Monday, 22 March 2021

मला साहेब व्हायचे

"मला साहेब व्हायचे''

ठिकाण:- इचलकरंजी पासून लांब कुठेतरी...

सकाळचे १०.४५ वाजले होते.लांबून बरेच टोलेजंग डोंगर दिसत होते.मोठे ट्रक आणि ट्रान्सपोर्टच्या गाड्या वेगाने हवेत धुरळा उडवत जात होत्या.बरेच कारखाने दिसत होते.खराब झालेले रस्ते लांबून दिसत होते.
काही वेळाने धुरळा उडवत एक सफारी रस्त्यावरून आली.ती वळणे पार करत जात होती.रस्ते खराब असल्यामुळे त्या सफारीला बरेच हेलकावे खात जावे लागत होते.बरेच कारखाने आणि वेडीवाकडी वळणे पार करत ती सफारी अखेर एका डोंगराच्या जवळ असलेल्या एका कारखान्याजवळ थांबली.त्या गाडीतून ३५ वर्षाचा माणूस उतरला.त्याने कारखान्यावर नजर टाकली.कारखाना बराच मोठा होता.कारखान्याच्या एका बाजूला डोंगर होता.दुसर्‍या बाजूला धावणारी रेल्वे दिसत होती.त्या माणसाने गाडी कारखान्याजवळ लावली आणि तो कारखान्याच्या गेट जवळ आला.तिथे सुरक्षारक्षक उभा होता.
सुरक्षारक्षक,‘‘कुणाला भेटायचे आहे?’’
35 वर्षाचा माणूस,‘‘माझा आज कामाचा पहिला दिवस.’’
सुरक्षारक्षक,‘‘तुमचे नाव?’’
“मी अजित.’’
‘‘ठीक आहे. जावा.’’
अजित गेटच्या आत गेला.तो जॉइन झालेली कंपनी बरीच मोठी होती.औटोमोबाईल क्षेत्रात लागणारे पार्ट तिथे तयार होत होते.अजित ऑफिसच्या दिशेने गेला.कंपनी मध्ये त्याला शुकशुकाट जाणवत होता.अजित कंपनीमध्ये निरखून पाहत होता.कंपनी बरीच मोठी दिसत होती.कंपनीची ऑफिसची बिल्डिंग देखील मोठी होती.तो ऑफिसमध्ये गेला.तिथे वेटिंग एरिया मध्ये तो बसला.त्याला आश्चर्य वाटत होते.कंपनी मध्ये त्याला एकही व्यक्ति दृष्टीला पडलेली नव्हती.तो वेटिंग रूम मध्ये बसला.वेटिंग रूमला लागून कंपनीचे ऑफिस होते.तो आजूबाजूला पाहू लागला.
तेवढ्यात त्याला थोड्यावेळाने कुणीतरी हाक मारली.
‘‘अजितना तुम्ही...’’
त्याच्यासमोर ५५ वर्षाची व्यक्ति होती.
“हो.मी अजित.’’
‘‘आत या.’’
अजित त्या ५५ वर्षाच्या व्यक्तीच्या मागून वेटिंगरुमला लागून असलेल्या हॉलमध्ये गेला.
‘‘बसा.’’
अजित तिथे असलेल्या खुर्चीवर बसला.त्याच्या समोर ती ५५ वर्षाची व्यक्ति बसली.
‘‘तुमची मुलाखत खूप चांगली झाली.एच.आर सांगत होता.’’
अजितने त्या व्यक्तीसमोर स्मितहास्य केले.
“मी अमर.ह्या कंपनीचा सी.ई.ओ.तुम्ही इंटरव्हीवमध्ये सांगत होता की तुम्हाला इथला साहेब व्हायचे आहे.इट्स गुड.तुमची स्वप्ने मोठी आहेत.’’ 
अजित काहीच बोलला नाही.
‘‘कामाचे स्वरूप तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जाऊ शकता.बेस्ट लक.’’
अजित, ‘‘धन्यवाद सर.’’
अजित उठला.तेवढ्यात त्याला ऑफिसमध्ये एक फोटो दिसला.त्या फोटोला हार घातलेला होता.तो फोटो पाहून अजित दचकला.त्या फोटोमधली व्यक्ति आणि त्याच्या समोर बसलेली ५५ वर्षाची व्यक्ति दिसायला एकसारख्या होत्या.
अजित फोटोकडे पाहत असताना ती ५५ वर्षाची व्यक्ति अजितकडे पाहू लागली.
अजित ऑफिसच्या बाहेर पडला.
अजित, ‘‘(मनात)कोण असेल ती फोटो मधली व्यक्ति?सर आणि ती फोटोमधली व्यक्ति दिसायला एकसारखीच.....कोण असेल ती फोटोमधली व्यक्ति....कोण का असेना...आपण कामाला सुरवात करू.’’
अजित एच.आरला भेटला.एच.आरने अजितला त्याची केबिन दाखवली.अजितची केबिन तो भेटलेल्या साहेबांच्याच बिल्डिंगमध्ये होती.अजितने केबिन पाहिली.केबिन खूप लहान होती.अजित त्याच्या खुर्चीजवळ गेला.तिथे त्याला एक विचित्र दृश्य दिसले.तिथे खुर्चीवर एक लाल रंगाचे कापड त्याला दिसले.त्याने ते कापड काढले आणि ते त्याच्या टेबलजवळ ठेवले.तो काही वेळ खुर्चीवर बसला.नंतर तो त्याच्या केबिनच्या बाहेर आला आणि शॉपच्या दिशेने निघाला.
अजित शॉपवर नजर फिरवत जाऊ लागला.शॉप बराच मोठा होता.त्याला शॉप मध्ये ‘व्ही.एम.सी’ आणि ‘सी.एन.सी’ मशीन दिसले.मशीन जवळ बरेच रोबोट त्याला दिसत होते.तो चालत निघाला होता.त्याला आश्चर्य वाटत होते.पूर्ण शॉप मध्ये त्याला एकही व्यक्ति दिसत नव्हती.मशीन वर त्याला ऑटोमोबाइल ला लागणारे पार्ट मशीनिंग होत असताना दिसले.तो एक-एक मशीन बघत पुढे जाऊ लागला.पुढे गेल्यावर त्याला शॉप मध्ये एका कोपर्‍यात तीन ते चार मुलं दिसली.तो चालत त्यांच्या जवळ गेला.
अजितला बघितल्यावर ती मुलं त्याच्याजवळ आली.
अजित,‘‘मशीन जवळ कुणीच नाही.’’
त्या मुलांपेकी एक जण,‘‘आम्ही इथे जॉब चेक करत होतो.’’
अजित,‘‘सगळे जणं?’’
ती मुलं काहीच बोलली नाहीत.
अजित, ‘‘सगळ्यांचे काय काम आहे इथे?जावा तुमच्या मशीन जवळ.आज पासून मी तुमचा नवीन साहेब आहे.त्यामुळे मी सांगतो ते ऐकायचे.’’
अजित जोरात खेकसला.सर्व मुलं त्यांच्या मशीन जवळ गेली.अजितला एक गोष्ट विचित्र वाटली.ती मुलं त्याला नजर देत नव्हती.त्याचबरोबर त्याला अजून एक गोष्ट खटकली.त्या मुलांच्या हातात त्याला निळ्या रंगाचे कापड दिसले.त्याला लगेच आठवले.त्याच्या ऑफिसमध्ये देखील त्याने निळ्या रंगाचे कापड पाहिले होते.ते कापड बघून तो क्षण भर दचकला.
लगेच झपझप चालत तो शॉप मध्ये फिरू लागला.त्याला दिसलेली मुले परत त्याने ओरडल्यामुळे मशीन जवळ गेली होती.अजित शॉप मध्ये सर्वत्र नजर फिरवत होता.अजून एक गोष्ट त्याला दिसली.शॉप मध्ये त्याला कोपर्‍यात उलट्या टांगलेल्या बाहुल्या दिसल्या.ते पाहिल्यावर त्याने रागाने त्या बाहुल्या काढल्या आणि त्या हातात घेऊन तो बाहेर आला आणि त्या बाहुल्या त्याने लांब फेकून दिल्या.नंतर तो चालत त्याच्या सुरक्षारक्षकाच्या केबिन जवळ गेला.तिथे जाऊन तो वॉचमनला शोधू लागला.तिथे त्याला कुणीच दिसत नाही. 
तो वॉचमनला शोधू लागतो.पण वॉचमन त्याला काही केल्या दिसला नाही.तेवढ्यात त्याला वॉचमनची केबिन दिसते.तो केबिन जवळ जातो.केबिन मध्ये देखील त्याला निळ्या रंगाचे कापड दिसते.
“लाल रंगाचे कापड....गेला कुठे वॉचमन...?’’
अजित पुटपुटत वॉचमनला शोधू लागतो.पण त्याला वॉचमन कुठेच दिसत नाही.
“जाताना बघू...’’
मनातल्या मनात म्हणत अजित त्याच्या ऑफिस मध्ये येऊन तिथे असलेल्या टेबलजवळ येऊन बसतो.
 
“कंपनी विचित्र वाटत आहे जरा…’’
“बाहुल्या...लाल रंगाचे कापड...’’
अजित खुर्चीवर बसलेला असतो.
“नंतर बघू...’’
अजित टेबल जवळ असलेल्या खुर्चीवर बसतो.
तिथे तो पी.सी वर काम करू लागतो.त्याला बरेच काम लागले असते.नवीन कंपनी मध्ये येताना त्याची निवड मॅनेजर पोस्ट वर झाली होती.पण त्याला कंपनीमध्ये वरच्या पोस्ट वर जाऊन साहेब होण्याची त्याची महत्वाकांशा होती.थोडा वेळा नंतर अजित त्याच्या टिमला त्याच्या केबिन मध्ये बोलवतो.तीन जुनीयर इंजिनीअर त्याच्या केबिन मध्ये येतात.सर्व 27 वर्षाचे असावेत.सर्वांशी तो चर्चा करतो आणि 15 मिनिटांनी सर्व इंजिनीअर त्याच्या केबिन मधून बाहेर जातात.
अजितला अजून एक नवल वाटते.आलेले सर्व इंजिनीअर त्याच्याशी मोकळे होऊन बोलत नाहीत.पण अजित जास्त लक्ष देत नाही.तो पुन्हा कामात गुंतत जातो.
काहीवेळाने:-
वेळ:- दुपारचे १२.३०
अजित त्याच्या कामात गुंतला होता.तो बसत असलेले केबिन मोठे होते.त्या केबिनला चारही बाजूंनी काच लावलेली होती.अजित काम करत असताना त्याने सहज केबिन भवती नजर टाकली.त्याला काही आठवले.सकाळी त्याने त्याच्या केबिन मध्ये निळ्या रंगाचे कापड पहिले होते.ते कापड त्याच्या खुर्चीजवळ होते.पण ते त्याला  दिसत नव्हते.
तेवढ्यात त्याला जाणवते की, कुणीतरी त्याच्या केबिनच्या बाहेर उभे आहे.त्याला केबिन जवळ असलेल्या काचेजवळ एक सावली दिसते.तो जागचा उठतो आणि केबिनचा दरवाजा उघडून बाहेर जातो.बाहेर गेल्यावर तो सगळीकडे नजर फिरवतो.त्याला बाहेर एकही व्यक्ति दिसत नाही. त्याला आश्चर्य वाटत राहते.तो परत केबिन मध्ये येतो.
काही वेळ झाल्यावर:-
तो त्याच्या केबिन मध्ये बसलेला असतो.परत काही वेळाने त्याला कुणीतरी केबिनच्या बाहेर एक माणूस उभा असल्याचे जाणवले.तो पटकन उठून जातो आणि दार उघडतो.पुन्हा त्याला कुणीच दिसत नाही.
तो काही काळ विचार करतो.
‘भास होता की काय...?’’
विचार करत तो पुन्हा टेबल जवळ जातो आणि खुर्चीवर बसतो.
काही वेळाने:-
अजित कामात असतो.तो केबिन मध्ये एकटाच बसलेला असतो.तो वेळ राहतो.संध्याकाळचे ५.०० वाजले होते.
अजित त्याचे काम आवरतो आणि बाहेर पडतो.
बाहेर आल्यावर तो आजूबाजूला पाहतो.त्याला कुणीच दिसत नाही.
तो शॉप मध्ये जातो.तिथे देखील त्याला कुणीच दिसत नाही.
“मशीन तर चालू दिसत आहेत.पण बाकीचे गेले कुठे?’’
त्याला खटकते.शॉप मध्ये त्याला कुणीच दिसत नाही पण त्याला मशीन चालू असल्याचे ऐकू येऊ लागते.तो शॉप मध्ये जातो आणि नजर टाकतो.त्याला २ कामगार मशीन वर दिसतात.शॉप मध्ये नजर टाकून परत तो बाहेर येतो आणि अचानक घसरतो.लगेच तो जमिनीवर काय पडले आहे का ते पाहतो.त्याला निळ्या रंगाचे कापड दिसते.
तो काही क्षण विचार करत राहतो.
“पडलो कसे काय...?’’
तो वेळ पाहतो.सायंकाळचे ५.३० वाजलेले असतात.तो गेट जवळ येतो.तिथे असलेला सुरक्षा रक्षक त्याला बघून सलाम ठोकतो.
अजित, “ दुपारी कुठे होता?’’
“कुठे नाही साहेब.मोठ्या साहेबांनी बोलावले होते.’’.अजित काहीच बोलत नाही.
बरोबर काही महिन्यांनी:-
वेळ:-संध्याकाळ.
अजित त्याच्या गाडीजवळ येतो आणि गाडीमध्ये बसतो.
“आठ महीने झाले.’’
स्वतःशीच पुटपुटत तो निघतो.
तेवढ्यात त्याला एक अनोळखी फोन येतो.
अजित फोन घेतो.
अजित, “हॅलो!’’
“अजित.....’’
फोन मधून आवाज येतो.तो आवाज पुरुषाचा असतो.
“बोलतोय.’’
“निघालास कंपनी मधून...’’
“कोण बोलत आहे?’’
पलीकडून काहीच आवाज ऐकू येत नाही.
“हॅलो...’’
“मी..तुझा हितचिंतक....’’
अजित,“माझा....कोण बोलत आहे?’’
अजित गाडीच्या बाहेर पाहतो.त्याला आजूबाजूला कुणीच दिसत नाही.
फोन मधून, “कुठे पाहत आहेस?’’
फोन मधून हसण्याचा आवाज येतो.
अजित, “कोण आहेस तू?’’
“तुझा हितचिंतक.तुला इथे साहेब व्हायचे…’’
अजित आता घाबरतो.
“कोण आहेस तू सांग....?’’
“मी...तुझा हितचिंतक.तू कामगारांना जास्त पीडतोस.जास्त कामं सांगतोस.बंद कर ते.आणि साहेब होणे विसरून जा.इथे साहेब कुणालाच होता आले नाही.त्यामुळे दमाने...जास्त त्रास द्यायचा नाही.इथे साहेब फक्त मीच.’’
“काय गाढवपणा आहे...तू समोर ये...कंपनीचाच तू कोण तर असणार आहेस.बघून घेतू तुला.मी साहेब होणार म्हणजे होणार.’’
फोन मधून आवाज येतो.
“बघ.अजित.अंगलट येईल.’’
अजित ओरडतो.
“ठेव फोन.’’
अजित फोन बंद करतो.
तो आजूबाजूला पाहतो.सगळीकडे ओसाड रान असते.
अजित विचार करतो
“कोण होता...?’’
“त्याला काय माहीत की मी सगळीकडे पाहतोय.’’
जास्त विचार न करता अजित बाहेर पडतो आणि निघतो.
वेळ:- रात्रीचे 11.00
अजित भर काळोखात त्याच्या सफारी मधून ऑफिस मध्ये येतो.सफारी लावून तो गेट च्या आत येतो.आत आल्यावर तो शॉप फ्लोअर ला जातो.तिथे गेल्यावर त्याला सर्व मशीन सुरू दिसतात.सगळीकडे नजर फिरवून तो बाहेर पडतो आणि गाडीत बसतो.आजूबाजूला कडकडीत शांतता पसरलेली असते.
“मी आत असताना मला मशीन चालू दिसले पण मला कामगार तर कुठेच दिसले नाहीत.’’
“छे...नुसत्या मी शंका काढत आहे.असतील.’’
नंतर अजित गाडी सुरू करतो आणि निघतो.तो जात असताना कंपनी मध्ये काही अदृश्य डोळे त्याच्यावर नजर ठेवून असतात.
दोन दिवसांनी:-
वेळ:-दुपारचे २.३०:-
अजित ऑफिस मध्ये बसला होता.त्याला आलेला तो फोन अजून त्याच्या लक्षात असतो.त्याने अजून फोन बद्दल पोलिस ठाण्यात तक्रार केली नव्हती.तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की त्याची मीटिंग आहे.
थोडा वेळात त्याने मीटिंग बोलावली.मीटिंग मध्ये त्याने स्टाफ ची जोरदार झडती घेतली.नंतर त्याने दोन स्टाफला कामावरुन काढून टाकले.
मीटिंग झाल्यावर अजित कामात गुंग झाला.
सायंकाळी पाच वाजता:-
अजित मेल चेक करत होता.तेवढ्यात त्याला एक अनोळखी मेल आला.
अजित तो मेल वाचू लागला.
“Your countdown begins 5…4…’’
तो मेल अनोळखी मेल आय-डी वरुन आला होता.
अजितला कळेना.आता मात्र तो गंभीर झाला.
“काल तो फोन...आज हा मेल...नक्की काय चालू आहे....?’’
अजित च्या मनात “एच.आर” ला कळवावे असे आले पण “एच.आर” सुट्टीवर होता.
त्याने तो मेल पहिला आणि तो त्याने डिलीट केला आणि तो सुट्टी करून बाहेर निघाला.
बाहेर आल्यावर त्याच्या मनात विचार आला.
‘कोण असेल हा वेडेपणा करणारा..’’
विचार करत तो कंपनीच्या बाहेर गेला.तिथे कंपनीचा वॉचमन उभा होता.अजित कडे पाहून त्याने स्मितहास्य केले.अजित ने त्याच्या कडे लक्ष दिले नाही.
तो गाडीत बसला.गाडी तो सुरू करणार एवढ्यात त्याचा फोन वाजला.
अजित, ‘‘कोण बोलत आहे?’’
“मी...तुझा हितचिंतक....आज कामावरून तू कुणाला काढलास?साहेब होण्याचे स्वप्न बंद कर.’’
“तुला कसे माहीत कोण आहेस तू?ये समोर एकदा?’’
फोन मधून आवाज येतो.
“बघ.मी समोर आलो तर...’’
“ये एकदा समोर...मग बघतो तुला?’’
अजित रागाने त्याला बोलत होता.
“मी समोर येणार.रहा तयार. Your countdown starts…5…4..3…’’
“तो मेल....”
फोन मधून हसण्याचा आवाज येतो आणि फोन बंद होतो. 
अजित चार ते पाच वेळा हेलो हेलो करतो. पण कुणीच बोलत नाही.
दुसर्‍या दिवशी:- दुपारी
अजित केबिन मध्ये बसलेला असतो.त्याची सकाळची मीटिंग नुकतीच झालेली असते.त्या मीटिंग मध्ये त्याने प्रत्येक कामगार वर्गाची त्याने झडती घेतली असते.तसेच माहिती कंपनीच्या बाहेर कशी जात आहे हयाबद्दल खडसावले होते.
अजित विचार करत होता.तेवढ्यात त्याला एक मेल आला.त्याने त्याच्या जवळ असलेल्या स्क्रीन वर नजर टाकली.
Your countdown…1…..
अजित मेल बघून दचकला.तेवढ्यात त्याला परत फोन आला.
फोन मधून, “अजित....’’
“कोण आहेस तू? समोर ये एकदा?’’
फोन मधून कुत्सित हसण्याचा आवाज येतो.
“मी समोर येतोय.’’
“कुठे आहेस? बघतो तूला?’’
अजित रागाने हाताची मूठ घट्ट करतो.
“ये समोर...’’
“बघ....’’
अजित रागाने शिव्या हसडतो.
“गेटच्या बाहेर ये लगेच.’’
अजित पळत पळत केबिनच्या बाहेर येतो आणि तो गेटच्या बाहेर पडतो.त्याला जाताना कंपनी मध्ये सुरक्षा रक्षक दिसत नाही.
कंपनीच्या जवळ डोंगर असतो.अजित डोंगराच्या दिशेने जातो.
तो डोंगराजवळ गेल्यावर त्याला तिथे एक विचित्र दृश्य दिसते.तिथे स्मशानभूमी असते.तो ते दृश्य पाहू लागतो.तिथे त्याला खड्डे दिसतात.काही वेळाने त्याला कुणीतरी त्याच्या मागे उभे असल्याचे दिसते.तो झटकन मागे वळून पाहतो.त्याला निळ्या रंगाचे कापड दिसते आणि....काही क्षणात जोराची किंकाळी ऐकू येऊ लागते आणि अजित क्षणात कोसळतो.
थोड्या वेळाने सायंकाळी:-
कंपनीच्या मुख्य ऑफिस मध्ये:-
बुटांचा आवाज ऐकू येत असतो.काही वेळाने दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू येतो.नंतर हळूहळू बुटांचा आवाज पुन्हा ऐकू येतो.कंपनीचे मालक ‘अमर’ मुख्य शॉप मध्ये येतात.सर्वत्र नजर फिरवतात.कंपनी मध्ये 3-4 कामगार असतात.परत अमर ऑफिसच्या दिशेने निघतात आणि अजितच्या रुममध्ये येतात.तिथे आल्यावर ते काहीकाळ अजितच्या टेबलसमोर उभे राहतात.त्यांच्या हाताकडे ते पाहतात.
“अजित....साहेब व्हायचे आहे.’’
हळूहळू त्यांच्या दोन्ही हातात निळ्या रंगाचे कापड दिसू लागते.ते कापड कंपनीचे मालक अमर जोराने घट्ट करतात.त्यामधून लाल रंग दिसू लागतो.
“इथे दोनशे वर्ष मी असताना ह्याला साहेब व्हायचे आहे.काल पर्वा आलेल्या कमिशन खाणार्‍या त्या अजितला….’’
तेवढ्यात कंपनी मध्ये साहेबांना त्यांचा सुरक्षारक्षक, एच.आर भेटायला येतो.काम करत असणारे 4-5 कामगार भेटायला येतात.नंतर साहेब त्यांच्या पी.सी वरुन अजितला पाठवलेले मेल बघतात.नंतर साहेबांची नजर तिथे असलेल्या त्यांच्या हार घातलेल्या फोटोवर जाते.त्या फोटोकडे पाहत साहेब आणि तिथे त्यांना भेटायला आलेला स्टाफ एकमेकांकडे पाहतो आणि काही क्षणात हवेत अदृश्य होतो आणि काही वेळापूर्वी हार घातलेल्या फोटो मध्ये कंपनीचे मालक दिसू लागतात आणि तीन वर्ष मनुष्यविरहित असलेल्या कारखान्यात मशीनचा आणि “मला साहेब व्हायचे’’ असा आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागतो.

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...