुपारचे २.००. वाजले
होते.महेश आणि साहेब न थांबता निघाले होते.तासाभरात दोघे पुण्याच्या बाहेर आले आणि
खेड-शिवापूरजवळ आले.गाडी चालवत असताना गाडीत असलेल्या टेपवर साहेबांचे आवडते गाणे “पुकारता चला हु में..’’ लावले होते.ते
गाणे झाल्यावर लगेच साहेबांचे आवडते गाणे “जिंदगी ख्वाब है..’’हे महेशने
लावले.दोन्ही गाणी साहेबांची आवडती होती.साहेब गाडीमध्ये मागच्या सीटवर बसून गाणी
ऐकत पाईप ओढत होते आणि त्याचा वास महेशला येत होता.गाणी ऐकत..पाईप ओढत... साहेब
स्वतःच्या धुंधीत हरवले होते आणि महेश त्या पाईपच्या धुराचा वास सहन करत गाडी
चालवत होता आणि साहेब निर्विकार होऊन संगीताचा आस्वाद घेत शांतपणे बसले होते.
सायंकाळी ६.४८
वाजता:-
महेश आणि साहेब इचलकरंजीजवळ
आले.तिथे इचलकरंजीपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात दोघे गेले.तिथे एका
गॅरेज जवळ दोघे थांबले.त्या गॅरेजमध्ये जुन्या काही रिक्षा आणि काही मारुती कार होत्या.साहेब
गाडीमधून उतरले आणि त्या गॅरेजच्या मालकाशी बोलू लागले.महेश गाडीतच होता.साहेबांनी
महेशला गाडीमधून उतरायला सांगितले.महेश गाडीमधून उतरला आणि साहेबांच्या जवळ आला. गॅरेजचा
मालक साहेबांना रिक्षा दाखवत होता. ते दृश्य पाहून महेश चपापला.तीस लाख रुपये
किमतीच्या गाडीत फिरणाऱ्या माणसाला रिक्षा पहायची काय गरज पडली?
साहेब,(महेशकडे
पाहत)“तू निघ पुढे.’’
महेश,“आणि
तुम्ही...”
साहेब,“मी ह्या
रिक्षा मधून येणार आहे.’’
महेश परत
चपापला.
महेश,“काय...?’’
साहेब,“माझ्याबरोबर
हे असणार आहेत.मी ह्यांच्या बरोबर येणार आहे.’’
गॅरेजच्या
मालकाकडे पाहत साहेब महेश बरोबर बोलत होते.
महेश,“पण...रिक्षा
कशाला...?’’
साहेब,“कापणार आहे...ती
रिक्षा मी..इचलकरंजीच्या कारखान्यात.’’
साहेबांचे वाक्य
ऐकून महेश काहीच बोलला नाही.थोड्या वेळात साहेब गॅरेजच्या मालकाबरोबर रिक्षात बसून
बाहेर पडले.आणि महेश साहेबांच्या गाडीमध्ये बसला.
तेवढ्यात
गाडीमध्ये असलेल्या टेपमधून “दुनिया मे रेहना
है तो काम कर प्यारे.हात जोड
सबको सलाम कर प्यारे..” हे गाणे ऐकू येऊ लागले.ते गाणे शांतपणे ऐकत ‘साहेब रिक्षा वर कसला प्रयोग करणार…’ ह्याच्या विचार करत महेश इचलकरंजीला
निघाला.
©
Kaushik
No comments:
Post a Comment