Monday 29 October 2018

03:00 P.M



दुपारचे 03:00 वाजलेले होते.वैशाखाचा वणवा जोरदार पेटलेला होता. तापमान ४२ अंश होते.सुर्यनारायण दिवसेंदिवस डोळे वटारु लागले होते.वाऱ्याचा किंचितही लवलेश दिसत नव्हता.जमीन हळूहळू तापू लागली होती.कडकडीत ऊन पडलेले होते.मधूनच धुळीचा लोट येत होता आणि विरत होता.लांबून एखादे वाहन आणि एखादा ट्रक दिसत होता.आजूबाजूला असलेली झाडं सुकू लागली होती.मधूनच एखादा दुचाकीस्वार जात होता.अश्या ह्या पराकोटीच्या उन्हात तो डोक्यावर टोपी न घालता आणि पायात स्लीपर घालून येत होता.५ फुट ४ इंच,३५ वर्षाचा,फाटलेले आणि मळलेले कपडे आणि काळे झालेले हात अश्या अवतारात तो येत होता.बरेच अंतर चालुन आल्यामुळे तो थकलेला दिसत होता.हळूहळू तो चालत येत होता.चालत येत असताना तो घामाने डबडबू लागला.


तो चालत आजूबाजूला आडोसा शोधू लागला.पण आजूबाजूला काही कारखाने सोडल्यास पूर्ण ओसाड रान होते.तो चालत रस्त्यावरून जात असताना त्याला काही दुचाकीस्वार दिसत होते.त्यांना तो थांबवायचा प्रयत्न करत होता पण कुणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते.तो कासवाच्या गतीने चालू लागला आणि त्याला काही अंतरावर पिंपळाचे झाड दिसले.त्या झाडाखाली तो झाडाला लागून असलेल्या कठड्यावर बसला.पिंपळाच्या झाडाखाली त्याला बराच गारवा मिळत होता.काही मिनिटे तिथे बसल्यावर तो परत उठला आणि चालू लागला आणि त्याने त्याच्या खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि कुणाला तरी फोन लावण्याचा प्रयत्न केला.


“Hello!....Hello”


पलीकडून आवाज आला.


“Hello!.कोण बोलत आहे? बोला ना....Hello…”


“मी बोलतोय....मी.....”


पलीकडून फोन कट झाला.


वैतागून तो परत चालू लागला.काही अंतर चालून झाल्यावर त्याला चहाची टपरी दिसली.एका झाडा जवळ असलेल्या  त्या टपरीजवळ तो गेला आणि तिथे तो बसला.त्याला तहान लागली होती म्हणून त्याने तिथे असलेल्या पाण्याच्या पेल्यातून पाणी पिऊ लागला.तो पाणी पिताच तिथे असलेले ४-५ माणसे तिथून झपाझपा पळू लागली.त्याला वाटले त्याच्या अवतारावरून ती माणसे पळून गेली असणार.त्याने त्याच्या अवताराकडे पाहिले.त्याचा अवतार भयंकर झाला होता.चेहरा काळा पडत होता.हात काळे पडत होते आणि केस पांढरे होऊ लागले होते.इतक्यात आपण म्हातारे होऊ असे त्याला वाटले नाही.त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या होत्या.


“किती तो ताण...किती तो त्रास..”


तो स्वतःशी पुटपुटत होता.


“इतके राब राब राबून देखील काय उपयोग आहे?बास झाले आता...पुरे तो संसार आणि जगणे...काही केल्या प्रश्न सुटत नाही आहेत.खर्च वाढत आहेत आणि पगार.....राबून पण काय उपयोग झाला?”


तो स्वतःशी मनातल्या मनात बोलू लागला.


“हा त्रास कधी संपणार?”


विचार करून करून त्याच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या.टपरीजवळ ४-५ लोकं जमलेली होती.पण कुणीही त्याच्याकडे पाहत नव्हते.


तो टपरीजवळ असलेले पाणी पुन्हा पिऊ लागला.पाणी पिऊन झाल्यावर तो पुन्हा चालू लागला.काही अंतर चालून गेल्यावर त्याला मोठा कारखाना दिसला.तिथून तो गेट मधून आत शिरला. तो आत शिरत असताना गेट जवळ त्याला watchman पण दिसला नाही.आत शिरल्यावर तो ऑफिस जवळ गेला.तिथे त्याला सर्व कामगार आणि मालक दिसत होते.तिथे कसलातरी कार्यक्रम सुरु होता.तो त्या कार्यक्रमाकडे पाहू लागला.उत्तम कमगिरी करणाऱ्या सर्वांना बक्षीस वाटपाचा कार्यक्रम सुरु होता.तो लांबून त्या कार्यक्रमाकडे पाहू लागला.


काही वेळानंतर सर्व कामगार बाहेर आले आणि घरी जाऊ लागले.गेट च्या बाहेर उत्तम काम करणाऱ्या कामगारांचे सर्व जण अभिनंदन करू लागले.त्यापेकी एका कामगाराचे नाव प्रसाद होते. त्याला वर्षात सर्व दिवस हजर राहिल्याबद्दल सर्वजण अभिनंदन करत होते.त्याचे अभिनंदन करायला तो त्याच्या जवळ गेला.


“मित्रा, अभिनंदन!”


“धन्यवाद.”


“वर्षात तू एकदाही सुट्टी घेतली नाहीस.”


“कधीच नाही.काम हेच आपले देव आणि श्वास.”


“बरे वाटले मित्रा तुला बक्षीस मिळाल्याबद्दल.खूप कमी लोकांना त्यांच्या सच्चेपणाचे फळ मिळते.”


“कष्ट केल्यावर फळ हे उशिरा का होईना पण मिळते हा जगाचा नियम आहे.”


प्रसाद त्याच्याशी मोकळेपणे बोलत होता.


“प्रसाद.मग आत्ता पुढे?पुढची पोस्ट?”


“पाहू...साहेबांच्या मनात काय आहे ते...योग असेल तर एक दिवस Quality Engineer नक्की होईन.”


“तुला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा मित्रा.तुला भेटल्यावर मला समजले की काम करणार्याची जगात कदर होते”


“Thank you.तू नवीन आहेस का?तुला कधी पाहिले नाही मी.”


“मी कायम इथेच असतो इतरांसारखा सर्वसामान्य कामगार.”


“तरीपण मला सर्व जण माहिती आहेत.तुला नेमके कधी पाहिले ते आठवत नाही.”


“माझ्याबद्दल तू काही तासांपूर्वी ऐकले आहेस.”


तो प्रसाद कडे डोळे एकटक ठेऊन पाहू लागला.


“कधी...”


“आठव....”


प्रसाद आठवू लागला.


“तुला बक्षीस कुणाच्या तरी स्मरणार्थ मिळाले आहे.”


“कुणाच्या...”


“काही वर्षापूर्वी एक कामगार...”


प्रसाद त्याला मिळालेल्या मेडल कडे पाहू लागला.मेडल कडे पाहिल्यावर त्याच्या डोक्यात tube पेटली.तो प्रसादच्या जवळ आला आणि त्याच्याकडे तो निर्विकारपणे पाहू लागला.प्रसाद त्याच्याकडे भेदरून पाहू लागला.तो  प्रसाद कडे एकटक पाहू लागला आणि तो हळूहळू वातावरणात विरळ होत गेला आणि प्रसाद त्याच्या हातात असलेल्या मेडल कडे पाहतच राहिला.त्याला बक्षीस समारंभात झालेले भाषण आठवू लागले.


“प्रसाद ह्यांना पूर्ण वर्षभर एकही सुट्टी न घेतल्याबद्दल श्री.बबन हिंगमिरे ह्यांच्या स्मरणार्थ विशेष बक्षीस प्रदान करण्यात येत आहे.”


©


Kaushik Shrotri


Ichalkaranji


No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...