Sunday, 4 November 2018

हाय जम्प

सायंकाळचे ५.०० वाजले होते.आजूबाजूला जोरदार वारे सुटले होते.पक्षांच्या किलबिलाट ऐकू येत होता.अधूनमधून गारेगार वाऱ्याची झुळूक जाणवत होती.लांबून सूर्यास्त दिसत होता.मधूनच स$रररर... असा आवाज ऐकू येत होता.अजस्त्र आणि भयावह वाटणाऱ्या पर्वतरांगा आजूबाजूला गुपचूप उभ्या होत्या.पर्वतरांगांमधून दिसणारी दरी अधिकच भयावह वाटत होती.लांबून एखादी गाडी आणि एखादी बस दिसत होती.मधूनच वाऱ्याचा वेग वाढत होता आणि कमी होत होता.जसजसे वेळ वाढत होता तसे आजूबाजूला भयावह वाटणारी अशी निःशब्द... अशी शांतता पसरत होती.पक्षांच्या किलबिलाट हळूहळू वाढत होता.

अजस्त्र अश्या असणाऱ्या पर्वतांमधून पायवाट दिसत होती.तिथून हळूहळू पायांचा आवाज येऊ लागला.२८ वर्षाचा तरुण तिथे असणाऱ्या पायवाटेवरच्या लहान झाडांवर पाय देत पुढे जात होता.पायवाटेवरून वाट काढत आजूबाजूला असणाऱ्या दगडांना धरत तो डोंगराच्या टोकाशी गेला आणि तिथे असणाऱ्या एका मोठ्या दगडाला टेकून उभा राहिला.त्याने वेळ पाहिली.सायंकाळचे ५.४५ वाजले होते.तो बराच उदास वाटत होता. त्याचा चेहरा बराच उदास आणि त्रासिक झाला होता.तो काही वेळ जमिनीवर विसावला आणि मनातल्या मनात विचार करू लागला.

“कधी संपणार हा त्रास...”

“किती प्रयत्न केले पण काही केल्या मार्ग दिसत नाही.आधी शिक्षणात अपयश;मग व्यवसायात अपयश...न संपणारा कर्जाचा डोंगर...”

तो खचून गेला होता.

“आयुष्यात आता काहीच उरले नाही.”

“कशाला जगायचे असे आयुष्य...”

“ह्या सर्व गोष्टींचा मला वैताग आला आहे.मला मुक्तता हवी आहे ह्या सर्वांमधून...”

विचार विचार करून तो पार खचून गेला.हळूहळू त्याच्या डोळ्यांमधून पाणी येऊ लागले.

“मी एवढ्या सर्व धार्मिक गोष्टी करतो तरी पण माझ्याच वाटेला हा त्रास...”

तो रडू लागला.रडूनरडून त्याचा चेहरा सुजला आणि त्याचे डोळे लालबुंद झाले होते.

त्याला सारेकाही संपले असे वाटत होते.

तो उठून उभा राहिला.त्याच्या मनात हा त्रास आता कायमचा संपवायचा असा भयानक विचार येऊ लागला.त्याने घड्याळ पाहिले.सायंकाळचे ५.५५ वाजले होते.तो हळूहळू डोंगराच्या एकदम टोकापाशी आला.त्याच्या कानावर सु$$$ई अश्या आवाजात गार वारे येऊ लागले.लांबून त्याला एका बाजूला सूर्यास्त दिसू लागला.त्याने आजूबाजूला दगडांवर अनेक प्रेमात बुडालेल्या व्यक्तींचे नाव पाहिले.स्वराजाची आठवण आणि साक्षीदार असलेल्या डोगरांच्या दगडांवर अनेक सैराट प्रेमींची नावं पाहून त्याला खटकले.तो आता दरीच्या अगदी जवळ गेला.त्याने मनातल्या मनात निश्चय केला.लांबून सूर्य त्याला आता लालेलाल दिसू लागला.त्याने आजूबाजूला मनसोक्त शेवटचे पाहिले...आणि त्याने उंच खाली उडी मारायची ठरवली.तो उंच उडी मारणार तेवढ्यात त्याला  तिथे एक दगड दिसला.त्याचबरोबर त्याला इतिहासाची साक्ष असणारा असा एक सुप्रसिद्ध गड पर्वतरांगांमधून दिसू लागला.

त्या दगडावर काहीतरी लिहिले होते.त्याने ते पाहिले.

“हे ही दिवस जातील.तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...”

त्याने ते वाक्य पुन्हा-पुन्हा वाचले.एक ते दोन मिनिटे तो ते वाक्य पुन्हा-पुन्हा वाचू लागला.फिनिक्स पक्षाप्रमाणे त्याची विचारचक्रे बदलू लागली.त्याच्या डोळ्यांमध्ये पुन्हा उमेद दिसू लागली.त्याने परत दरीत पाहिले.त्याला लांबून एक पक्षी उंच आकाशात झेप घेताना दिसला.त्याने परत तो इतिहासाची साक्ष देणारा गड पाहिला.त्याच्या अंगावर रोमांच येऊ लागले.

तो गड पाहून त्याने दीर्घ श्वास घेतला.त्याने खिशातून रुमाल काढला आणि त्याने स्वतःचे डोळे पुसले.परत त्याने दीर्घ श्वास घेतला आणि तिथे असलेली माती त्याने हातात घेतली आणि कपाळावर लावली आणि  पुन्हा नवीन उमेदीने अंगात बारा हातींचे बळ घेऊन तो डोंगर उतरू लागला.

©Kaushik shrotri.
#ichalkaranji

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...