Tuesday, 30 January 2018

Mesmerizing Kerela...














१ ऑक्टोबर २०१७ ला आमचं केरळ भटकंतीवर स्वार व्हायचे अचानक ठरले आणि माझ्या मनातल्या मनात आनंद..उत्साह...रोमांच....अश्या भावनांना भरती येण्यास सुरवात झाली.आई,बाबा,भाऊ,मी आणि माझे मामा,मामी आणि बहिणी असे मिळून ८ जणांची टीम भटकंतीच्या स्वारीस निघाली होती.भटकंती हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे.वेगवेगळ्या नवीन राज्यात भटकंती करत जाणे,रोड ट्रीप वर जाणे,नवीन लोकांना भेटणे ह्या माझ्या अत्यंत आवडीच्या गोष्टी आहेत.नेमकं ह्यावेळेस दिवाळी दरम्यान भटकंती असल्याने घरात दिवाळी साजरी करता येणार नाही हे मला जाणवत होते.पण भटकंती चा उत्साह माझ्या अंगात रोमांच निर्माण करत होता आणि ह्यावेळेस विमानप्रवास असल्याने माझा उत्साह शिगेला पोहोचला होता.एव्हाना माझे मन केव्हाच केरळ च्या भटकंतीवर निघाले होते.आमची भटकंती ची तारीख ठरली १८ ऑक्टोबर.बरोबर १७ ऑक्टोबर ला घरात लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम करून प्रवासाला लागणारे सामान आणि कपडे गच्च भरून तयार ठेवले. १८ ऑक्टोबर ला सकाळी पहाटे ५.०० वाजता निघणार असल्याने सर्व सामानाची आवराआवरी करून पहाटेचा ३.०० चा गजर लाऊन मी शांतपणे निद्राधीन झालो.







                             १.१८ ऑक्टोबर
पहाटे ३.०० वाजता बरोबर जाग आली.डोळ्यांवरची झोप अजून तरंगत होती.पण पहिला मोठा विमानप्रवास करायचा असल्याने आणि ट्रीप चा पहिला दिवस असल्याने झोप उडायला वेळ लागला नाही.घरात सामानाची आवराआवरी सुरु झाली.मोठा प्रवास असल्याने सर्व सामानाची आवराआवरी करून आमची ८ जणांची टीम पहाटे ५.२५ वाजता बेळगाव च्या विमानतळाच्या दिशेने रवाना झाली.आमच्या स्वागताला आणि आमचा प्रवास सुखकर करायला हूडहुडी थंडी आणि दिवाळी पहाट मुक्त हस्ते हात पसरून उभ्या होत्या.दिवाळी चा पहिला दिवस होता.सगळीकडे दिवाळी ची जोरदार तयारी चालू होती.रांगोळ्या,पणत्या आणि फटाक्यांची दारोदारी जोरदार तयारी चालू होती.सर्व तयारी न्याहाळत आम्ही बेळगाव विमानतळाच्या दिशेने सकाळी ५.२५ वाजता सुसाट सुटलो होतो.माझ्याबरोबर भाऊ आणि बहिणी असल्याने भरपूर धम्माल होणार हे मी पूरेपूर जाणून होतो. कागल मार्गे आम्ही सुसाट वेगाने निघालो होतो.कागल आणि बेळगाव चा रस्ता अतिशय उत्कृष्ट असल्याने प्रवास किती सुखकर होऊ शकतो हे जाणवत होते.कागल सोडल्यावर मात्र आमच्यावर निद्रादेवता प्रसन्न झाली आणि थेट बेळगाव आल्यावर तिने आम्हाला रेफ्रेश करून बेळगाव विमानतळावर आमचा निरोप घेतला.मी कळत्या वयात पहिल्यांदा विमानतळ पाहत होतो.सर्व सामान विमानतळावर चेक इन केल्यावर आमच्या driver ला एक आठवड्याने ये असा निरोप देऊन त्याची इचलकरंजी ला रवानगी केली.विमानतळावर सकाळी ८.०० वाजता मस्तपैकी कांदेपोह्यांवर ताव मारून सेक्युरिटी चेक करून एक तासांनी येणाऱ्या विमानाची वाट पाहत सर्व जण बसलो.ट्रीप म्हणल्यावर फोटो हे यायलाच पाहिजेत.विमानतळावर सर्वांच्या फोन मधून फोटो चे flash सुरु झाले.विमानतळावर दिवाळीच्या फराळाची सोबत होतीच.दिवाळी फराळावर ताव मारत आणि अखंड सेल्फी काढत आम्ही विमानाची वाट पाहत बसलो.बरोबर ९ वाजून २५ मिनिटांनी विमान रनवे वर उतरले.सर्वांची गडबड सुरु झाली आणि आपआपले फोन सांभाळत आम्ही रनवे वर निघालो.आमचे सामान एव्हाना चेक इन होऊन विमानात पोहोचले होते.मी विमानाची धावपट्टी निरखून पाहत होतो.सकाळचे ९.३० वाजले होते.पहिल्या विमानप्रवासाची उत्सुकता आता काही वेळात संपणार होती.विमानप्रवासाबद्दल मी खूप ऐकले होते पण आता तो अनुभवायला मिळणार होता.आनंद..उत्सुकता...भीती...आणि रोमांच ह्या सर्व भावना माझ्या मनात दाटून येत होत्या.थोड्याच वेळात आपण आकाशात उडणार ही कल्पनाच मला परमोच्च आनंद देत होती.तो आनंद मनात साठवून ठेवण्यासाठी अखेर मनात विचारांचा कल्लोळ न करता मी विमानाकडे निघालो.बरोबर आई,बाबा,भाऊ,मामा,मामी आणि बहिणी होत्याच.विमानात प्रवेश करत असताना प्रत्येकाचे तिकीट तपासले जात होते.सर्वांची तिकिटे तपासल्यावर आम्ही विमानात प्रवेशासाठी असलेल्या शिड्या चढत विमानात प्रवेश केला.आमच्या स्वागतासाठी एक नयन रम्य अप्सरा उभी होती. तिच्या भरभरून असलेल्या नैसर्गिक सौंदर्य आणि मेकअप कडे पाहून मला विमान प्रवास खूप सुखकर होणार असे दिसू लागले.मला विमानात असणार्या अप्सरांचे कौतुक वाटते.खासगी आणि व्यावसाईक आयुष्य कसे जगावे ही गोष्ट हवाई सुंदरींकडून शिकावी असे मला वाटत होते.आपल्या खासगी आयुष्यात कितीही अडचणी असतील तरीही ह्या हवाई सुंदरी विमानात प्रत्येकाचे गोड बोलून गोड हास्य देऊन स्वागत करणार म्हणजे करणार.आमचे देखील हवाई सुंदरीने गोड हास्य देऊन स्वागत केले आणि जागेवर बसण्यास सांगितले.मला योगायोगाने खिडकीजवळ जागा मिळाली. Spice Jet चे ५० सीटर चे विमान होते.पूर्ण विमानात ४० प्रवासी बसले होते.पायलट कडून भरपूर  सूचनांचा पाऊस पडत होता.पायलट च्या सूचना संपल्यावर हवाई सुंदरीने विमानात सुरक्षा उपकरणे कशी वापरावीत ह्याचा डेमो दिला.हवाई सुंदरीचा डेमो संपल्यावर सर्वांना आपआपले mobile silent मोड वर ठेवण्याच्या सूचना आल्या.अखेर टेकऑफ ची वेळ आली.मी खिडकीबाहेरचे दृश पाहत होतो.विमानाची चाके मला अगदी क्लिअर दिसत होती.सर्वांनी आपआपले seat बेल्ट बांधलेले होते.विमानाचे Exit चे दरवाजे बंद होऊन विमान टेकऑफ च्या तयारीत होते.मी विमानाबाहेरचे दृश्य पाहत होतो.सुरवातीला कासवाच्या गतीने विमान निघाले होते.नंतर क्षणात पायलट नं विमानाचा वेग वाढवला.विमानाच्या वेगावरून मला जाणवत होते की वेग हा १५० kmph च्या पुढे आहे.सुसाट पाळणाऱ्या विमानात मी सीट घट्ट धरून बसलो होतो.सुसाट पाळणाऱ्या वेगासमोर विमानात कंपने जाणवू लागली आणि काही क्षणात...आम्ही अवकाशात झेप घेतली.ह्या क्षणी मला बालपणी कागदी विमान हवेत सोडत असताना चे क्षण आठवले.ह्या क्षणी मी डोळे घट्ट मिटून घेतले.थोडेसे गरगरल्यासारखे मला जाणवले.पण नंतर मी डोळे उघडले आणि खिडकीच्या बाहेर नजर टाकली आणि माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले.मला बेळगाव शहराचा top view अगदी क्लीअर दिसत होता.एव्हाना विमानाने आकाशात झेप घेऊन १ मिनिटे झाली होती.मी खिडकीबाहेरचे दृश्य भरल्यासारखा पाहतच राहिलो.निळे आकाश...पसरलेला सूर्यप्रकाश...आणि विमानाच्या अगदी जवळून जाणारे ढग...हे दृश्य पाहताच माझ्या मनातील भीती,भविष्याची चिंता सर्व काही नाहीसे झाले.मधूनच येणारे ढग...ढगांखाली मुंगीच्या आकाराची दिसणारी दृश्ये... आणि त्याआडून येणारा सूर्यप्रकाश...ही दृश्ये जणू काही मला कृत्रिम जगाच्या बाहेर काढत होती.शिक्षण,नोकरी,व्यवसाय,लग्न...ह्या चाकोरी आयुष्यातून ही दृश्ये मला बाहेर काढून भविष्याशी चिंता न करता बेधुंद जगण्याची ताकद देत होती.अवकाश आणि निसर्ग किती अफाट आहेत हे मला आत्ता जाणवत होते.निसर्ग कल्पनेपेक्षा उदार आहे हे मला जाणवत होते.मी खिडकीबाहेर पाहत असताना विमानात हवाई सुंदरी माझ्यासमोर खाद्यपदार्थांचे मेनू कार्ड घेऊन हजर झाली होती.विमानात एखादा तरी खाद्यपदार्थ खावा हा विचार मनात आल्याने मी चिप्स घेतले.विमान तासाला ४०० kmph च्या वेगाने निघाले होते तरी जाणवत नव्हते.मी विमानात नजर फिरवली.बरेच जण मासिक वाचणे,संगीत ऐकणे,पुस्तक वाचणे ह्यामध्ये मग्न होते.अवकाशात दिसणारा प्रत्येक क्षण मी मनात साठवून ठेवत होतो.तेवढ्यात माझ्या बहिणीने फोटो काढण्यासाठी तिच्या पर्स मधून फोन बाहेर काढला आणि विमानाच्या पोटातले क्षण आम्ही फोन मध्ये साठवून ठेऊ लागलो.मोकळे आणि आनंदी आकाश पाहून आपण एका साच्यात आयुष्य जगत आहोत हे मला मनोमन पटत होते.सकाळी १०.५० मिनिटांनी बेंगलोर जवळ येत आहे अशी पायलट ने घोषणा दिली आणि ११.०० वाजता आम्ही बेंगलोर सिटी च्या हवाई कक्षात आलो.आता विमानाच्या landing ची तयारी सुरु झाली होती.मी खिडकीतून बंगलोर सिटी पाहत होतो.टोलेजंग इमारती,रस्ते मला अगदी गुगल maps वर दाखवल्याप्रमाणे दिसत होते.आता विमानाचे landing होत आहे अशी पायलट ची घोषणा आली.मी लगेच खिडकीबाहेर landing चे दृश्य कॅमेरा मध्ये कैद करून ठेऊ लागलो आणि काही क्षणात आम्ही Kempagauda  International Airport वर उतरलो.बरोबर ११.०६ मिनिटांनी विमान airport वर थांबले आणि आम्ही विमानातून उतरलो.मी रनवे वर नजर टाकली.चारीबाजुला विमानच विमानं दिसत होती.आमची पुढची कोची ची flight दुपारी ४.०० वाजता असल्याने आम्हाला भरपूर वेळ मिळाला होता.रनवे पासून airport पर्येंत प्रवाश्यांसाठी SpiceJet ची बस हजर होती.आम्ही बस मध्ये बसलो आणि बस ने आम्हाला थेट airport exit point च्या जवळ आणून सोडले.आमचे सामान आम्हाला थेट कोचीन ला मिळणार असल्याने आम्ही थेट पोटपूजा करण्यासाठी हॉटेल शोधू लागलो.मी airport निरखून पाहत होतो.स्वच्छता म्हणजे किती अतिउच्च दर्जाची असू शकते ह्याचा मला अनुभव येत होता.४००० acre मध्ये वसलेले विमानतळ म्हणजे अतिउच्च दर्जाचे होते.आम्हाला अजून ३.५० तास विमानतळावर घालवायचे होते.सर्वप्रथम आम्ही मोर्चा पोटपूजा कडे वळवला.विमानतळावर असलेल्या नंदिनी हॉटेल मध्ये आम्ही पोटपुजेसाठी गेलो.विमानतळावर बरीच गडबड चालू होती पण कुठेच रेटारेटी दिसली नाही.नंदिनी हॉटेल मध्ये आम्ही इडली सांबार आणि साउथ इंडिअन थाळीवर मनसोक्त ताव मारला.हॉटेल मधून बाहेर पडायला आम्हाला दुपारचे १२.३० वाजले होते.अजून आमच्याकडे भरपूर वेळ होता तोपर्येंत आम्ही तिथे असलेल्या विविध दुकानांमध्ये शॉपिंग साठी भेटी दिल्या.पुस्तकांपासून ते कपड्यांची दुकानं आम्ही पालथी घातली.पण तिथे असलेल्या वस्तू आणि त्याचा दर्जा आणि त्याच्या किमती ह्यामध्ये काहीही संबंध नसल्याने आम्ही एकही वस्तू घेतली नाही.नंतर विमानतळावर असलेल्या वेटिंग एरिया मध्ये आम्ही सर्वजण विमानाची वाट पाहत बसलो.फावला वेळ आम्ही सेल्फी घेत फोटो instagram वर upload करण्यात घालवला.तोपर्यंत दुपारचे ३.१५ झाले होते.एव्हाना विमानाची घोषणा कधीच झाली होती.आम्ही security check पूर्ण करून SpiceJet च्या बस मध्ये एकत्र जमा झालो.सर्व प्रवासी जमल्यावर ती बस आम्हाला विमानापर्यंत घेऊन निघाली.ह्यावेळेस SpiceJet चे विमान जरा मोठे वाटत होते.आमचे स्वागत ३ सर्वगुण संपन्न असलेल्या हवाई सुंदरींनी केले.मी त्यांच्यावर नजर फिरवली.त्या मला भारतीय वाटत होत्या नाहीतर बेळगाव ते बेंगलोर च्या विमानात आम्हाला NRI हवाई सुंदरी भेटली होती.विमानात सर्व सूचनांचा भाडीमार संपल्यावर टेक ऑफ ची घोषणा झाली.विमानाचे सर्व दरवाजे बंद झाले.विमान टेकऑफ कडे हळूहळू कूच करत होते.ह्यावेळेस देखील मला विमानाच्या खिडकीजवळ जागा मिळाली.मी लगेच फोन काढून खिडकी बाहेर असलेले विमानतळावरचे दृश्य फोन मध्ये टिपत होतो.पूर्ण धावपट्टी मोकळी दिसत होती.टेकऑफ च्या दिशेने निघालेल्या विमानाचा वेग आता पायलट ने १००km च्याही पुढे वाढवला आणि काही क्षणात...विमानाने आकाशात झेप घेतली.मी खिडकी बाहेर नजर टाकली.बेंगलोर विमानतळ आता हळूहळू दिसेनासे होत होते.परत एकदा मला निळे आकाश आणि जाणारे ढग दिसू लागले.आनंद...उत्सुकता...उत्कंठा... आणि रोमांच ह्या भावनांनी मला पूर्णपणे घेरण्यास सुरवात केली.ढगांच्या आरपार जाणारे विमान...मधूनच येणारा सूर्यप्रकाश...चमकणारी वीज...विविध आकाराचे दृष्टीस पडणारे ढग मला आनंदाने तृप्त करून सोडत होते.ह्या क्षणाला मी सर्व तणाव,त्रास,नोकरी...आणि कृत्रिम आयुष्याच्या सर्व गोष्टी विसरून ट्रीप चा येणारा प्रत्येक क्षण हा दिलखुलास जगायचा आणि अनुभवायचा असे मनोमन ठरवून टाकले आणि मला दिसणारे निसर्गाचे सर्व अमूल्य क्षण फोन मध्ये कैद करण्यास सुरवात केली.बरोबर ४.५५ ला कोची विमानतळ जवळ येत आहे अशी विमानात घोषणा झाली.माझी नजर लगेच खिडकीबाहेर गेली.हिरवळीने नटलेली केरळ ची देवभूमी मला दिसत होती.लगेच मी कॅमेरा मध्ये केरळ चे अवकाशातून दिसणारे क्षण कैद करू लागलो.बरोबर सायंकाळी ५.०५ ला विमान कोची च्या विमानतळावर उतरले.पटापट आम्ही विमानातून उतरलो.रनवे वर असलेल्या Spice Jet च्या बस ने आम्हाला विमानतळाच्या ऑफिस पर्येंत पोहोचवले.कोची विमानतळ मला बेंगलोर विमानतळापेक्षा छोटे वाटत होते.तिथून आम्ही सामान घेऊन विमानतळाच्या बाहेर आलो.मी mobile वर कोची चे तापमान पाहिले आणि सुदैवाने ते २७ अंश होते.अवकाळी पावसाची कुठेही चिन्ह दिसत नव्हती.त्यामुळे ट्रीप अविस्मरणीय होणार हे मला दिसू लागले.ट्रीप ठरवताना आम्ही केरळ मध्ये रोड ट्रीप साठी पिवळ्या रंगाची Tempo-Traveller ठरवली होती.बरोबर सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी driver tempo-traveller घेऊन हजर झाला.गाडीवर मोठ्या अक्षरात सुलथान असे लिहिले होते(सुलथान ह्या नावाचा आणि गाडीमध्ये असणाऱ्या driver च्या व्यक्तिमत्वाचा काहीही संबंध दिसत नव्हता).आमच्या आठ जणांच्या bags आम्ही गाडीमध्ये ठेऊन पुढच्या प्रवासाला सज्ज झालो.गाडीत बसल्यावर driver चा परिचय झाला.पांढरा टी-शर्ट आणि लुंगी,विस्कटलेले केस,त्याची न कळणारी मल्याळम भाषा त्यामुळे पुढचे आठ दिवस खूप कसरत करावी लागणार असे दिसू लागले.त्याच्या अवतारावरून तो चेन्नई एक्स्प्रेस सिनेमा मधल्या व्हिलन च्या टोळीतला माणूस वाटत होता.पण सुदैवाने त्याला हिंदी समजत होते आणि थोडेसे बोलता येत होते त्यामुळे आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला.त्याच्या बोलण्यावरून त्याचे नाव आजी असे होते पण त्याचे आडनाव कळले नाही.आम्ही सर्व जण गाडीमध्ये बसलो आणि बाय रोड मुन्नार कडे निघालो.सायंकाळी ५.२० मिनिटांनी आम्ही निघालो.वातावरण अतिशय आल्हादायी होते.जाताना मुन्नार मध्ये आम्ही सायंकाळी ५.३० ला खास केरळ च्या चहाचा आस्वाद घेतला.अंगातला कंटाळा आणि थकवा दूर करणारा केरळी चहा पिऊन आम्ही बाय रोड निघालो.कोचीमधून बाहेर पडत असताना केरळ च्या दिलदार निसर्गाचे दर्शन घडायला सुरुवात झाली.गाडीमध्ये सर्वांना निद्रादेवी प्रसन्न होण्यास सुरवात झाली होती.माझ्या बहिणी आणि बाकीचे मंडळी मात्र लगेचच झोपले होते पण मी आणि माझा भाऊ जागे होतो.केरळ चे रस्ते अतिशय मजबूत आणि खड्डेमुक्त होते त्यामुळे बाय रोड प्रवास सुखकर होणार असे मला मनोमन वाटू लागले.नारळाची झाडे आणि केरळ चा सुपरस्टार मामुटी चे फोटो पाहत आम्ही निघालो होतो.ड्राईवर देखील वयाने लहान असूनसुद्धा अतिशय सराईत पणे गाडी चालवत होता.केरळ चा निसर्ग पाहत आणि हेडफोन वर गाणे ऐकत निद्रादेवता माझ्यावर गाडीमध्ये कधी प्रसन्न झाली मला देखील कळले नाही
रात्री ८.३५ मिनिटांनी आम्ही बरोबर मुन्नार मध्ये पोहोचलो.एव्हाना मला गाडीच्या होर्न च्या आवाजाने जाग आली होती.मी गाडीच्या खिडकीजवळ बसलो होतो.मी खिडकीबाहेर नजर टाकली.मुन्नार मध्ये हुडहुडी थंडी मी म्हणत चाललेली होती.मुन्नार मला पन्हाळा आणि महाबळेश्वर ची हुबेहूब आठवण करून देत होते.समुद्रसपाटीपासून ५२०० फुटावर मुन्नार वसलेले होते.रात्रीचे ८.४० वाजले होते. आम्ही गाडीमधून आमचे हॉटेल ग्रीन रिज ला उतरलो.हॉटेल ला २.५ मिरच्या रेटिंग होते.हॉटेल बॉय आमचे सामान घेऊन पटापट आमच्या रूम कडे निघाला.हॉटेल मध्ये चेक इन करून आम्ही रूम कडे निघालो.फ्रेश होऊन आम्ही जेवायला हॉटेल च्या restaurant कडे निघालो.योगायोगाने तिथे दिवाळी निमित गाण्यांच्या कार्यक्रम सुरु होता जिथे दोन गायक आपल्या बेंबीच्या देटापासून जोरदार आवाज काढत कर्कश्य आवाजात गाणी म्हणत आणि अस्सल रजनीकांत पद्धतीने नृत्य करत होते आणि त्याच्या साथीला असलेले पाश्वसंगीत आजूबाजूचे हॉटेल आणि परिसर हादरून सोडवत होते.कसेबसे जेवण करून आम्ही आपआपल्या रूम वर परतलो.रूम वर आल्यावर मी निःशंक मनाने काही क्षण बसलो.एका दिवसात एवढा प्रवास...मला काही काळ पटलेच नाही.सकाळी ५.०० ला आम्ही इचलकरंजी सोडले आणि सकाळी ८.३० ला बेळगाव ला हजर होतो.साडेनऊ चे विमान पकडून आम्ही सकाळी अकरा च्या दरम्यान बेंगलोर ला होतो आणि बेंगलोरहून दुपारचे ४.०० चे विमान पकडून ५.१० ला आम्ही कोची ला होतो.आजच्या प्रवासात शारीरिक थकवा अजिबात जाणवत नव्हता.एवढा मोठा प्रवास एका दिवसात...मला रोमांचित करत होता.अजून आमच्या ट्रीप मध्ये खूप धम्माल येणार होती.शांतपणे आजच्या दिवसभराच्या आठवणी मनामध्ये साठवत मी निद्राधीन झालो.






                        २.१९ ऑक्टोबर.
सकाळी ७.३० वाजता मला जाग आली.थंडी मी म्हणत होती.कालच्या प्रवासाने रात्री कधी झोप लागली मला समजलेच नाही.सकाळच्या सर्व क्रिया आवरून आम्ही नाष्टा करायला हॉटेल च्या restaurant मध्ये निघालो.हवामान देखील आल्हादायक होते.Restaurant मध्ये आम्हाला इडली सांबर,डोसा,वडे आणि rassam असा अस्सल साउथ इंडिअन पद्धतीचा नाष्टा तयार होता.नाष्ट्यावर ताव मारून आम्ही मुन्नार मध्ये रोड ट्रीप साठी निघालो.आमचा चालक गाडीजवळ हजर होता.सर्व जण गाडीमध्ये बसून कानन देवाण हिल्स कडे निघालो.निसर्गाने केरळ वर विशेषतः मुन्नार वर मुक्त हस्ते उधळण केली होती.आम्ही हिरवळीच्या कुशीत लपलेल्या रस्त्यांमधून वाट काढत,पत्ता विचारत निघालो होतो.प्रवास करत असताना आम्हाला मुन्नार चे चहा चे मळे दिसण्यास सुरवात झाली.हे चहाचे मळे पाहून मला Chennai Express ह्या हिंदी सिनेमा चे गाणे’’काश्मीर मे,तू कन्याकुमारी’’ ची आठवण झाली.बरेच मळे हे खोलवर पसरलेले होते.बरेच मळे पार करत करत आम्ही एका अनोळखी डोंगराळ भागाजवळ आलो.केरळ चा निसर्ग देखील हवामान उत्तम ठेवत व्यवस्थित होता पण मोठ्या मनाचा होता.घनदाट झाडी,पसरलेले अजस्त्र डोंगर,गारेगार हवामान आणि निसर्गाची छप्पर फाडके उधळण...मी अक्षरशः केरळ च्या निसर्गासमोर स्तब्ध झालो.मनाच्या खोलवर कुठेतरी अजून तरंगत असलेल्या बऱ्याच खासगी आणि व्यावसाईक आयुष्याच्या जबाबदारी आणि पुढच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांचे ओझे केरळ च्या निसर्गाने काही क्षणात भिरकावून लावले.डोंगराळ भागात असलेल्या इको point जवळ आम्ही गेलो.हातात असलेल्या कॅमेरा मधून फोटोंचा आणि सेल्फीचा धुमाकूळ सुरु होता.डोंगराळ भागात असलेल्या Eco Point पासून आम्हाला Chennai Express च्या सिनेमा चे काही locations पाहायला मिळाले.निसर्गाचे भरपूर फोटो कॅमेरा मध्ये कैद करून आम्ही मुन्नार च्या दिशेने निघालो.मुन्नार कडे जाताना आम्ही Mattupetty Dam कडे मोर्चा वळवला.Dam वर मनसोक्त फोटो काढून आम्ही पुढच्या ठिकाणाकडे निघालो.मुन्नार कडे जात असताना आम्हाला चहाचे मळे दृष्टीस पडत होते.दुपारचे २.३० वाजले होते.पुढे आम्हाला Devan hills च्या जवळ चहा बनवणारा कारखाना नजरेला दिसला.लगेचच आम्ही कारखान्याकडे मोर्चा वळवला.एन्ट्री तिकीट काढून आम्ही कारखान्याच्या shop floor च्या जवळ गेलो.Shop Floor पूर्णपणे automated होता.चहा कसा तयार होतो ह्याचे पूर्ण demonstration आम्हाला पाहायला मिळाले.काही चहा पावडर खरेदी करून आम्ही दुपारी ४.०० वाजता तिथून बाहेर पडलो आणि मुन्नार कडे मोर्चा वळवला.दुपारी २.३० वाजल्यापासून सर्वांच्या पोटात कावळे ओरडत होते.मुन्नार मध्ये एका लहानश्या हॉटेल मध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो.आम्ही केरळ मध्ये असल्यामुळे आम्हाला चपाती,भाकरी असे काही मिळणार नव्हते.हॉटेल अतिशय स्वच्छ होते.दुपारचे ४.१५ वाजले होते.आम्ही भात आणि रस्सम मागवले.काही वेळात एक सहा फुटी लुंगी नेसलेला वेटर भात आणि रस्सम घेऊन आला.अस्सल केरळी भात आणि रस्सम ने सर्वांना तृप्त केले.भाताबरोबर आम्ही पापडावर मनसोक्त ताव मारला.भाताने सर्वांना तृप्त केले.जेवण संपल्यावर आम्ही मुन्नार मध्ये हॉटेल च्या दिशेने निघालो.हॉटेल वर आल्यावर फ्रेश होऊन सायंकाळी ६.०० वाजता आम्ही परत मुन्नार मध्ये हत्तीसवारीचा आनंद घेतला.हलत डुलत असणारी हत्तीची सवारी हत्तीच्या सोंडेतून पाण्याच्या फवार्याने पूर्ण झाली.हतीच्या सवारीनंतर आम्ही हॉटेल वर परतलो.आज देखील गाण्यांचा जोरदार आवाज येत होता.सायंकाळचे ७.०० वाजले होते.आम्ही रूम वर जाऊन फ्रेश होऊन जेवणासाठी तयार झालो.हॉटेल च्या Restaurant मध्ये हिंदी आणि तमिळ गाणी मोठ्या आवाजांमध्ये २ गायक बेंबीच्या उगम स्थानापासून जोरदार आवाज करत किंचाळत आणि नृत्य करत म्हणत होते.रात्रीचे ८.३० वाजले होते.आमचे त्यांच्या आवाजामुळे निम्मे पोट भरले होते.त्यांचे जोरदार आवाज सहन करत केरळ च्या भातावर ताव मारून रात्री ९.२० वाजता हॉटेल च्या बाहेर रस्त्यावर फेरफटका मारायला सर्वजण निघालो.हुडहुडी थंडी मी म्हणत होती.मुन्नार पाहून मला पन्हाळ्याची आठवण झाली.मुन्नार ची बाजारपेठ हुबेहूब पन्हाळ्याची आठवण करून देत होती.रस्त्यावर रात्री ९.२५ वाजता फारशी वर्दळ दिसत नव्हती.आम्ही हॉटेल पासून चालत पुढे निघालो.दुकानं बंद होण्याच्या मार्गावर होती.जसजसे आम्ही चालत होतो तसतसे शांतता भयाण होत होती.२ km चालून आम्ही परत हॉटेल कडे परतलो.मी घड्याळाकडे पाहिले तर रात्रीचे ९.५५ वाजले होते.हॉटेल कडे आल्यावर आम्ही रूम कडे निघालो.दिवसभर भटकंती करून मी आणि माझा भाऊ दोघेही कंटाळून गेलो होतो.मी दिवसभर काढलेले फोटो पाहत होतो.आज आम्हाला मुन्नार चा बऱ्यापैकी भाग पाहायला मिळाला होता.केरळ चा निसर्ग अगदी जवळून पाहायला मिळाला होता.जरादेखील प्रदूषण नसलेली हवा आम्ही आज अनुभवलेली होती.केरळ चे आणि माझे क्षणात नाते जोडले गेले होते.आजचा अनुभव रोमांच निर्माण करत मनाला नवीन उभारी देणारा होता.अजून आम्हाला खूप काही पहायचे होते.मी शांतपणे दिवसभराच्या आठवणी मनामध्ये साठवत निद्राधीन झालो







 
                      
                        ३.२० ऑक्टोबर
सकाळचे ८.०० वाजले होते.मुन्नार च्या गुलाबी थंडीमध्ये निद्रादेवी पाठ सोडायचे नाव घेत नव्हती.पण आज आम्हाला मुन्नार सोडून संध्याकाळपर्येंत Thekkedy ला पोहोचायचे होते.फारसा वेळ न दवडता आम्ही रूम वरचे सामान आवरले.चेक आउट करून आम्ही हॉटेल च्या Restaurant ला निघालो.तिथे गरमागरम रस्सम,इडली सांबार,उडीद वडा आणि डोसा असा बेत आमच्या स्वागतासाठी तयार होता.सकाळचे ९.०० वाजले होते.केरळ मध्ये आल्यावर मी मनातल्या मनात पण केला होता.केरळ मध्ये मनसोक्त भात आणि इडली सांबार वर ताव मारायचा...असा ताव मारायचा की परत घरी गेल्यावर भात आणि इडली सांबार खाण्याची इच्छा देखील होऊ नये.सकाळ चा भरपेट नाष्टा आवरून आम्ही आमच्या Tempo Traveller च्या दिशेने निघालो.तेवढ्यात आम्ही  हॉटेल च्या बाहेर काही सेल्फी काढले.मी फोन वर मुन्नार चे तापमान पाहिले.अजूनही मला मस्तपैकी थंडी वाजत होती.गाडीमध्ये आम्ही सर्वजण बसून मुन्नार च्या बाजारपेठेकडे निघालो.एव्हाना बाजारपेठेमध्ये अजूनही वर्दळ दिसत नव्हती.आम्ही मुख्य बाजारपेठेमध्ये थांबलो.तिथे काही वस्तू खरेदी करून आम्ही अखेर मुन्नार च्या बाहेर निघालो.आम्ही पत्ता विचारत पुढे निघालो होतो.मुन्नार मध्ये आम्हाला बरेच लोक इंग्रजी आणि हिंदी बोलणारे दिसले त्यामुळे आमची अडचण झाली नाही.आम्ही Thekkedy च्या दिशेने मोर्चा वळवला.केरळ च्या चित्ततरुण निसर्गाचे दर्शन घेत आम्ही निघालो होतो.आम्हाला मुन्नार शहराच्या बाहेर वाटेत चहाचे मळे दिसले.लगेचच वेळ न दवडता आम्ही त्या चहाच्या मळ्यांच्या जवळ जाऊन पटापट फोटो काढले.फोटो काढून झाल्यावर आम्ही लगेचच गाडीमध्ये बसलो आणि प्रवासाला निघालो.आम्ही प्रवास करत असताना वाटेत आम्हाला Offroad Jeep Ride चा बोर्ड दिसला.तो पाहिल्यावर जराही वेळ न दवडता आम्ही गाडीमधून खाली उतरलो आणि जीप राईड साठी सुसज्ज झालो.सकाळचे ११.४५ वाजले होते.जीप चा driver आम्हाला पूर्ण माहिती देऊ लागला.ती २ तासांची ride होती जी केरळ च्या निसर्गाच्या अगदी जवळून जाणार होती.ह्या ride मध्ये आम्हाला Chennai Express चा शुटींग point,ponmudi point,वनस्पती आणि बर्यापेकी जंगल पाहायला मिळणार होते.लगेचच आम्ही जीप मध्ये बसलो आणि ४ व्हील ड्राईव ची जीप हालत डुलत ११.५५ ला पुढे निघाली.फोर व्हील ड्राईव चं सस्पेन्शन खूप अफलातून होतं.आम्ही मुन्नार च्या जवळ असलेल्या जंगलाच्या अतिशय जवळून जात होतो.चारी बाजूला भरलेली झाडं,वनस्पती पाहत आम्ही निघालो होतो.विविध फ्लेवर च्या वनस्पती आणि झाडे आम्हाला पाहायला मिळाल्या.वनस्पती पाहत आम्ही निघालो होतो.रस्ता बराच खराब होता पण ४ व्हील ड्राईव जीप असल्यामुळे आम्हाला धक्के फारसे जाणवत नव्हते.हळूहळू आम्ही जंगलात प्रवेश करत निघालो होतो.रस्ता बराच खराब होता.तब्बल २ किलोमीटर रस्ता पार केल्यावर आम्ही अखेर पक्या रस्त्याकडे आलो आणि सर्वांनी(चालक सोडून कारण त्याला हा प्रवास नेहमीचा होता)निःश्वास सोडला.आम्ही अखेर एका खडकाजवळ थांबलो.त्या खडकाजवळ लहानशी नदी वाहत होती आणि एका बाजूला हिरवळ सजलेली होती.लगेचच सर्वांनी कॅमेरे सुरु करून धडाधड फोटो काढायला सुरवात केली.तब्बल १५ मिनिटे आजूबाजूचा निसर्ग आणि हिरवळ फोन आणि मनामध्ये कैद करून आम्ही पुढे निघालो.तब्बल ३ किलोमीटर वर आम्हाला Handing bridge(झुलता पूल) दिसला.आम्ही जीप मधून खाली उतरून त्यावरून चालायला लागलो.पुलावरून चालत असताना मनामध्ये धडकी भरत होती.त्या bridge ची झूलण्याची ताकद प्रचंड असल्याने त्यावर फार वेळ न थांबता आम्ही तो चालत पार केला.पुढे आम्ही Chennai Express च्या शुटींग च्या लोकेशन वर आलो.सिनेमा मध्ये शाहरुख खान दीपिका च्या वडिलांच्या कार वर जोरदार लाथ मारतो त्या लोकेशन वर आलो होतो.एका नदीजवळ ते लोकेशन होते.आजूबाजूला घनदाट जंगल पसरलेले होते.दुपारचे १२.४५ वाजले होते.लोकेशन वर खूप गर्दी झाली होती पण गोंगाट कुणाचाही दिसला नाही.एव्हना १.०० वाजला होता.सर्वांच्या घश्याला कोरड पडली होती.सर्वांनी नारळाच्या पाण्याचा आस्वाद घेत लोकेशन वर फोटो काढले.लगेचच आम्ही जीप मध्ये बसलो आणि शेवटच्या point वर आलो.तिथून आम्हाला पूर्ण जंगल दिसत होते.एका बाजूला पूर्ण झाडांनी वाढलेले जंगल,दुसर्या बाजूला लांबून दिसणारे धरण अगदी स्पष्ट दिसत होते.इथे मला कोकणाची आठवण येत होती.केरळमध्ये पर्यटनावर भरपूर लक्ष दिले जात होते पण कोकणामध्ये अफाट निसर्ग आणि पर्यटनासाठी वाव असतानाही लक्ष का दिले जात नाही???ह्या ठिकाणावर जरा ऊन असल्यामुळे आम्ही फार वेळ न थांबता जीप मधून पुढे निघालो आणि आमची Offroad Trip समाप्त झाली.आम्हाला driver ने एका अनोळखी शहरात आणून सोडले जिथे आमच्या सुलतान टेम्पो चा चालक आमची वाट पाहत होता.आम्ही लगेचच गाडीत बसलो आणि पुढे Thekaddy च्या दिशेने निघालो.दुपारचे १.५० झाले होते.आम्ही वाटेत जेवणासाठी उतरलो.सर्वांना कडकडून भूक लागली होती.आम्हाला फार वेळ न घालवता जेवण करून पुढच्या प्रवासासाठी जायचे होते.आम्ही भात आणि रस्सम मागवले. २५ मिनटात आम्ही सर्व जेवण आटोपून हॉटेल च्या बाहेर पडलो आणि गाडीमध्ये बसलो.अखेर दुपारी २.३० वाजता आम्ही Thekaddy च्या दिशेने निघालो.मी बाहेर चा निसर्ग पूर्णपणे न्याहाळत होतो. बाहेर चा निसर्ग पाहता पाहता मला कधी झोप लागली कळले नाही.
सायंकाळी ५.०० वाजता मला जाग आली. अजून आम्हाला Thekaddy यायला ३ तास होते.आम्ही प्रवास करत असताना वाटेत एक Olive Spice Garden दिसली.लगेचच आम्ही जीप मधून उतरलो.सायंकाळचे ५.१५ वाजले होते.Spice garden खूप मोठी होती.विविध प्रकारच्या वनस्पती आणि औषधे आणि नैसर्गिक सुबत्ता तिथे पाहायला मिळत होती. पूर्ण गार्डन पाहून झाल्यावर आम्ही तिथून विविध नैसर्गिक औषध,तेल,क्रीम खरेदी केले.केरळ मध्ये नैसर्गिक संपत्ती किती अफाट आहे हे मला जाणवत होते.खरेदी झाल्यावर आम्ही पुढच्या प्रवासासाठी मोर्चा वळवला.वातावरण देखील अतिशय मस्त होतं.कुठेही अवकाळी पावसाची लक्षणं दिसत नव्हती.
रात्री ८.३० ला आम्ही Thekaddy ह्या शहरामध्ये Livins Thekaddy ह्या हॉटेल मध्ये उतरलो.हॉटेल अतिशय उत्कृष्ठ आणि टुमदार होतं.सर्व सामान गाडीमधून उतरवून आम्ही रूम कडे निघालो. रूम मध्ये फ्रेश होऊन आम्ही जेवणासाठी हॉटेल च्या Restaurant मध्ये आलो.सुदैवाने इथे मुन्नार च्या हॉटेल प्रमाणे कुठलाही नाच गाण्यांचा दंगा दिसत नव्हता.त्यामुळे आम्ही अतिशय शांत मनाने जेवण करू शकणार होतो.ह्यावेळेस जेवण बेस्ट होते.मस्तपैकी पंजाबी जेवणावर ताव मारून आम्ही थोडं चालण्यासाठी हॉटेल च्या बाहेर पडलो.एव्हाना रात्रीचे ९.४५ वाजले असल्यामुळे आम्हाला शहरात फार काही पाहायला मिळाले नाही.१० मिनिटे चालून आम्ही परत हॉटेल वर परतलो आणि आपआपल्या रूम कडे रवाना झालो.झोपताना मी फोन मधले फोटो पाहत होतो.२ दिवसात तब्बल १५० फोटो आम्ही काढले होते.आकडा अजून वाढणार होता.आजचा दिवस surprising होता.आजची जंगल ट्रीप अविस्मरणीय ठरली होती.मी मनातल्या मनात असे धक्कादायक surprises  आणि moments आम्हाला येणाऱ्या दिवसात भरपूर मिळावेत अशी प्रार्थना केली आणि शांतपणे निद्राधीन झालो.



        
                           ४.२१ ऑक्टोबर
सकाळी ८.०० वाजता जाग आली.आज आम्हाला हॉटेल सोडून अलेप्पी ला निघायचे होते.सकाळच्या सर्व विधी आवरून आम्ही हॉटेल च्या Restaurant मध्ये नाष्ट्यासाठी आलो.सकाळचे ८.३० वाजले होते.इडली सांबार चा आस्वाद घेऊन आम्ही रूम कडे परत निघालो.सामान आवरून चेक आऊट करून आम्ही हॉटेल च्या बाहेर पडलो.आम्हाला रात्री ९.०० पर्येंत अलेप्पी ला पोहोचायचे होते.आम्हाला हॉटेल च्या बाहेर पडायला १०.०० वाजले होते.बाहेर पडल्यावर आम्ही लगेच पेरियार जंगलाची ऑफराईड कडे मोर्चा वळवला.मी गुगल वर हवामान तपासले.कोणत्याही क्षणाला पाऊस पडण्याची शक्यता होती.पाऊस यायच्या आत आम्हाला जंगलसफारी पूर्ण करून परत अलेप्पी ला जायचे होते.आम्ही Thekkaddy मध्ये पेरियार राईड च्या स्थळावर गेलो.आम्हाला पेरियार बोटिंग करायचे होते पण ते न मिळाल्यामुळे आम्ही पेरियार जंगल राईड बुक केली.राईड बुक केल्यावर लगेचच १५ मिनिटात जीप हजर होती.लगेचच आम्ही टेम्पो मधून उतरलो आणि ४*४ व्हील ड्राईव च्या जीप मध्ये बसलो.पेरियार  जंगल २० किलोमीटर वर होते.सकाळचे ११.०० वाजले होते.आम्ही ३ तासाची राईड बुक केली होती.निसर्ग न्याहाळत आम्ही निघालो होतो.हळूहळू वातावरण पावसाळी होत होते.जीप चा ड्राईवर अगदी सफाईदारपणे गाडी चालवत होता.अखेर ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण समोर आला.आम्ही पेरियार जंगलाच्या क्षेत्रात आलो.घनदाट झाडे,आडवंतिडव पसरलेलं जंगल... न्याहाळत आम्ही निघालो होतो.ऑफरोड सुरु झाला होता.कॅमेरा मधून आम्ही धडाधड फोटो काढत निघालो होतो.जीप आडवीतिडवी होत आणि हेलकावे खात पुढे जात होती पण जीप चा ड्राईवर अगदी सफाईदार पणे गाडी चालवत होता.श्वास रोखून आम्ही सर्वजण ऑफरोड वरून पुढे निघालो होतो.सर्व ऑफरोड चे रस्ते आमची कसोटी पाहत होते.पोट पूर्ण ढवळून निघत होते.अखेर ३ किलोमीटर ऑफरोड चा रस्ता पार करून आम्ही जंगलाच्या उंच ठिकाणी पोहोचलो.आम्ही पोहोचल्यावर तिथे तुरळक गर्दी होती.लगेचच आम्ही सर्वजण जीप मधून खाली उतरलो.जंगलात पूर्ण पावसाळी वातावरण तयार झाले होते.जंगल हळूहळू दाट धुक्यात हरवत जात होते.फटाफट फोटो काढून आम्ही जीप मध्ये बसून पुढे मुख्य जंगलाच्या दिशेने निघालो.परत आम्ही ऑफरोड वरून निघालो.३ किलोमीटर अंतर पार करून आम्ही आता मुख्य जंगलात आलो.दुपारचे १२.१० वाजले होते.आमच्या मार्गावर आम्हाला एकही गाडी दिसत नव्हती.हळूहळू पावसाचे फवारे सुरु  झाले होते.ह्या पावसाच्या सरींमध्ये जंगलातले सौंदर्य उजळून निघायला सुरवात झाली होती.मी जंगलाच्या अंतरंगातला परिसर पाहिला आणि मला काल च्या हिंदी सिनेमा मधले जीम कॉर्बेट चे जंगल आठवले.सर्वत्र भयाण शांतता पसरलेली होती.शांतता नंतर एवढी भयाण वाटू लागली कि जंगलातले प्राणी आमच्यावर हळूच नजर ठेऊन आहेत कि काय असे मला वाटू लागले.जंगलात गेल्यावर फारसा आगाऊपणा न करता शांतपणे निसर्गाचा अनुभव घ्यावा आणि परत जावे.प्राण्यांच्या वाटेला जर का कुणी गेले तर काही खरं नाही.ऑफरोड संपण्याचे नाव घेत नव्हता.ऑफरोड वरून जात असताना आम्हाला जंगलात मोठा पाण्याचा झरा आणि मोकळे पठार दिसले.तिथे काही ४-५ गाड्या आणि माणसं दिसली.ती दिसल्यावर आम्हाला हुश्य झाले.आम्ही पठाराजवळ थांबलो.पठारावरून पूर्ण जंगल दिसत होते.एव्हाना पाऊसाची रिपरिप सुरु होती.आम्ही जीप मधून खाली उतरलो.दुपारचे १२.३५ वाजले होते.आम्ही येऊन एक तास झाला होता तरीही आम्हाला एकही प्राणी दिसला नाही.पूर्ण पेरियार मध्ये हिरवळीची रेलचेल होती.अश्या वनराईने समृद्ध असलेल्या पेरियार च्या पठारावरून आम्ही भरपूर फोटो काढले.माझ्या मते सर्व लेखक लोकांनी लिखाण काम करण्यासाठी आणि commitment च्या जगातून बाहेर पडून मोकळा श्वास घेण्यासाठी जंगलाकडे प्रस्थान करावे.कारण जंगलासारखे ठिकाण हे लिखाण काम करण्यासाठी स्वर्गसमान आहे.दुपारी १.०० वाजता आम्ही अखेर पेरियार जंगलाचा निरोप घेतला.निरोप घेताना मला बर्याच लहान पक्ष्यांची कुजबुज ऐकू येत होती.आम्ही वाघ दिसेल ह्या आशेने आलो होतो पण साधा वाघ सोडाच एखादी गाय,म्हैस देखील दिसली नाही.दिसला तो फक्त छप्पर फडके आपले रूप दाखवणारा निसर्ग.आम्ही परत बाहेर पडत असताना आम्हाला वाटेत अवर्णनीय दृश्य दिसले.पेरियार च्या जंगलात झाडावर आम्हाला एक घर दिसले.ते पाहताच मी फोटो काढला.भर जंगलात असे कुणी घर बांधले ह्याचे मला खूप आश्चर्य वाटत होते.असे घर बांधणारा नक्कीच कलाकार असावा ह्याचा मी कयास बांधला.अखेर आम्ही १.१० ला पेरियार च्या जंगलातून बाहेर पडलो आणि वाटेत मस्तपैकी भात,रस्सम,पापड खाउन आम्ही Thekkaddy कडे वळलो.१.५० ला Thekkaddy ला पोहोचल्यावर आम्ही लगेचच जीप मधून उतरलो आणि टेम्पो traveller मधून अलेप्पी कडे निघालो.अलेप्पीचा प्रवास मोठा होता.Azhutha आणि Kuttikkanam ह्या लहानश्या गावांमधून आम्ही निघालो होतो.Misty Mountain Plantation Resort जवळ पावसाने जोरदार सलामी देण्यास सुरवात केली.जाताना घाट लागला.घाटामध्ये आम्हाला आंबोलीची आठवण करून देणारा धबधबा दिसला.जोरदार सुरु असलेल्या पावसामध्ये केरळ च्या निसर्गाला मोठी बहर आली होती.पावसामध्ये निसर्गाचे वेगळे रूप पहायला मिळत होते.असा अनपेक्षित पाऊस भटकंतीचा मनमुराद आनंद देऊन जातो.
रात्री ८.०० वाजता आम्ही अलेप्पी ला पोहोचलो.अलेप्पी मध्ये आम्ही पागोडा रेसोर्ट मध्ये उतरलो होतो.हॉटेल अगदी केरळ च्या architecture चे उत्तम उदहरण होते.वास्तुकलेला सौंदर्यदृष्टी दिली की किती उत्तम होते ह्याचे उत्तम उदहरण म्हणजे पागोडा रेसोर्ट होते.आम्ही गाडीमधून उतरलो आणि आपआपल्या रूम कडे निघालो.फ्रेश होऊन रात्री ८.३० ला हॉटेल च्या restaurant ला निघालो.Restaurant बऱ्यापैकी मोठे होते.तिथे अस्सल पंजाबी जेवण करून रात्री ९.२० ला आम्ही बाहेर पडलो आणि लगेचच रूम कडे निघालो.Thekkaddy ते अलेप्पी चा रोड ट्रीप चा प्रवास खूप मोठा होता त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता.रूम वर गेल्यावर झोपताना मी लगेचच माझे आवडते late night guitar लावले.Guitar च्या सप्तसुरांच्या स्वरांवर स्वार होऊन मी शांतपणे झोपी गेलो.






  





                        
                           ५.२२ ऑक्टोबर
सकाळी ७.०० वाजता आम्ही झोपेतून जागे झालो.आई,बाबा,मामा आणि मामी ह्या मंडळींना अस्सल केरळच्या पद्धतीने मसाज करून घ्यायचे होते.हॉटेल च्या ग्राउंड फ्लोअर वर मसाजची सुविधा असल्याने सर्व जण मसाज करण्यासाठी निघाले.सकाळी ८.३० वाजता सर्व जण रूम वर परतले.लगेचच आवरून आम्ही नाष्टा करायला हॉटेल च्या restaurant ला निघालो.सकाळी ८.४५ वाजता गरम इडली,वडा,इडीअप्पम(केरळ चा प्रसिद्ध पदार्थ),रस्सम,डोसा आमच्या स्वागतासाठी तयार होते.सकाळी ९.३० ला नाष्टा आवरून आम्ही हॉटेल च्या परिसरात आलो.Swimming Pool, Spa, Cottages  अश्या आधुनिक सुविधांनी हॉटेल सुसज्ज होते.हॉटेल मधून’ चेक आऊट करून आम्ही बाहेर पडून अलेप्पी बोटिंग च्या दिशेने निघालो.सकाळी ११.०० वाजता आम्ही लहानश्या बोट मध्ये बसलो.आम्हाला हाउस बोटिंग करायचे होते पण वेळ उपलब्ध नव्हता कारण आम्हाला बोटिंग करून सायंकाळी trivendrum ला जायचे होते.आम्ही बोटिंग ला सुरवात केली.साधारण एक तासाचे बोटिंग होते.अलेप्पी च्या backwater मधून आमचे  बोटिंग सुरु झाले.आम्ही ठरवलेली बोट अतिशय लहान होती.आम्ही ८ जण आणि चालक बोटीवर स्वार झालो होतो.हळूहळू बोट अलेप्पी चा किनारा सोडून झाडांच्या आणि केरळ च्या अनोख्या अश्या निसर्गाच्या प्रदेशात निघाली.बोटीत बसत असताना माझ्या मनात विचारांचा कल्लोळ उडाला होता पण तो कल्लोळ बोटिंग चालू होताच थांबला.मोटार च्या सह्याने बोटीवरचा चालक बोट एका handle च्या मदतीने चालवत होता.(त्या चालकाकडे पाहताच मला चेन्नई एक्ष्प्रेस चा चिडका villan Thangballi आठवला).हळूहळू आम्ही किनार्यापासून लांब निसर्गाच्या कुशीत गेलो.अजस्त्र वाढलेली आणि एकमेकांना लपेटलेली झाडे,चित्रविचित्र अश्या असलेल्या वेली,लांबून झाडांच्या भोवती दिसणारे cottages,विविध प्रकारच्या बोटींमधून बोटिंग चा आनंद लुटणारे प्रवासी आणि शांत आणि अविचल असलेलं पाण्याचे पात्र...मला वेगळ्याच जगात घेऊन जात होते.आजूबाजूला अथांग पसरलेला निसर्ग,अविचल असलेले पाण्याचे पात्र आणि त्या पात्रात एका बोटीत स्वार होऊन निसर्गाचा आनंद लुटणारे आठ व्यवहारी जगामध्ये commitments आणि targets च्या कृत्रिम दुनियेत अडकलेली कृत्रिम रोबोटिक जीव.इतके शांत आणि अविचल असलेले पाण्याचे पात्र मी कधीच अनुभवलेले नव्हते.ह्याक्षणी मला फरहान अख्तर च्या Zindagi Na Milegi Dubara ह्या सिनेमा मधली “Aisi ghaheraiya aisi tanhaeyaa or main sirf main..’’ ही कविता आठवली.आपलं व्यावहारिक आयुष्य इतके शांत आणि अविचल असते तर किती बरे झाले असते असे मला वाटू लागले.अश्या शांत आणि अविचल वातावरणामध्ये माणसाचे कृत्रिम मुखवटे आपोआप गळून पडतात.निसर्ग हा एक प्रकारचे माणसाला कृत्रिम जगातून बाहेर काढून त्याच्या माणूसपणाची त्याला आठवण करून देतो.आम्ही सर्व जण बोटीमध्ये शांतपणे अलेप्पिच्या निसर्गाचा आनंद घेत पहुडलो होतो.फोटो session अखंड सुरु होते.अखेर एक तास आम्ही कृत्रिम जगताच्या बाहेर जाऊन मनसोक्त भटकंती करून अलेप्पी च्या किनाऱ्याजवळ आलो.बोटीमधून बाहेर पडल्यावर मनातल्या कृत्रिम आणि व्यावहारिक विचारांनी कधीच पळ ठोकला होता.आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय आनंद मला जाणवत होता.मी घड्याळ पाहिले.दुपारचे १२.१५ वाजले होते.लगेचच आम्ही आमच्या सुलथान अर्थात टेम्पो traveller मध्ये बसून अलेप्पी मधून बाहेर पडलो.१२.३० ला आम्ही अलेप्पी जवळ असलेल्या लहानश्या हॉटेल मध्ये जेवायला थांबलो.८ दिवस भात,पापड आणि रस्सम ह्यावर आम्हाला मनसोक्त ताव मारायचा होता.भात आणि रस्सम वर ताव मारून आम्ही दुपारी १.०० वाजता Trivendrum च्या दिशेने निघालो.Trivendrum अलेप्पी पासून ३ तासाच्या अंतरावर(१४६ km)होते.केरळ मध्ये आल्यापासून मी रस्त्यावर एकही खड्डा पाहिला नव्हता.सर्वच्या सर्व रस्ते सर्वोत्तम दर्जाचे होते.आम्ही अलेप्पी वरून National highway वरून निघालो होतो.दुपारच्या जेवणामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर सुस्ती आली होती.मी फोन वर हवामानाचा अंदाज घेतला.२७ अंश तापमान होते.आम्ही नॉन stop निघालो होतो.
सायंकाळी  ६.३० वाजता आम्ही Trivendrum मध्ये पोहोचलो.Trivendrum मध्ये आम्ही M.G road वर Residency Tower  ला उतरलो होतो.Trivandrum मध्ये आल्यावर trip चे शेवटचे २ दिवस उरले होते ह्याची सर्वांना जाणीव होऊ लागली.शेवटचे दोन दिवस भरपूर आनंद लुटायचा हा निश्चय मनात ठेऊन आम्ही टेम्पो traveller मधून उतरलो.रात्री ८.०० वाजता Fortune South Park ला आम्हाला कार्यक्रमाला जायचे होते.लगेचच आवरून आम्ही Residency tower पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या Fortune South Park हॉटेल ला निघालो.रात्री १० वाजता कार्यक्रम आटोपून आम्ही Residency Tower वर आलो.Residency tower **** दर्जाचे हॉटेल होते.सर्व आधुनिक सुविधांनी हॉटेल सुसज्ज होते.आम्ही हॉटेल च्या reception area मध्ये बसलो होतो.उद्याचे planning पक्के करून  रात्री १०.१५ आम्ही रूम कडे निघालो.






                         ६.२३ ऑक्टोबर
सकाळी ७.१५ वाजता आम्ही उठलो.आज आम्हाला कन्याकुमारी आणि suchindrum मंदिरात जायचे होते.लवकर आवरून सकाळी ८.३० वाजता आम्ही रूम मधून बाहेर पडलो.आमची रूम चौथ्या मजल्यावर होती.आम्ही पहिल्या मजल्यावर असलेल्या Restaurant कडे निघालो.नाष्ट्याला सर्व केरळी पदार्थांची रेलचेल होती.Sandwich, toast, Breadbutter, Omlet, Idli, Dosa, Upma, Shira आणि ज्रूस असे एकापाठोपाठ एक पदार्थ घेऊन आम्ही नाष्ट्याला बसलो.सकाळी ९.०० वाजता पोटभरून नाष्टा करून आम्ही हॉटेल च्या बाहेर पडलो.सर्व जण Tempo-Traveller मधून कन्याकुमारी च्या दिशेने निघालो.कन्याकुमारी मध्ये आम्हाला दुपारी ३.०० च्या आत पोहोचायचे होते.आम्ही सकाळी ९.०५ वाजता बाहेर पडलो.आज तापमान २९ अंश होते त्यामुळे थोडेसे उकडत होते.गुगल चा नकाशा सुरु करून आम्ही कन्याकुमारी च्या दिशेने निघालो.कन्याकुमारी ते त्रीवेन्दृम ३ तासाचे अंतर होते.कन्याकुमारी ला कळत्या वयात सर्वप्रथम जात असल्यामुळे मी खूप उत्साही होतो.स्वामी विवेकानंद ह्यांच्याबद्दल मी लहानपणापासून वाचले असल्यामुळे कन्याकुमारी rock मेमोरिअल चा साक्षीदार होण्यास मी उत्साहित झालो होतो.दुपारी १२.०० वाजता आम्ही कन्याकुमारी ला पोहोचलो.लगेचच आम्ही विवेकानंदपूरम कडे दुपारच्या जेवणासाठी निघालो.विवेकानंदपुरम मध्ये पोहोचल्यावर का कुणास ठाऊक तिथल्या वातावरणामध्ये एक विलक्षण तेज मला जाणवत होतं.तिथे स्वामी विवेकानंदांचे खूप प्रेरणा देणारे सुविचार दिसत होते.तिथे दुपारच्या जेवणासाठी canteen मध्ये आम्ही पोहोचलो.दुपारी १२.२० ला आम्हाला केळाच्या पानावर भात,आमटी असा शुद्ध सात्विक मेनू आला आणि सात्विक जेवण करून मन प्रसन्न झाले.१२.४५ ला आम्ही विवेकानंदपूरम मधून बाहेर पडलो आणि विवेकानंद मेमोरिअल च्या दिशेने निघालो.समुद्राच्या किनार्यापासून २ किलोमीटर वर भर समुद्रात Memorial उभारले होते.आम्ही आठ जणांनी रांगेमध्ये उभारून तिकीट काढले आणि लगेचच आम्ही Rock memorial ला आम्हाला घेऊन जाणाऱ्या बोटीच्या दिशेने निघालो.दिवाळीची सुट्टी असल्यामुळे गर्दी जाणवत होती पण कुठेही ढकलाढकली जाणवली नाही.आम्ही दुपारी १.०५ ला बोटीमध्ये बसलो आणि २ मिनटात Rock Memorial ला पोहोचलो.आमच्या बरोबर आम्हाला वीणा वर्ल्ड आणि केसरी च्या सहली दिसल्या.बोटीमधून बाहेर आल्यावर मी लगेचच गुगल चा नकाशा पाहिला.दक्षिण भारताच्या अगदी शेवटच्या टोकाला आम्ही भारताच्या बाहेर २ किलोमीटर वर होतो.१८९० च्या आसपास स्वामी विवेकानंद कन्याकुमारीच्या समुद्राच्या किनार्यापासून २ किलोमीटर पोहत Vivekanand Rock Meomorial  च्या खडकावर आले होते आणि त्यांनी अमेरिकेला जाण्याच्या आधी ३ दिवस आम्ही उभारलेल्या खडकावर ध्यान केले होते ही घटना आठवतच माझ्या अंगात रोमांच निर्माण होत होते आणि विवेकानंद ह्यांच्याबद्दल आदर आणखीन वाढला होता.दुपारचे १.२५ झाले होते.आम्ही तिकीट काढून Vivekanand Memorial मध्ये निघालो.तिथे एका मंदिरात स्वामी विवेकानंद ह्यांचा पुतळा आणि दुसर्या मंदिरात पार्वतीच्या एका पावलाचे ठसे होते.चारही बाजूंनी जोरदार वारे सुटले होते.Bay of Bengal आणि Arabian Sea असा सुरेख संगम कन्याकुमारी मध्ये पाहायला मिळत होता.मी चारही बाजूंनी नजर टाकली आणि जागचा मी स्तब्ध झालो.अथांग पसरलेला निळा समुद्रखडकावर येणाऱ्या समुद्राच्या लाटाएखाद दुसरी नजरेला पडणारी मच्छीमारांची बोट आणि एका बाजूला २ किलोमीटर वर दिसणारा कन्याकुमारीचा समुद्र किनारा....मी भरल्यासारखा पाहतच राहिलो.तिथल्या वातावरणात मला वेगळीच कंपने जाणवत होती.त्या वातावरणामुळे एवढा माझ्यात आलेला मोकळेपणा मला कधीच जाणवला नव्हता.एव्हाना केरळ च्या निसर्गाने मला व्यावहारिक आणि commitment च्या जगापासून बाहेर काढले होते.पण कन्याकुमारी मध्ये Rock Momorial वर निळ्याभोर समुद्राने मला पार बदलून टाकले होते.तो निळाभोर समुद्र,Rock memorial वरचे वातावरण....काहीतरी सकारात्मक असे होत्या त्या वातावरणामध्ये ज्याचा माझ्यावर प्रभाव पडत होता.एव्हाना मनातल्या सगळ्या कृत्रिम भावना,द्वेषाच्या भावना गळून पडल्या आणि त्याचे रुपांतर एका शांतचित्त आणि तृप्तमनामध्ये झाले.एवढा खुश मी कधीच कसा का नव्हतो ह्याचे मला आश्चर्य वाटत होते.जणू तिथल्या सकारात्मक लहरी मला चिंतामुक्त करत होत्या.तो समुद्र जणू मला ‘’कायम माझ्यासारखा अविचल राहा’’ असे ओरडून सांगत होता.मला कायम धकाधकीच्या आणि फसवणाऱ्या जगापासून कायम लांब निसर्गाच्या कुशीत जाऊन स्वतःची नव्याने ओळख करून घ्यायला कायम आवडते.कन्याकुमारी मध्ये माझी मला नव्याने ओळख होत होती.तिथे असलेल्या सकारात्मक लहरी माझ्यावर जबरदस्त प्रभाव पाडत मला वर्तमानात जगायला शिकवत होत्या.मला उभ्या उभ्या तिथे एक कविता सुचली ती मी लगेच mobile वर लिहिली.
Ocean of flying dreams.
This is the time.
To dream up and rise above the high.
Beat your fears and glorify.
These dreams might look once futile.
Keep flying…Keep flying…Keep flying.

This is the age.
To jump into the ocean of flying dreams.
Chase for the dreams until it is achieved.
Some of dreams might look strenuous.
Keep flying…Keep flying…Keep flying.

Real dreams will test your passion and the soul.
Making your move hardly possible.
Nothing is easy when you are lazy.
Life is full of one-way road.
When you are all alone.
Keep flying…Keel flying…Keep flying.
पूर्ण कविता लिहून झाल्यावर आम्ही लगेचच स्वामी विवेकानंदांच्या मंदिरात गेलो.मंदिरात सर्वत्र विलक्षण आधात्मिक आणि शांततेचे वातावरण होते.अश्या वातावरणामध्ये मनातल्या सर्व नकारात्मक विचारांचा नाश होतो.५ मिनिट मंदिरामध्ये आम्ही शांतपणे ध्यानाला बसलो.५ मिनिटांनंतर आम्ही बाहेर पडलो आणि आजूबाजूचा परिसर पाहू लागलो.उत्तरायण आणि दक्षिणायन मधला फरक दाखवणारे चित्र आम्हाला नजरेला पडले.लगेचच आमचे कॅमेरे फोटो साठी कामाला लागले.Vivekanand memorial चे अमर्याद फोटो काढून झाल्यावर आम्ही तिथल्या पार्वती देवी च्या पायाच्या पाउलखुणा असलेल्या मंदिरात गेलो.दर्शन घेऊन अखेर दुपारी ३.०५ वाजता आम्ही परत कन्याकुमारी च्या समुद्राच्या किनार्याकडे निघालो.किनार्यावर उतरल्यावर आम्ही कन्याकुमारी च्या बाजारपेठेमध्ये भटकंती केली.पण काही मनासारखे न मिळाल्यामुळे लगेचच गाडीत परतलो.पुढे आम्हाला सुचीन्द्रम मंदिर पहायचे होते म्हणून आम्ही कन्याकुमारीहून लवकर बाहेर पडलो.सायंकाळी ४.१५ च्या आसपास आम्ही सुचीन्द्रम च्या मंदिराजवळ पोहोचलो.तिथे चपला काढून आम्ही मंदिरात जाणार एवढ्यात तिथल्या एका पुजार्याने आम्हाला अंगातले कपडे काढून येण्यास सांगितले कारण तसा तिथे नियम आहे.लेडीज ना काही नियम नव्हता.लगेचच आम्ही सर्व पूजेचे सामान घेऊन मंदिरात निघालो.अंगातले कपडे काढून मंदिरात जाण्याचा माझा पहिलाच प्रसंग होता.मंदिर सर्व देवतांनी सुसज्ज होते. सुचीन्द्रम बरेच जुने मंदिर होते.एक गोष्ट मला जाणवत होती.दक्षिण भारत जेवढा कट्टर धार्मिक आणि तेवढा उत्तर भारत,पूर्व भारत,पश्चिम भारत नाही.पूर्ण मंदिर फिरून आल्यावर समाधान वाटत होते.सायंकाळी ५.१५ ला आम्ही मंदिराच्या बाहेर आलो.अंगात कपडे घालून आम्ही परत गाडीमध्ये बसलो आणि Trivendrum च्या दिशेने निघालो.सायंकाळी ७.४० च्या आसपास आम्ही Trivendrum च्या जवळ पोहोचलो होतो.Trivendrum च्या जवळ आम्ही Hotel Samudra ला रात्रीच्या जेवणासाठी उतरलो.हॉटेल फाइव स्टार दर्जाचे होते.रात्री १०.०० ला जेवण आटोपून आम्ही Trivendrum मध्ये हॉटेल च्या दिशेने निघालो.रात्री १०.३० ला आम्ही Residency Tower ला पोहोचलो.दिवसभर प्रचंड भटकंती झाली असल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाची झोप दिसत होती.उद्या आम्हाला सकाळी लवकर पद्मनाभ स्वामी मंदिरात जायचे असल्यामुळे आम्ही रूम कडे निघालो आणि शांतपणे झोपी गेलो.







                           ७.२४ ऑक्टोबर
सकाळी ७.३० वाजता मी साखरझोपेतून जागा झालो.आजचा आमच्या ट्रीप चा शेवटचा दिवस होता.त्यामुळे आज येणारा प्रत्येक क्षण मनापासून जगायचा असे मी ठरवले,आज आम्हाला पद्मनाभ स्वामी मंदिरात जायचे होते.त्यामुळे आम्ही ९.३० ला सर्व आवरून हॉटेल मधून बाहेर पडलो.Residency Tower पासून मंदिर फार लांब नव्हते.पद्मनाभ मंदिराबद्दल वर्तमानपत्रात खूप काही वाचले होते पण आता मंदिर पहायची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.सकाळी ९.५५ वाजता आम्ही मंदिरात पोहोचलो.रणरणते ऊन पडण्यास सुरवात झाली होती.मंदिरात नियम प्रचंड कडक होते.प्रत्येकाला मंदिरात येताना लुंगी नेसून यावे लागत होते.मला या नियमांचे खूप कौतुक वाटत होते आणि हे सर्व नियम तिथे येणारे सर्व भक्त पाळताना दिसले.आम्ही अंगातले आधुनिक कपडे काढून लुंगी परिधान केली आणि मंदिरात निघालो.मंदिरात जाताना फोन देखील घेऊन जायची परवानगी नव्हती.त्यामुळे आम्ही सर्वांचे फोन लॉकर मध्ये ठेऊन मंदिरात निघालो.मंदिरात शिरल्यावर तिथल्या असलेल्या पवित्र वातावरणाचा मला अनुभव येत होता.पद्मनाभ मंदिरात काही बंद दरवाजे उघडले होते ज्यात काही सोने सापडल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या.पण ते सोने आता सुप्रीम कोर्टाच्या ताब्यात गेले होते.ह्याबद्दल मंदिरात आम्ही उत्सुकतेपोटी पुजार्यांकडे चौकशी केली.बर्याच पुजार्यांनी त्या ठिकाणाकडे कुणालाही प्रवेश नाही असे उत्तर दिले साक्षात केरळ च्या राज्यांच्या वंशाजांना देखील नाही.मंदिरात अजून एक दरवाजा(सातवा दरवाजा) उघडण्यात आला नाही आणि तो उघडू नये असे केरळ च्या राजाने लिहून ठेवले आहे.बंद दरवाज्यांच्या कथा ऐकत आम्ही मंदिरात उभारलो होतो.मंदिरात विष्णू चा कळस सोन्याने चढवला होता.ते पाहून मला मंदिराच्या भव्यतेची कल्पना येत होती. Architecture च्या बाबतीत ज्याने कुणी मंदिर बांधले त्याला अजिबात तोड नव्हती.ज्याने मंदिर बांधले त्याचे शिल्प मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उभारले आहे.सकाळचे ११.०० वाजले होते.नेहमीप्रमाणे गर्दी होती.केरळ चे सर्वात जुने आणि श्रीमंत असे मंदिर पाहत असताना अंगात शहारे आणि कंपने निर्माण होत होती.मंदिरात सुरक्षा एकदम कडक होती.बरेच police लुंगी च्या वेशात मंदिरात फिरत होते.आम्ही दर्शनासाठी उभे राहिलो होतो.सकाळी ११.३० वाजता आम्हाला पद्मनाभ स्वामींच्या दर्शनासाठी सोडण्यात आले आणि बरोबर ११.४५ ला आम्ही बाहेर आलो.मंदिरामध्ये आम्हाला शांतपणे पहुडलेली विष्णू ची भव्यदिव्य मूर्ती दिसली आणि त्या मूर्तीवर भव्यदिव्य असे द्रव्य अर्पण करणारे काही लक्ष्मिप्रसन्न भाविक तिथे नजरेला पाहायला मिळाले.दर्शन घेऊन आम्ही दुपारी १२.०० वाजता मंदिराच्या बाहेर पडलो आणि आधुनिक वस्त्रे चढवून गाडीकडे निघालो.गाडीतून आम्ही परत हॉटेल वर आलो.दुपारी १२.३० ला आम्ही जेवायला बसलो.दुपारचे जेवण आवरून आम्ही दुपारी २.०० वाजता VSSC(Vikram Sarabhai Space Center) कडे निघालो.भारताची शान असलेल्या VSSC  पाहण्याचा उत्साह शिगेला पोहोचला होता.आम्ही दुपारी ३.०० वाजता VSSC ला पोहोचलो.सर्व सुरक्षा तपासणी करून आम्ही तिथे असलेल्या Space Museum मध्ये गेलो.Museum मध्ये आम्हाला Satellites,Payloads,Sounding Rockets,Application of Satellites  ह्यांची पूर्ण माहिती मिळाली.VSSC चे जनक विक्रम साराभाई आणि A.P.J.Kalam ह्यांच्या योगदानाची पूर्ण माहिती सविस्तर रुपात सांगण्यात आली.Space Museum पाहून आपण कशातही कमी नाही आहोत हा विश्वास मला दिसू लागला.एक तास Space Museum  पाहून आम्ही दुपारी ४.०० ला बाहेर पडलो आणि ४.३० मिनिटांनी हॉटेल वर पोहोचलो.थोडेसे फ्रेश होऊन आम्ही सायंकाळी ६.०० वाजता trivendrum च्या बाजारात गेलो.तिथे मनासारखी खरेदी करून रात्री ८.३० च्या सुमारास आमच्या नातेवाईकांकडे निघालो. त्यांच्याकडे जेवण करून रात्री ११.०० ला परत आम्ही Residency Tower कडे आलो.रात्री ११.१५ ला आपआपल्या रूम कडे आम्ही निघालो.आज चा दिवस कसा गेला मला कळले नाही.मात्र आज खूप धम्माल आली.परतीच्या प्रवासाच्या bags भरून मी झोपी गेलो.














                          ८. २५ ऑक्टोबर
अखेर तो दिवस उजाडला.आमची ट्रीप संपून आता परतीची वेळ आली होती.मनात रुखरुख लागली होती.आठ दिवस बघता बघता संपत आले होते.केरळ मधून अक्षरशः पाय निघत नव्हता.ही ट्रीप संपूच नये असे मला वाटत होते.पण आता पुढच्या commitments डोळ्यासमोर येत होत्या.ह्या भटकंती ने मला पूर्णपणे ताजातवाना करून टाकले होते.Residency Tower मधून चेक आऊट करून सर्व सामान घेऊन सकाळी ९.०० वाजता आम्ही बाहेर पडलो.सर्व सामान गाडीमध्ये ठेऊन Pack-Up करून आम्ही विमानतळाच्या दिशेने निघालो.सकाळी ९.५५ ची आमची Trivendrum-Benglore flight होती.सर्व सामान बाहेर काढून आम्ही आमच्या Tempo-Traveller driver चा निरोप घेतला आणि आठ दिवस व्यवस्थित गाडी चालवल्याबद्दल त्याचे आभार मानले.सर्व सामान घेऊन आम्ही airport च्या चेक-ईन च्या लॉबी मध्ये पोहोचलो.सर्व समान चेक-ईन करून आम्ही सकाळी १०.०० वाजता अखेर विमानात पोहोचलो.ह्यावेळेस Indigo चे विमान होते.मला खिडकीजवळ ची जागा मिळाली होती.मी सहज खिडकीच्या बाहेर नजर टाकली.धावपट्टीवर बरीच लगबग चालू होती.अखेर विमानात सूचनांचा भाडीमार संपल्यावर विमान टेक-ऑफ च्या दिशेने निघाले आणि काही क्षणात विमानाने आकाशात झेप घेतली.आकाशातून मला Trivendrum चा अथांग समुद्र आणि निसर्ग दिसत होता.केरळ च्या निसर्गाचे वर्णन करायला शब्द कमी पडतील.ह्या आठ दिवसात आम्ही केरळ चा निम्मा निसर्ग पालथा घातला होता.रोजच्या कृत्रिम जीवनशैलीच्या आयुष्यात आलेल्या मानसिक आणि शारीरिक थकवा ह्या ट्रीप मध्ये पूर्ण उध्वस्त झाला होता.ह्या ट्रीप ने पुढच्या व्यावहारिक आयुष्यात येणाऱ्या घटनांना समोरे जाण्यासाठी मोठा ट्रिगर मिळाला.केरळ च्या निसर्गाने आमची विचारसरणी पूर्ण बदलून टाकली होती.रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून ८ दिवस स्वतःसाठी काढून लांब फिरायला गेलो की आयुष्य पाच पटीने वाढते असे एका सिनेमा मध्ये ऐकलेली म्हण नक्कीच खरी आहे असे मला पटू लागले.१९ ऑक्टोबर ला विमानात बसल्यावर अंगात आलेले शहारे...१५००० फुट उंच आकाश पाहून अनंतात विरघळून गेलेले कृत्रिम आयुष्यातील त्रास आणि तणाव...मुन्नार मध्ये अचानक ठरवलेली ऑफरोड राईड...पेरियार ची निर्मनुष्य जंगलातली भर पाऊसात केलेली फेरी...पेरियार जंगलातली निरव शांतता...अलेप्पी मध्ये केलेली बोटिंग...कन्याकुमारी मध्ये विवेकानंद रॉक वरचे शुद्ध आणि चित्तकारक आणि धार्मिक वातावरण....कन्याकुमारीत मी लिहिलेली कविता....सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या.बेंगलोर ला आम्ही ११.०५ ला पोहोचलो.बेंगलोर वरून ५.०० ला आमची बेळगाव चा flight होती.
दुपारी जेवण करून सायंकाळच्या ५.०० च्या विमानात आम्ही बसून निघालो.Spicejet च्या विमानाने काही क्षणात आकाशात झेप घेतली.बघताबघता आमची केरळ ची ट्रीप संपली.मनात रुखरुख होतीच त्याचबरोबर आठ दिवसांच्या आठवणी आणि केरळ चे फोटो सोबतीला होतेच.बेंगलोर मधून अवकाशात उडताच मनातली रुखरुख क्षणात नाहीशी झाली.१५००० फुट अवकाशात आम्हाला निसर्गाने त्याच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन जे दर्शन दिले होते त्याचे वर्णन करायला माझ्याजवळ शब्द नव्हते.लगेच तो क्षण आम्ही कॅमेरा मध्ये कैद केला आणि ६.४५ ला आम्ही परत केरळ ला नक्की जायचे हा इरादा मनात ठेऊन शांत....तृप्त...आनंदाने…. चिंब…. भिजून बेळगाव च्या विमानतळावर उतरलो.











Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...