Saturday, 16 April 2022

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेमा लागला होता.तिथे बरीच गर्दी जमलेली होती.
तेवढ्यात तिथे एक बी.एम.डब्ल्यु आली.त्या गाडीमधून धोतर घातलेले गृहस्थ उतरले.ते उतरल्यावर ती गाडी पार्किंग मध्ये जाते. तिथे असलेली गर्दी त्या गाडीमधून बाहेर पडलेल्या माणसाकडे पाहते.बी.एम.डब्ल्यु मधून धोतर नेसलेला माणूस बाहेर आल्यावर तिथे जमलेली गर्दी अचंबित होते.
त्या धोतर नेसलेल्या माणसाचे वय ५७ च्या जवळपास असावे.त्याचा अवतार विक्षिप्त होता.त्याने मोठा चश्मा घातलेला होता.त्याच्या डाव्या हातात काहीतरी गोंदवलेले दिसत होते.त्याचे फोरआर्म्स फुगलेले दिसत होते.त्याची ऊंची ५ फुट दहा इंच होती.तो माणूस तिथे असलेल्या तिकीट काउंटरवर गेला.त्याच्याकडे बघून तिथे असलेली गर्दी पांगली.
“तीन बाल्कनी...द्या...”
तेवढ्यात त्या माणसाला तिकीट मिळते.
तेवढ्यात तिथे असलेल्या गर्दीमध्ये कुजबुज सुरू होते.
“कोण आहे हा माणूस?चक्क धोतर घालून आला आहे?’’
“एवढ्या महागड्या गाडीमधून चक्क धोतर?’’
“कोणीतरी सावकार अथवा गावचा पाटील असेल...”
“त्याच्या हाताकडे बघ.अंगठ्या...कोण नगरसेवक आहे का?’’
“मला वाटत आहे असेल कोणतर गावगुंड...?’’
“हा एकटा माणूस आहे पण हा तीन तिकीटं का काढत आहे?’’
धोतर नेसलेला माणूस जाणार तेवढ्यात त्याच्या मागून आवाज येतो.तो आवाज त्याच्या चालकाचा असतो.
“साहेब.तुमचा फोन.गाडीमध्ये होता.”
“ठेव गाडीतच.तुझ्याजवळ.कुणाचा फोन आला की संग साहेब मीटिंग मध्ये आहेत.”
साहेबांचा आवाज आणि मूड बघून त्यांचा ड्राइव्हर दचकतो.
साहेब तिकीट घेऊन थेटरमध्ये जातात.
हे साहेब म्हणजे इचलकरंजी शहराचे सुप्रसिद्ध उद्योगपती “डी.के साहेब.’’
साहेब मोठ्या ऑटोमोबाइल कारखान्याचे मालक होते. ते कलाकार होते, अभिनेते होते, लेखक होते.त्यांना एकट्याने सिनेमे पहायला खूप आवडट असत.
सकाळचा ९.१० चा शो होता.साहेब बाल्कनीमध्ये जाऊन बसले.त्यांनी एकूण तीन तिकीटं काढली होती.त्यांच्या शेजारी कुणी बसलेले त्यांना आवडत नसे.शो हाऊसफुल्ल होता.९.१०ला शो सुरू झाला.डी.के साहेब सिनेमा पाहू लागले.त्यांना सिनेमा आवडू लागला.
इंटरवल:- दीड तासाने इंटरवल झाली.साहेब बाहेर आले.बाहेर आल्यावर ते तिथे असलेले खाद्यपदार्थ घेऊ लागले.३ वडे, पेप्सी… आणि खूप काही त्यांनी विकत घेतले आणि ते त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले.तेवढ्यात परत सिनेमा सुरू झाला.साहेब खाद्यपदार्थ खाऊ लागले.स्क्रीन वर सिनेमा सुरू झाला.
सकाळी ११.११:- साहेब घोरू लागले.सिनेमा बघता बघता त्यांना झोप लागली.ते एवढ्या जोरात घोरू लागले की आजूबाजूला असलेल्या लोकांना त्याचा आवाज येऊ लागला.
सकाळी ११.३०:- साहेब जागे झाले.सिनेमा सुरू होता.साहेब परत सिनेमा बघू लागले.
सकाळी ११.४५ला- सिनेमा सुरू होता.तेवढ्यात साहेब जागचे उठले आणि बाहेर पडले.सिनेमा अजून संपायला १० मिनिटे होती.
साहेब खाली आले.तिथे त्यांचा चालक तिथे त्यांची वाट बघत होता.लगेच तो साहेबांच्या जवळ आला.
साहेब,’’चल’’
तेवढ्यात साहेब गाडीत आले. त्यांनी गाडी सुरू केली आणि ते गाडीत चक्क चिलीम ओढू लागले.त्या वासाने ड्राइव्हरला त्रास होऊ लागला.
ड्राइव्हर,’’(मनात) काय वेडपट माणूस आहे? आज माझी काळ्यापाण्याची शिक्षा आहे.’’
काही वेळाने साहेब गाडीतून उतरले आणि त्यांनी परत त्याच सिनेमाच्या दुपारी बारा वाजताची अजून तीन तिकीटं काढली.
ड्राइव्हर,’’(मनात) तोच सिनेमा परत?’’
डी.के साहेब परत सिनेमाहॉलमध्ये गेले आणि १२चा शो सुरू झाला.
दुपारी २.००:- सिनेमाचा शो संपतो.सर्व पब्लिक उठून बाहेर पडते.तेवढ्यात तिथे साहेब गाढ झोपले असतात.तिथे त्यांना थेटरमध्ये असलेला माणूस उठवायला येतो.
“सर.शो संपला.’’
साहेब जागे होतात आणि वेळ पाहतात.
“हो की रे.ए.सी मध्ये कधी झोप लागली कळलेच नाही.एक काम करशील.पुढच्या शोचे तिकीट घेऊ ये मला.’’
साहेब त्याला ५०० रुपये देतात.
“सर.एवढे नाही लागतील.”
“असू दे रे.उरलेले ठेव तुझ्याजवळ.’’
तो थेटरच माणूस पळत जातो आणि साहेबांना ३ तिकीट घेऊन येतो दुपारच्या२.३०च्या त्याच सिनेमाच्या तिसर्‍या शो ची.
खाली ड्राईव्हर साहेबांची वाट बघून कंटाळून जातो.
संध्याकाळचे ५.१५;-
सिनेमाचा तिसरा शो संपतो. साहेब खाली येतात.खाली त्यांचा चालक त्यांची वाट बघत असतो.साहेब खाली येतात. तिथे थेटरचे मालक असतात.ते साहेबांना भेटायला येतात.
थेटरचे मालक,’’सर.तुमच्यासारखे चित्रपट वेडे खूप कमी असतात.’’
साहेब स्मितहास्य करतात.
“हे थेटर घ्यावं म्हणतोय.किती किम्मत?’’
मालक आश्चर्यचकित होतात.
“सर.आम्हाला शक्य नाही.सॉरी.आम्ही तुमच्या सिट्स लाईफटाइम बुक करून ठेवतो.”
साहेब त्या थेटरच्या मालकांना शेकहँड करतात आणि संध्याकाली ५.२०ला गाडीमध्ये येतात.
साहेब,’’फोन दे.’’
ड्राइव्हर फोन देतो.
साहेब मिस कॉल्स बघतात.
“५९८ मिस कॉल्स...ऑफिसला जायलाच पाहिजे...’’
आणि....दिवसभर गाडीमध्ये वैतागलेल्या चालकाला साहेब ऑफिसमध्ये गाडी घ्यायला सांगतात आणि त्यांच्या फोन मध्ये “ मे जिंदगी का साथ...हे गाणे ऐकत शांतपणे चिलीम ओढायला सुरवात करतात.

Monday, 22 March 2021

मला साहेब व्हायचे

"मला साहेब व्हायचे''

ठिकाण:- इचलकरंजी पासून लांब कुठेतरी...

सकाळचे १०.४५ वाजले होते.लांबून बरेच टोलेजंग डोंगर दिसत होते.मोठे ट्रक आणि ट्रान्सपोर्टच्या गाड्या वेगाने हवेत धुरळा उडवत जात होत्या.बरेच कारखाने दिसत होते.खराब झालेले रस्ते लांबून दिसत होते.
काही वेळाने धुरळा उडवत एक सफारी रस्त्यावरून आली.ती वळणे पार करत जात होती.रस्ते खराब असल्यामुळे त्या सफारीला बरेच हेलकावे खात जावे लागत होते.बरेच कारखाने आणि वेडीवाकडी वळणे पार करत ती सफारी अखेर एका डोंगराच्या जवळ असलेल्या एका कारखान्याजवळ थांबली.त्या गाडीतून ३५ वर्षाचा माणूस उतरला.त्याने कारखान्यावर नजर टाकली.कारखाना बराच मोठा होता.कारखान्याच्या एका बाजूला डोंगर होता.दुसर्‍या बाजूला धावणारी रेल्वे दिसत होती.त्या माणसाने गाडी कारखान्याजवळ लावली आणि तो कारखान्याच्या गेट जवळ आला.तिथे सुरक्षारक्षक उभा होता.
सुरक्षारक्षक,‘‘कुणाला भेटायचे आहे?’’
35 वर्षाचा माणूस,‘‘माझा आज कामाचा पहिला दिवस.’’
सुरक्षारक्षक,‘‘तुमचे नाव?’’
“मी अजित.’’
‘‘ठीक आहे. जावा.’’
अजित गेटच्या आत गेला.तो जॉइन झालेली कंपनी बरीच मोठी होती.औटोमोबाईल क्षेत्रात लागणारे पार्ट तिथे तयार होत होते.अजित ऑफिसच्या दिशेने गेला.कंपनी मध्ये त्याला शुकशुकाट जाणवत होता.अजित कंपनीमध्ये निरखून पाहत होता.कंपनी बरीच मोठी दिसत होती.कंपनीची ऑफिसची बिल्डिंग देखील मोठी होती.तो ऑफिसमध्ये गेला.तिथे वेटिंग एरिया मध्ये तो बसला.त्याला आश्चर्य वाटत होते.कंपनी मध्ये त्याला एकही व्यक्ति दृष्टीला पडलेली नव्हती.तो वेटिंग रूम मध्ये बसला.वेटिंग रूमला लागून कंपनीचे ऑफिस होते.तो आजूबाजूला पाहू लागला.
तेवढ्यात त्याला थोड्यावेळाने कुणीतरी हाक मारली.
‘‘अजितना तुम्ही...’’
त्याच्यासमोर ५५ वर्षाची व्यक्ति होती.
“हो.मी अजित.’’
‘‘आत या.’’
अजित त्या ५५ वर्षाच्या व्यक्तीच्या मागून वेटिंगरुमला लागून असलेल्या हॉलमध्ये गेला.
‘‘बसा.’’
अजित तिथे असलेल्या खुर्चीवर बसला.त्याच्या समोर ती ५५ वर्षाची व्यक्ति बसली.
‘‘तुमची मुलाखत खूप चांगली झाली.एच.आर सांगत होता.’’
अजितने त्या व्यक्तीसमोर स्मितहास्य केले.
“मी अमर.ह्या कंपनीचा सी.ई.ओ.तुम्ही इंटरव्हीवमध्ये सांगत होता की तुम्हाला इथला साहेब व्हायचे आहे.इट्स गुड.तुमची स्वप्ने मोठी आहेत.’’ 
अजित काहीच बोलला नाही.
‘‘कामाचे स्वरूप तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जाऊ शकता.बेस्ट लक.’’
अजित, ‘‘धन्यवाद सर.’’
अजित उठला.तेवढ्यात त्याला ऑफिसमध्ये एक फोटो दिसला.त्या फोटोला हार घातलेला होता.तो फोटो पाहून अजित दचकला.त्या फोटोमधली व्यक्ति आणि त्याच्या समोर बसलेली ५५ वर्षाची व्यक्ति दिसायला एकसारख्या होत्या.
अजित फोटोकडे पाहत असताना ती ५५ वर्षाची व्यक्ति अजितकडे पाहू लागली.
अजित ऑफिसच्या बाहेर पडला.
अजित, ‘‘(मनात)कोण असेल ती फोटो मधली व्यक्ति?सर आणि ती फोटोमधली व्यक्ति दिसायला एकसारखीच.....कोण असेल ती फोटोमधली व्यक्ति....कोण का असेना...आपण कामाला सुरवात करू.’’
अजित एच.आरला भेटला.एच.आरने अजितला त्याची केबिन दाखवली.अजितची केबिन तो भेटलेल्या साहेबांच्याच बिल्डिंगमध्ये होती.अजितने केबिन पाहिली.केबिन खूप लहान होती.अजित त्याच्या खुर्चीजवळ गेला.तिथे त्याला एक विचित्र दृश्य दिसले.तिथे खुर्चीवर एक लाल रंगाचे कापड त्याला दिसले.त्याने ते कापड काढले आणि ते त्याच्या टेबलजवळ ठेवले.तो काही वेळ खुर्चीवर बसला.नंतर तो त्याच्या केबिनच्या बाहेर आला आणि शॉपच्या दिशेने निघाला.
अजित शॉपवर नजर फिरवत जाऊ लागला.शॉप बराच मोठा होता.त्याला शॉप मध्ये ‘व्ही.एम.सी’ आणि ‘सी.एन.सी’ मशीन दिसले.मशीन जवळ बरेच रोबोट त्याला दिसत होते.तो चालत निघाला होता.त्याला आश्चर्य वाटत होते.पूर्ण शॉप मध्ये त्याला एकही व्यक्ति दिसत नव्हती.मशीन वर त्याला ऑटोमोबाइल ला लागणारे पार्ट मशीनिंग होत असताना दिसले.तो एक-एक मशीन बघत पुढे जाऊ लागला.पुढे गेल्यावर त्याला शॉप मध्ये एका कोपर्‍यात तीन ते चार मुलं दिसली.तो चालत त्यांच्या जवळ गेला.
अजितला बघितल्यावर ती मुलं त्याच्याजवळ आली.
अजित,‘‘मशीन जवळ कुणीच नाही.’’
त्या मुलांपेकी एक जण,‘‘आम्ही इथे जॉब चेक करत होतो.’’
अजित,‘‘सगळे जणं?’’
ती मुलं काहीच बोलली नाहीत.
अजित, ‘‘सगळ्यांचे काय काम आहे इथे?जावा तुमच्या मशीन जवळ.आज पासून मी तुमचा नवीन साहेब आहे.त्यामुळे मी सांगतो ते ऐकायचे.’’
अजित जोरात खेकसला.सर्व मुलं त्यांच्या मशीन जवळ गेली.अजितला एक गोष्ट विचित्र वाटली.ती मुलं त्याला नजर देत नव्हती.त्याचबरोबर त्याला अजून एक गोष्ट खटकली.त्या मुलांच्या हातात त्याला निळ्या रंगाचे कापड दिसले.त्याला लगेच आठवले.त्याच्या ऑफिसमध्ये देखील त्याने निळ्या रंगाचे कापड पाहिले होते.ते कापड बघून तो क्षण भर दचकला.
लगेच झपझप चालत तो शॉप मध्ये फिरू लागला.त्याला दिसलेली मुले परत त्याने ओरडल्यामुळे मशीन जवळ गेली होती.अजित शॉप मध्ये सर्वत्र नजर फिरवत होता.अजून एक गोष्ट त्याला दिसली.शॉप मध्ये त्याला कोपर्‍यात उलट्या टांगलेल्या बाहुल्या दिसल्या.ते पाहिल्यावर त्याने रागाने त्या बाहुल्या काढल्या आणि त्या हातात घेऊन तो बाहेर आला आणि त्या बाहुल्या त्याने लांब फेकून दिल्या.नंतर तो चालत त्याच्या सुरक्षारक्षकाच्या केबिन जवळ गेला.तिथे जाऊन तो वॉचमनला शोधू लागला.तिथे त्याला कुणीच दिसत नाही. 
तो वॉचमनला शोधू लागतो.पण वॉचमन त्याला काही केल्या दिसला नाही.तेवढ्यात त्याला वॉचमनची केबिन दिसते.तो केबिन जवळ जातो.केबिन मध्ये देखील त्याला निळ्या रंगाचे कापड दिसते.
“लाल रंगाचे कापड....गेला कुठे वॉचमन...?’’
अजित पुटपुटत वॉचमनला शोधू लागतो.पण त्याला वॉचमन कुठेच दिसत नाही.
“जाताना बघू...’’
मनातल्या मनात म्हणत अजित त्याच्या ऑफिस मध्ये येऊन तिथे असलेल्या टेबलजवळ येऊन बसतो.
 
“कंपनी विचित्र वाटत आहे जरा…’’
“बाहुल्या...लाल रंगाचे कापड...’’
अजित खुर्चीवर बसलेला असतो.
“नंतर बघू...’’
अजित टेबल जवळ असलेल्या खुर्चीवर बसतो.
तिथे तो पी.सी वर काम करू लागतो.त्याला बरेच काम लागले असते.नवीन कंपनी मध्ये येताना त्याची निवड मॅनेजर पोस्ट वर झाली होती.पण त्याला कंपनीमध्ये वरच्या पोस्ट वर जाऊन साहेब होण्याची त्याची महत्वाकांशा होती.थोडा वेळा नंतर अजित त्याच्या टिमला त्याच्या केबिन मध्ये बोलवतो.तीन जुनीयर इंजिनीअर त्याच्या केबिन मध्ये येतात.सर्व 27 वर्षाचे असावेत.सर्वांशी तो चर्चा करतो आणि 15 मिनिटांनी सर्व इंजिनीअर त्याच्या केबिन मधून बाहेर जातात.
अजितला अजून एक नवल वाटते.आलेले सर्व इंजिनीअर त्याच्याशी मोकळे होऊन बोलत नाहीत.पण अजित जास्त लक्ष देत नाही.तो पुन्हा कामात गुंतत जातो.
काहीवेळाने:-
वेळ:- दुपारचे १२.३०
अजित त्याच्या कामात गुंतला होता.तो बसत असलेले केबिन मोठे होते.त्या केबिनला चारही बाजूंनी काच लावलेली होती.अजित काम करत असताना त्याने सहज केबिन भवती नजर टाकली.त्याला काही आठवले.सकाळी त्याने त्याच्या केबिन मध्ये निळ्या रंगाचे कापड पहिले होते.ते कापड त्याच्या खुर्चीजवळ होते.पण ते त्याला  दिसत नव्हते.
तेवढ्यात त्याला जाणवते की, कुणीतरी त्याच्या केबिनच्या बाहेर उभे आहे.त्याला केबिन जवळ असलेल्या काचेजवळ एक सावली दिसते.तो जागचा उठतो आणि केबिनचा दरवाजा उघडून बाहेर जातो.बाहेर गेल्यावर तो सगळीकडे नजर फिरवतो.त्याला बाहेर एकही व्यक्ति दिसत नाही. त्याला आश्चर्य वाटत राहते.तो परत केबिन मध्ये येतो.
काही वेळ झाल्यावर:-
तो त्याच्या केबिन मध्ये बसलेला असतो.परत काही वेळाने त्याला कुणीतरी केबिनच्या बाहेर एक माणूस उभा असल्याचे जाणवले.तो पटकन उठून जातो आणि दार उघडतो.पुन्हा त्याला कुणीच दिसत नाही.
तो काही काळ विचार करतो.
‘भास होता की काय...?’’
विचार करत तो पुन्हा टेबल जवळ जातो आणि खुर्चीवर बसतो.
काही वेळाने:-
अजित कामात असतो.तो केबिन मध्ये एकटाच बसलेला असतो.तो वेळ राहतो.संध्याकाळचे ५.०० वाजले होते.
अजित त्याचे काम आवरतो आणि बाहेर पडतो.
बाहेर आल्यावर तो आजूबाजूला पाहतो.त्याला कुणीच दिसत नाही.
तो शॉप मध्ये जातो.तिथे देखील त्याला कुणीच दिसत नाही.
“मशीन तर चालू दिसत आहेत.पण बाकीचे गेले कुठे?’’
त्याला खटकते.शॉप मध्ये त्याला कुणीच दिसत नाही पण त्याला मशीन चालू असल्याचे ऐकू येऊ लागते.तो शॉप मध्ये जातो आणि नजर टाकतो.त्याला २ कामगार मशीन वर दिसतात.शॉप मध्ये नजर टाकून परत तो बाहेर येतो आणि अचानक घसरतो.लगेच तो जमिनीवर काय पडले आहे का ते पाहतो.त्याला निळ्या रंगाचे कापड दिसते.
तो काही क्षण विचार करत राहतो.
“पडलो कसे काय...?’’
तो वेळ पाहतो.सायंकाळचे ५.३० वाजलेले असतात.तो गेट जवळ येतो.तिथे असलेला सुरक्षा रक्षक त्याला बघून सलाम ठोकतो.
अजित, “ दुपारी कुठे होता?’’
“कुठे नाही साहेब.मोठ्या साहेबांनी बोलावले होते.’’.अजित काहीच बोलत नाही.
बरोबर काही महिन्यांनी:-
वेळ:-संध्याकाळ.
अजित त्याच्या गाडीजवळ येतो आणि गाडीमध्ये बसतो.
“आठ महीने झाले.’’
स्वतःशीच पुटपुटत तो निघतो.
तेवढ्यात त्याला एक अनोळखी फोन येतो.
अजित फोन घेतो.
अजित, “हॅलो!’’
“अजित.....’’
फोन मधून आवाज येतो.तो आवाज पुरुषाचा असतो.
“बोलतोय.’’
“निघालास कंपनी मधून...’’
“कोण बोलत आहे?’’
पलीकडून काहीच आवाज ऐकू येत नाही.
“हॅलो...’’
“मी..तुझा हितचिंतक....’’
अजित,“माझा....कोण बोलत आहे?’’
अजित गाडीच्या बाहेर पाहतो.त्याला आजूबाजूला कुणीच दिसत नाही.
फोन मधून, “कुठे पाहत आहेस?’’
फोन मधून हसण्याचा आवाज येतो.
अजित, “कोण आहेस तू?’’
“तुझा हितचिंतक.तुला इथे साहेब व्हायचे…’’
अजित आता घाबरतो.
“कोण आहेस तू सांग....?’’
“मी...तुझा हितचिंतक.तू कामगारांना जास्त पीडतोस.जास्त कामं सांगतोस.बंद कर ते.आणि साहेब होणे विसरून जा.इथे साहेब कुणालाच होता आले नाही.त्यामुळे दमाने...जास्त त्रास द्यायचा नाही.इथे साहेब फक्त मीच.’’
“काय गाढवपणा आहे...तू समोर ये...कंपनीचाच तू कोण तर असणार आहेस.बघून घेतू तुला.मी साहेब होणार म्हणजे होणार.’’
फोन मधून आवाज येतो.
“बघ.अजित.अंगलट येईल.’’
अजित ओरडतो.
“ठेव फोन.’’
अजित फोन बंद करतो.
तो आजूबाजूला पाहतो.सगळीकडे ओसाड रान असते.
अजित विचार करतो
“कोण होता...?’’
“त्याला काय माहीत की मी सगळीकडे पाहतोय.’’
जास्त विचार न करता अजित बाहेर पडतो आणि निघतो.
वेळ:- रात्रीचे 11.00
अजित भर काळोखात त्याच्या सफारी मधून ऑफिस मध्ये येतो.सफारी लावून तो गेट च्या आत येतो.आत आल्यावर तो शॉप फ्लोअर ला जातो.तिथे गेल्यावर त्याला सर्व मशीन सुरू दिसतात.सगळीकडे नजर फिरवून तो बाहेर पडतो आणि गाडीत बसतो.आजूबाजूला कडकडीत शांतता पसरलेली असते.
“मी आत असताना मला मशीन चालू दिसले पण मला कामगार तर कुठेच दिसले नाहीत.’’
“छे...नुसत्या मी शंका काढत आहे.असतील.’’
नंतर अजित गाडी सुरू करतो आणि निघतो.तो जात असताना कंपनी मध्ये काही अदृश्य डोळे त्याच्यावर नजर ठेवून असतात.
दोन दिवसांनी:-
वेळ:-दुपारचे २.३०:-
अजित ऑफिस मध्ये बसला होता.त्याला आलेला तो फोन अजून त्याच्या लक्षात असतो.त्याने अजून फोन बद्दल पोलिस ठाण्यात तक्रार केली नव्हती.तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की त्याची मीटिंग आहे.
थोडा वेळात त्याने मीटिंग बोलावली.मीटिंग मध्ये त्याने स्टाफ ची जोरदार झडती घेतली.नंतर त्याने दोन स्टाफला कामावरुन काढून टाकले.
मीटिंग झाल्यावर अजित कामात गुंग झाला.
सायंकाळी पाच वाजता:-
अजित मेल चेक करत होता.तेवढ्यात त्याला एक अनोळखी मेल आला.
अजित तो मेल वाचू लागला.
“Your countdown begins 5…4…’’
तो मेल अनोळखी मेल आय-डी वरुन आला होता.
अजितला कळेना.आता मात्र तो गंभीर झाला.
“काल तो फोन...आज हा मेल...नक्की काय चालू आहे....?’’
अजित च्या मनात “एच.आर” ला कळवावे असे आले पण “एच.आर” सुट्टीवर होता.
त्याने तो मेल पहिला आणि तो त्याने डिलीट केला आणि तो सुट्टी करून बाहेर निघाला.
बाहेर आल्यावर त्याच्या मनात विचार आला.
‘कोण असेल हा वेडेपणा करणारा..’’
विचार करत तो कंपनीच्या बाहेर गेला.तिथे कंपनीचा वॉचमन उभा होता.अजित कडे पाहून त्याने स्मितहास्य केले.अजित ने त्याच्या कडे लक्ष दिले नाही.
तो गाडीत बसला.गाडी तो सुरू करणार एवढ्यात त्याचा फोन वाजला.
अजित, ‘‘कोण बोलत आहे?’’
“मी...तुझा हितचिंतक....आज कामावरून तू कुणाला काढलास?साहेब होण्याचे स्वप्न बंद कर.’’
“तुला कसे माहीत कोण आहेस तू?ये समोर एकदा?’’
फोन मधून आवाज येतो.
“बघ.मी समोर आलो तर...’’
“ये एकदा समोर...मग बघतो तुला?’’
अजित रागाने त्याला बोलत होता.
“मी समोर येणार.रहा तयार. Your countdown starts…5…4..3…’’
“तो मेल....”
फोन मधून हसण्याचा आवाज येतो आणि फोन बंद होतो. 
अजित चार ते पाच वेळा हेलो हेलो करतो. पण कुणीच बोलत नाही.
दुसर्‍या दिवशी:- दुपारी
अजित केबिन मध्ये बसलेला असतो.त्याची सकाळची मीटिंग नुकतीच झालेली असते.त्या मीटिंग मध्ये त्याने प्रत्येक कामगार वर्गाची त्याने झडती घेतली असते.तसेच माहिती कंपनीच्या बाहेर कशी जात आहे हयाबद्दल खडसावले होते.
अजित विचार करत होता.तेवढ्यात त्याला एक मेल आला.त्याने त्याच्या जवळ असलेल्या स्क्रीन वर नजर टाकली.
Your countdown…1…..
अजित मेल बघून दचकला.तेवढ्यात त्याला परत फोन आला.
फोन मधून, “अजित....’’
“कोण आहेस तू? समोर ये एकदा?’’
फोन मधून कुत्सित हसण्याचा आवाज येतो.
“मी समोर येतोय.’’
“कुठे आहेस? बघतो तूला?’’
अजित रागाने हाताची मूठ घट्ट करतो.
“ये समोर...’’
“बघ....’’
अजित रागाने शिव्या हसडतो.
“गेटच्या बाहेर ये लगेच.’’
अजित पळत पळत केबिनच्या बाहेर येतो आणि तो गेटच्या बाहेर पडतो.त्याला जाताना कंपनी मध्ये सुरक्षा रक्षक दिसत नाही.
कंपनीच्या जवळ डोंगर असतो.अजित डोंगराच्या दिशेने जातो.
तो डोंगराजवळ गेल्यावर त्याला तिथे एक विचित्र दृश्य दिसते.तिथे स्मशानभूमी असते.तो ते दृश्य पाहू लागतो.तिथे त्याला खड्डे दिसतात.काही वेळाने त्याला कुणीतरी त्याच्या मागे उभे असल्याचे दिसते.तो झटकन मागे वळून पाहतो.त्याला निळ्या रंगाचे कापड दिसते आणि....काही क्षणात जोराची किंकाळी ऐकू येऊ लागते आणि अजित क्षणात कोसळतो.
थोड्या वेळाने सायंकाळी:-
कंपनीच्या मुख्य ऑफिस मध्ये:-
बुटांचा आवाज ऐकू येत असतो.काही वेळाने दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू येतो.नंतर हळूहळू बुटांचा आवाज पुन्हा ऐकू येतो.कंपनीचे मालक ‘अमर’ मुख्य शॉप मध्ये येतात.सर्वत्र नजर फिरवतात.कंपनी मध्ये 3-4 कामगार असतात.परत अमर ऑफिसच्या दिशेने निघतात आणि अजितच्या रुममध्ये येतात.तिथे आल्यावर ते काहीकाळ अजितच्या टेबलसमोर उभे राहतात.त्यांच्या हाताकडे ते पाहतात.
“अजित....साहेब व्हायचे आहे.’’
हळूहळू त्यांच्या दोन्ही हातात निळ्या रंगाचे कापड दिसू लागते.ते कापड कंपनीचे मालक अमर जोराने घट्ट करतात.त्यामधून लाल रंग दिसू लागतो.
“इथे दोनशे वर्ष मी असताना ह्याला साहेब व्हायचे आहे.काल पर्वा आलेल्या कमिशन खाणार्‍या त्या अजितला….’’
तेवढ्यात कंपनी मध्ये साहेबांना त्यांचा सुरक्षारक्षक, एच.आर भेटायला येतो.काम करत असणारे 4-5 कामगार भेटायला येतात.नंतर साहेब त्यांच्या पी.सी वरुन अजितला पाठवलेले मेल बघतात.नंतर साहेबांची नजर तिथे असलेल्या त्यांच्या हार घातलेल्या फोटोवर जाते.त्या फोटोकडे पाहत साहेब आणि तिथे त्यांना भेटायला आलेला स्टाफ एकमेकांकडे पाहतो आणि काही क्षणात हवेत अदृश्य होतो आणि काही वेळापूर्वी हार घातलेल्या फोटो मध्ये कंपनीचे मालक दिसू लागतात आणि तीन वर्ष मनुष्यविरहित असलेल्या कारखान्यात मशीनचा आणि “मला साहेब व्हायचे’’ असा आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागतो.

Thursday, 16 April 2020

७५ लाख

बराच गजबजाट ऐकू येत होता.लांबून बऱ्याच दोन-चाकी गाड्या विचित्र हॉर्न वाजवत वेगात येत होत्या आणि त्याच वेगाने जात होत्या.शेजारी बरेच कॉफीशॉप दिसत होते.एकएक कॉफी शॉप ओलांडत दुचाकीस्वार निघाला होता.त्याला घाई दिसत होती.एकएक गल्ली त्याला दिसत होती.गाली क्रमांक.१...२...३...४.....असे करत तो ९व्या गल्लीजवळ आला.तिथे आल्यावर त्याने परत यु-टर्न घेतला आणि तो परत मागे फिरला.आणि चौथ्या गल्लीजवळ आला.तिथून परत त्याने टर्न घेतला आणि एकएक घर शोधत पुढे जाऊ लागला.

आजूबाजूला मोठे बंगले होते.त्यावर सुचनांचा पाऊस होता.एका बंगल्यावर लिहिले होते ‘बेल न वाजवता आत येणे.’ दुसऱ्या  बंगल्यावर ‘सुज्ञ माणसे दुपारी वामकुक्षी घेतात.’ पुढे गेल्यावर तिसऱ्या बंगल्यावर ‘कुत्रापासून नाही तर माणसापासून सावध राहा.’

तो दुचाकीस्वार एकएक सूचना पाहत जात होता.त्याला प्रचंड हसू येत होते.अखेर तो गल्लीमध्ये शेवटचा असलेल्या बंगल्याजवळ थांबला.त्याची गाडी त्याने बाहेर पार्क केली आणि तो गेटजवळ थांबला.गेटला लागून वॉचमनचे केबिन होते.

दुचाकीस्वार, “साहेब आहेत का?’’

वॉचमन, “आपण कोण?’’

दुचाकीस्वार,“मी साहेबांचा लांबचा पाव्हना.फोन केला आहे साहेबांना.’’

वॉचमनने इंटरकॉमवर फोन लावला.आणि काही वेळात फोन ठेवला.

वॉचमन,“तुंम्ही साहेबांच्या अगदी वेळेत आला आहात.जावा.’’

दुचाकीस्वार बंगल्यात गेला.त्याने वेळ पाहिली.दुपारचे दोन वाजले होते.तो बंगला निरखू लागला.बंगल्यात दोन महागड्या चारचाकी होत्या आणि दोन अत्यंत महागड्या दोन चाकी होत्या.

बंगल्याला लागून जिना होता.तो चालत जिने चढू लागला आणि पहिल्या मजल्यावर गेला.तिथे गेल्यावर त्याला बंद खोली आणि बेल दिसली.तिथे त्याला सूचना दिसली.

“दुपारी बेल वाजवू नये.दारावर टकटक करावे.’’

त्याने दारावर टकटक असा आवाज केला.

दार उघडले गेले.

समोर ४५ वर्षाचा माणूस उभा होता.बहुतेक गडी असावा.

दुचाकीस्वार, “साहेब आहेत का?’’

“या.बसा आहेत.’’

दुचाकीस्वार बंगल्यात हॉलमध्ये गेला.बंगला मोठा वाटत होता.हॉलमध्ये महागडे फर्निचर दिसत होते.तिथे तो दुचाकीस्वार बसला.

तेवढ्यात साहेब आले.त्यांनी हॉलमध्ये असलेला ‘ए.सी’ सुरु केला.पांढरेकेस,अंगभर पांढऱ्या रंगाचे कपडे,हातात नॅपकीन आणि...धीरगंभीर डोळे.५५-५७ वर्षाचे साहेब असावेत.तो दुचाकीस्वार साहेबांकडे पाहत होता.

साहेब आल्यावर तो दुचाकीस्वार उभा राहिला.

“अरे.बस..बस..राहुल.’’

राहुल बसला.

साहेब, “अगं,एकतीस का...राहुल आलाय.आपल्याकडे.’’

साहेबांचे बोलणे ऐकून साहेबांच्या सौ पळतपळत बाहेर आल्या.

“कसा आहेस राहुल?’’

“मजेत काकू.काकांना बरेच दिवस भेटलो नाही.म्हणून आलो.’’

राहुलच्या हातात पुस्तक होते.साहेबांच्या सौ पुस्तकाकडे पाहत होत्या.

सौ,“नवीन पुस्तक.’’

राहुल, “हो.’’

साहेब,“कसे आहे रे पुस्तक?’’

राहुल, “मस्त आहे.तुमच्यासाठी गिफ्ट.खास.व्यवसाईक लोकांना खूप चांगले.’’

राहुलने साहेबांना पुस्तक दिले.

साहेब, “मनापासून धन्यवाद राहुल.’’

सौ, “राहुल काही घेणार का?’’

राहुल, “नको.’’

सौ, “लाजतोस  काय?’’

राहुल, “नाही.तसे काही नाही.’’

साहेब, “राहुलला एकवाटी आमरस दे.’’

राहुल, “चालेल.’’

सौ आमरस आणायला स्वयंपाघरात गेल्या.

राहुल घर पाहू लागला.

राहुल, “काका.घर सुंदर आहे.’’

साहेब, “न पाहताच कसे काय सुंदर आहे म्हणतोस.चल पूर्ण घर दाखवतो.’’

साहेब त्याला आधी बाल्कनीमध्ये घेऊन गेले.बाल्कनी मोठी होती.तिथे दोन झोपाळे दिसत होते.

साहेब, “इथे आम्ही दोन झोपाळे बांधलेले आहेत.इथे येऊन सर्वांना मोकळी हवा मिळते.हृदयाला चांगली असते मोकळी हवा.तेवढीच सध्या फुकट मिळते.फुकट गोष्ट सोडायची नाही.आणि चहा पिण्यासाठी आणि पुस्तक वाचण्यासाठी बाल्कनीसारखी जागा नाही.बाकी आमच्या दोन २५ लाखाच्या गाड्या आम्ही पार्क करून ठेवतो.दोन्ही बाल्कनीमधून दिसत असतात.आमची नजर देखील राहते.’’

राहुल मान डोलवत होता.

नंतर दोघे हॉलमध्ये आले.तिथे फर्निचर दिसत होते.मोठे झुंबर दिसत होते. एका बाजूला टेबल दिसत होते.तिथे पुस्तक रचून ठेवलेली होती.

साहेब, “इथे आम्ही सर्वजण एकत्र टी.व्ही पाहतो.पुस्तक वाचतो.बातम्या पाहतो.सीरियल पाहतो.शक्यतो मी सिरीयल पाहत नाही.आमच्या सूनबाई आणि आमच्या सौ पाहतात.विरंगुळा म्हणून चित्रपट पाहतो;जुने;राज कपूरचे;नाहीतर हल्लीचे सिनेमे....हा ‘टी.व्ही’ आम्ही डिस्काउंट मध्ये घेतला आहे.आमचे तब्बल ५००० रुपये वाचले.आमचे नातवंड टी.व्ही पाहत असतात. बाकी हे फर्निचर महाग आहे.आमच्या सूनबाईंचा चॉइस.हौशी आहेत खूप.हॉलमध्ये उकाडा वाढला कि आम्ही ‘ए.सी’ लावतो.कुटुंब म्हंटले कि ए.सी आलाच.तो देखील आम्ही डिस्काउंटमध्ये घेतला.त्यात आमचे २५०० रुपये वाचले.’’

राहुल, “(मनात)काय माणूस आहे!फर्निचरला ५०००० खर्च करतोय आणि टी.व्ही मध्ये ५००० वाचवतोय.’’

राहुल, “सुंदर आहे हॉल.’’

साहेब, “हे वरती लावलेले झुंबर.ते सुद्धा सुनेने आणलंय.हौसेला मोल नाही.किंमत तब्बल ८००००.’’

राहुल ऐकत होता.

हॉलमधून दोघे स्वयंपाघरात आले. स्वयंपाघर पाहून दोघे साहेबांच्या खोलीजवळ गेले.

साहेब, “स्वयंपाघर आमच्या सुनबाई आणि सौंची लाडकी जागा.इथे सर्व सुविधा उपलब्ध आहे.फ्रीज आहे.ओव्हन आहे.बाकीच्या आधुनिक सुविधा आहेत.फ्रीज आहे.तब्बल ५००००चा.त्यात रंगीत पेय देखील आहे.’’

राहुल स्मितहास्य करत होता.

राहुलला तिथे ठेवलेले आंबे दिसले होते.

राहुल, “तिथे आंबे..’’

साहेब, “हो.सुनेकडून येतात.कोकणातून.भरपूर येतात.तिचे माहेर कोकण.अगदी कमी किमतीत.कधीकधी आम्हाला फुकट सुद्धा मिळतात.तिच्या वडिलांकडून.फुकट कधीतरी आम्ही घेतो.आंबे मात्र सुंदर.आम्ही रोज आमरस करून पितो.एक वाटी.’’

राहुल, “वाह!.’’

साहेब, “रोज एक वाटी.उन्हाळा संपेपर्येंत.’’

राहुल, “काय...!’’

साहेब, “हो.नाहीतर सर्वांचे वजन वाढते.मग ते कमी करायला खर्च.’’

राहुल ऐकत होता.

साहेब, “आता ही आमची खोली.शेजारची आमच्या मुलाची.दोन्ही खोलीत ए.सी. आहेत.जोडून बाथरूम आहेत.भारतीय पद्धत आणि पाश्चिमात्य पद्धत.दोन्हीची सवय असावी माणसाला.तिथे अंघोळीला पाणी आहे.चोवीस तास.’’

राहुल ऐकत होता.उरलेल्या दोन खोल्या साहेब त्याला दाखवत होते.दोघे शेवटच्या खोलीजवळ आले.

साहेब, “ही संगीत रूम.आमच्या चिरंजीवांना संगीताचा नाद.बाकी त्यांना कसला नाद नाही.संगीत म्हणजे त्यांचे जीव की प्राण.इथे सर्व वाद्य आहेत.ह्या खोलीला २ लाख रुपये खर्च आला.आमचे चिरंजीव घरचा व्यवसाय पाहतात.रात्री घरी आले की वाद्य वाजवत बसतात.’’

दोघे दुसऱ्या मजल्यावर असलेल्या गच्चीवर गेले.

साहेब, “ही माझी आवडती जागा.इथे मी दुपारी ३.०० ते ३.४० वामकुक्षी घेतो.’’

साहेब, “तर....राहुल कसे वाटले घर?आत्ता बोल.’’

राहुल, “खरंच मस्त आहे.’’

साहेब, “असे घर तुला बांधायचे असेल तर ७५ लाख खर्च येईल अंदाजे.’’

राहुल, “इतक्यात नाही.काका.’’

दोघे स्वयंपाघरात आले.

तिथे साहेबांच्या सौ होत्या.

साहेब, “राहुल घे आमरस.’’

सौ,’’तू जेवलास..’’

साहेब, “तो असणार जेवलेला.’’

राहुल काहीच बोलला नाही.

राहुल, “काका तुम्ही आमरास घेत...’’

साहेब, “मी जेवत असताना घेतो.आणि आमचे स्वयंपाघर आम्ही दुपारी दोनला बंद करतो.तू दोनला आलास म्हणून तुला आमरस मिळाला.एक वाटी.दुपारी अडीचला आला असतास तर आमचे स्वयंपाघर बंद असते.तुला काहीच मिळाले नसते.आमच्या वेळेत आले कि भरपूर आम्ही खायला घालतो.’’

राहुल, “ठीक आहे.’’

राहुल आमरस संपवतो.

साहेब, “मग...राहुल कसे सुरु आहे व्यवसाय आणि संसार.’’

राहुल, “उत्तम काका.तुम्ही घरी या.’’

साहेब, “येतो ना.’’

राहुल, “काकूला देखील घेऊन या.’’

साहेब, “नक्की.’’

राहुल, “निघतो मी.निघतो काकू.’’

साहेब, “ अगं.एकतीस का.राहुल निघाला आहे.’’

साहेबांच्या सौ हॉलमध्ये आल्या.

सौ, “ये परत.’’

राहुल बाहेर पडला आणि त्याच्या बाईकजवळ आला.त्याने वेळ पाहिली.दुपारचे ०३.०० वाजले होते.

राहुल, “नुसता मी...मी...दुसरे काही सुचत नाही ह्या माणसाला.जाऊन काहीतरी खातो बाहेर.’’

विचार करत तो निघाला.

काही दिवसांनी:-

वेळ:-दुपारी १.३०ची

ठिकाण:-पुण्यात कुठेतरी

“येऊ का राहुल...?’’

साहेबांचा आवाज आला.

राहुल, “काका.या की.’’

साहेब राहुलच्या घरी आले होते.राहुल आणि साहेब दोघे हॉलमध्ये बसले होते.साहेब राहुलचे घर पाहत होते.एकएक गोष्ट पाहत होते.हॉलमध्ये ए.सी....महागडा टी.व्ही....इम्पोर्टेड फर्निचर...

राहूल, “काका, काकू आल्या नाहीत.’’

साहेब, “अरे ती आली नाही.मी आलो होतो कामासाठी.खूप महत्वाचे काम होते.हे काम झाले कि माझा व्यवसाय सुसाट.जाताजाता तुझ्याकडे आलो.’’

राहुल, “तुम्ही असताना कुठे काम अडते काका.तुम्ही काम फत्ते करूनच जाता.’’

तेवढ्यात राहुलची बायको हॉलमध्ये आली आणि दोघे साहेबांच्या पाया पडले.

साहेब, “अरे..असू दे...’’

साहेब, “काय करतीस गायत्री?’’

गायत्री, “घरगुती मेस आहे.ती मी बघते.राहुल त्याचा व्यवसाय पाहतो.मला देखील मदत करतो.’’

साहेब, “अरे वाह! एकंदरीत सुंदर चालू आहे.’’

राहुल आणि गायत्री दोघे साहेबांकडे पाहून स्मितहास्य करतात.

गायत्री लगेच स्वयंपाघरात जाते आणि साहेबांना सरबत करून आणते.तिघे सरबत  पीत गप्पा मारत होते.

थोड्यावेळाने:-

राहुल, “काका..घर बघूया.’’

साहेब, “चल.’’

दोघे घर निरखू लागले.गायत्री स्वयंपाघरात गेली.

पूर्ण घर पाहून झाल्यावर दोघे हॉलमध्ये बसले.

साहेब, “मस्त आहे घर राहुल.सर्व सोयीयुक्त.साधारण किती खर्च...’’

राहुल,(स्मितहास्य करत) “९० लाख.मी एकही रुपया खर्च केला नाही.’’

साहेब,(आश्चर्यचकित होऊन) “कसे काय रे?’’

राहुल, “काका.लग्न झाले तेव्हा माझ्या सासरेबुवांनी हे थ्री ‘बी.एच.के’ घर गिफ्ट म्हणून दिले.’’

साहेब, “काय सांगतोस काय?’’

राहुल, “हो.’’

राहुल हसत हसत उत्तर देत होता.

राहुल, “आणि मला त्यांनी....६० लाखाची गाडी देखील दिली.मी कधीतरी ती बाहेर काढतो.’’

साहेब काहीच बोलले नाहीत.

तेवढ्यात गायत्रीने साहेबांना आणि राहुलला खीर आणली.

राहुल, “काका.घ्या ना खीर.’’

साहेब, “खीर...आत्ता...’’

राहुल, “कसे आहे काका...आम्ही दोघे दुपारी एकलाच स्वयंपाघर बंद करतो.तुम्ही लवकर आला असता तर तुम्हाला आमरस आणि जेवण दोन्ही मिळाले असते.आमची जेवणाची वेळ १२.३० ते १.००.एक नंतर येणाऱ्या मंडळींना आम्ही असेच काहीतरी गोड करून देतो.उपाशी ठेवत नाही...आणि काका...दुपारी तुम्ही कमीच जेवा...त्यात तुमचे वय...तुमचा तो आजार...तुमची तब्येत....म्हणून गोड म्हणून मस्त पेकी खीर खा..दोघे मिळून मस्त पेकी दुपारी ३.००-३.४० वामकुक्षी घेऊ.’’

साहेब खीर खात अवाक झाले आणि राहुलकडे निर्विकार नजरेने पाहू लागले.

 

©

Kaushik



Wednesday, 15 April 2020

पुस्तक परिचय:-पावनखिंड

‘आबाजी,मागं हो!’

आबाजीने मागं पाहिले तो, आपल्या धारकर्यांसह शिवाजीराजे धावत येत होते.राजांच्या हातात तळपती तलवार होती.

राजांच्या आज्ञेनुसार आबाजी बाजूला झाला.बाजी आणि शिवाजीराजे एकमेकांसमोर उभे होते.

शिवाजीराजांच्या भवती धारकऱ्यांचे कडे होते.मशालधारी दोन्ही बाजूला उभे होते.

बाजी प्रथमच शिवाजीराजांना पाहत होते.

वय तीस,जिरेटोप घातलेली,शिवगंधाने विशाल कपाळ रेखलेले,तेजस्वी वेध घेणारे डोळे बाजी पाहत होते.तीस वर्षाचे वयाचे भान त्या चेहऱ्यावर दिसत नव्हते.नजरेत भीतीचा लवलेशही दिसत नव्हता.चेहऱ्यावर तेज दिसत होते.

बाजी शिवाजीराजांचे रूप निरखत होते.

.....

हेलकावे घेणाऱ्या पालखीचा गोंडा धरून राजे पालखीत बसले होते.पालखीवर झाकलेल्या अलवानामुळे राजांना काही दिसत नव्हते.

बाजींचा आवाज येत होता, ‘चला’

चला!

कुठं जायचं?

........

रणजीत देसाई ह्यांचे लिखाण आणि...बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज....ह्यांच्या पावनखिंड मोहिमेचा पराक्रम अनुभवण्यासाठी अवश्य वाचाच.

 

👉 खरेदी करायला क्लिक करा

 

 


Sunday, 12 April 2020

मराठी म्हणी

असतील शिते तर जमतील भूते:- एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात

 

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ:- दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो

 

अडला हरी गाढवाचे पाय धरी:- एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते

 

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा:- जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही

 

अति तेथे माती:- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो

 

अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे:- दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.

 

अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज:- गरजवंताला अक्कल नसते

 

अंगावरचे लेणे, जन्मभर देणे:- दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे.

 

अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण:- मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.

 

अंधारात केले, पण उजेडात आले:- कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच

 

अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था:- अशक्यकोटीतील गोष्टी

 

अतिपरिचयात अवज्ञा:- जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो

 

अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे:- कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच

 

हपापाचा माल गपापा:- लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते.

 

आयत्या बिळावर नागोबा:- एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.

 

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे:- अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे

आपलेच दात आपलेच ओठ:- आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

आपला हात जगन्नाथ:- आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.

 

 

 


Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...